भाग्य व धनवृद्धीसाठी घरात कोणते फोटो लावावे ?
भविष्यवेध

भाग्य व धनवृद्धीसाठी घरात कोणते फोटो लावावे ?

घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती... या ओळी आपण अनेकदा ऐकतो आणि त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी सदैव प्रयत्नशीलही राहतो. या धकाधकीच्या जीवनात बाहेरून घरी आल्यानंतर शांतता लाभावी, मन प्रसन्न राहावे, सौख्यप्राप्ती व्हावी, यासाठी मनापासून घर सजवले जाते. घर नवीन असो वा वडिलोपार्जित त्याचा कोपरा अन् कोपरा कसा असावा, कसा दिसावा, याकडे विशेष लक्ष दिले जाते. प्रत्येक कुटुंब आपल्या आवडीप्रमाणे, ऐपतीप्रमाणे घराची सजावट करत असतात. घराची सजावट करताना असंख्य गोष्टींचा अंतर्भाव केला जातो. अनेकांना विशिष्ट प्रकारच्या तसबिरी, पेंटिग्ज लावण्याचा, काही खास मूर्ती स्थापन करण्याचा छंद असतो. घरात लावल्या जाणार्‍या तसबिरी, फोटोज, पेंटिंग्ज, यासंदर्भात वास्तुशास्त्रात काही गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. नेमक्या कोणत्या प्रकारच्या तसबिरी घरात लावाव्यात, त्याचा वास्तुवर काय परिणाम होतो, यावर वास्तुशास्त्र प्रकाश टाकते. काही तसबिरी या घरातील सुख, शांतता, धनवृद्धी, भाग्य, समृद्धी वृद्धिंगत होण्यासाठी सहाय्यभूत ठरतात, असे सांगितले जाते. भाग्य व धनवृद्धीसाठी घरात नेमक्या कोणत्या प्रकारच्या तसबिरी लावणे उपयुक्त व लाभदायक ठरते? जाणून घेऊया...

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

दीर्घायुष्य

कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य उत्तम राहून त्यांना दीर्घायुष्य लाभावे, असे सर्वांनाचा वाटत असते. जो-तो आपापल्या परिने आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो. वास्तुशास्त्रानुसार, घरात पाण्यात मुक्त विहार करत असलेल्या माशांची तसबीर लावणे उपयुक्त मानले गेले आहे. पाण्यात मुक्तपणे विहार करणारे मासे हे जिवंतपणाचे प्रतीक मानले गेले आहे. अशा प्रकारच्या तसबिरी घरात लावल्यास घरातील वातावरण प्रफुल्लित राहते. कुटुंबातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभण्यास मदत होते, असे सांगितले जाते.

मनोबलवृद्धी

प्रत्येकाच्या आयुष्यात दररोज काही ना काही घडत असते. कधी नावडते प्रसंग आले की, मन खिन्न होते. निराशा येते. नकारात्मक विचार मनात घर करू लगतात. अशावेळी घरातील काही गोष्टी आपल्याला सकारात्मकता प्रदान करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. वास्तुशास्त्रानुसार, सूर्योदय, मोठ्या पर्वतरांगा आणि पाण्याशी निगडीत तसबिरी लावणे लाभदायक मानले जाते. या तसबिरींमुळे कुटुंबात कायम आशावादी वातावरण राहते. या तसबिरींकडे पाहिल्यानंतर सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. मनोबल आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यासाठी अशा प्रकारच्या तसबिरी सहाय्यक ठरतात, असे सांगितले जाते.

सकारात्मकता

दररोज वेगळा दिवस आणि वेगवेगळ्या घटनांमधून माणूस आपले जीवन व्यतीत करत असतो. मात्र, घरातील अनेक गोष्टी माणसाला सकारात्मक आणि आशावादी राहण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. वास्तुशास्त्रानुसार, घरात हसर्‍या चेहर्‍यांची तसबीर लावणे फायदेशीर मानले जाते. अशा तसबिरींमुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमभाव वाढीस लागतो. नातेसंबंध दृढ होण्यास मदत होते. यामुळे एकूण कौटुंबिक वातावरण उत्तम राहते. मानसिक प्रसन्नता लाभते. कुटुंबातील सदस्य आनंदी राहण्यास या प्रकारच्या तसबिरी सहाय्यक ठरतात, असे सांगितले जाते.

भाग्यवर्धक

वास्तुशास्त्रानुसार, वाहत्या पाण्याची तसबीर घरात लावणे लाभदायक ठरू शकते. शांतपणे वाहणारे पाणी हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते. एखादा धबधबा, नदी, तलाव, ओढा किंवा समुद्राशी संबंधित तसबीर घरात लावल्याने कुटुंबातील सदस्यांचे भाग्य प्रबल होते. एखादे प्रलंबित काम मार्गी लागण्यास किंवा कामे पूर्ण होण्यास अडचणी येत असल्यास अशा प्रकारची तसबीर उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले जाते. मात्र, शांतपणे वाहणार्‍या पाण्याची तसबीर लावावी, असा सल्ला दिला जातो.

या तसबिरी घरात लावू नयेत

कोणत्या प्रकारच्या तसबिरी, फोटोज वा पेंटिग्ज घरात लावू नये, यावर वास्तुशास्त्र भाष्य करते. घनदाट जंगल, हिंस्र प्राणी, लाल रंगाच्या तसबिरी, ऐतिहासिक किंवा युद्धप्रसंगातील तसबिरी, पेंटिग्ज घरात लावू नयेत. यामुळे कुटुंबात तणावाचे वातावरण वाढीस लागते. नातेसंबंधात कटुता निर्माण करणार्‍या घटना घडू शकतात. यामुळे नकारात्मता वाढीस लागण्याची शक्यता असते. एकूण घरावर आणि कुटुंबावर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असे सांगितले जाते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com