Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधसर्वात मोठा दानशूर कोण ; अर्जुन की कर्ण?

सर्वात मोठा दानशूर कोण ; अर्जुन की कर्ण?

माणसात दानत लागते, असे म्हटले जाते. अनेक माणसे आपापल्यापरिने काही ना काही दान करत असतात. महाभारत काळात एकदा सर्वांत मोठा दानशूर कोण, अशी स्पर्धा अर्जुन (Arjun) आणि कर्ण (Karna) या दोघांमध्ये लागली. श्रीकृष्णाची (Shri Krishna) यातील भूमिका काय होती? जाणून घेऊया..

माणसात दानत लागते, असे म्हटले जाते. अनेक माणसे आपापल्यापरिने काही ना काही दान करत असतात. महाभारतातील कर्ण हा दानशूर असल्याचे अनेक दाखले दिले जातात. आजच्या काळातही समाजात अनेक दानशूर माणसे आहेत. एका हाताने केलेल्या दान दुसर्‍या हातालाही कळता कामा नये, अशी मान्यता समाजात रुजलेली आहे. त्यामुळे केलेल्या दानाची शक्यतो वाच्छता केली जात नाही. धुरंधर राजकारणी, सेलिब्रिटी व्यक्ती, कलाकार मंडळी, समाजसेवक, उद्योजक, व्यवसायिक आपापल्या इच्छेनुसार काहीतरी दान देत असतात. करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. रतन टाटांपासून ते अगदी सामान्य देशवासीयांपर्यंत अनेकांनी आपापल्या कुवतीनुसार मदत केली. हे अगदी ताजे उदाहरण आहे. मात्र, महाभारत काळात एकदा सर्वांत मोठा दानशूर कोण, अशी स्पर्धा अर्जुन आणि कर्ण या दोघांमध्ये लागली. नेमके काय घडले? श्रीकृष्णाची यातील भूमिका काय होती? जाणून घेऊया…

श्रीकृष्ण आणि अर्जुन एकदा वार्ता करत बसले होते. काही ना काही गोष्टींचे दान मीदेखील करत असतो. मग, सर्वजण कर्णाला दानशूर असे का म्हणतात, असा प्रश्न अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारला. या प्रश्नावर श्रीकृष्णाने स्मितहास्य केले. जवळच असलेल्या दोन टेकड्यांचे रुपांतर श्रीकृष्णाने सोन्यात केले आणि अर्जुनाला म्हणाला की, अर्जुना, या दोन टेकड्यांचे रुपांतर सोन्यात केले आहे. यातील सोने गावकर्‍यांमध्ये वाटून टाक.

- Advertisement -

अर्जुनाने सर्व गावकर्‍यांना बोलावले आणि स्वतःच टेकड्या फोडून सोन्याचे वाटप करू लागला. अनेक तास सोने वाटप करून अर्जुनामध्ये किंचितसा अहंकार घर करू लागला. काही काळानंतर अर्जुन थकला. आता माझ्याकडून आणखी काम होणार नाही, असे त्याने कृष्णाला सांगितले.

श्रीकृष्णाने कर्णाला बोलावले. दोन टेकड्यांचे सोन्यात रुपांतर केले असून, ते सोने गावकर्‍यांमध्ये वाटायला सांगितले. कर्णानेही गावकर्‍यांना बोलावले. कर्ण गावकर्‍यांना म्हणाला की, गावकर्‍यांनो, हे सारे सोने आपले आहे. यातील तुम्हांला हवे तेवढे सोने घेऊन जा. ही कल्पना मला सुचली नाही, अशी विचारणा अर्जुनाने श्रीकृष्णाला केली.

श्रीकृष्ण म्हणाला की, अर्जुना, तुला सोन्याचा मोह झाला. त्यामुळे गावकर्‍यांना किती सोने द्यायचे, याचा निर्णय तू स्वतःच घेतलास. इतकेच नव्हे तर, तू स्वतःच टेकडी खणायला लागलास. आपण दानशूर असल्याचा अहंभाव तुझ्यात आला. याउलट, कर्णाने असे केले नाही. दान केल्यानंतर कोणी कौतुक करावे, जयजयकार करावा, अशी कर्णाची अजिबात इच्छा नव्हती. म्हणून त्याने गावकर्‍यांनाच पाचारण केले. दानाच्या बदल्यास आभार किंवा धन्यवादाची अपेक्षा करणे, एक प्रकारे सौदाच समजला जातो. कोणत्याही अपेक्षा न ठेवता दान केले पाहिजे, तरच ते आपले सत्कर्म ठरते.

- Advertisment -

ताज्या बातम्या