साप्ताहिक राशीभविष्य
साप्ताहिक राशीभविष्यweekly Horoscope

साप्ताहिक राशीभविष्य

18 ते 24 नोव्हेंबर 2021

मेष - संधीचा लाभ घ्या

जीवनाशी निगडीत काही समस्यांचा सामना करावा लागेल. संयम आणि विवेकाने या संकटांवर मात करा. या आठवड्यात आरोग्य आणि कौटुंबिक संबंध जपण्याची आवश्यकता आहे. आपलीच माणसे गैरसमजुतीचे शिकार होणार नाहीत, याची काळजी घ्या. भागीदारीत व्यवसाय करणार असाल तर आर्थिक बाबींच्या स्पष्टतेशिवाय पुढील पाऊल टाकू नका. कोर्टकचेरीची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. धाडसी निर्णयांपासून अंतर राखा. संबंध खराब होतील, असे शब्द वापरू नका. आठवड्याच्या प्रारंभाला आळस झटकून आलेल्या संधीचं सोनं करा. अडचणीच्यावेळी जीवनसाथी खंबीर साथ देणार आहे.

शुभ तारखा : 18, 20

वृषभ- जोडीदारासोबत सामंजस्य कायम

आठवडा आपल्यासाठी नव्या संधी घेऊन आला आहे. करिअर व व्यवसायात अपेक्षीत यश मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य मिंळणार आहे. उत्पन्नाच्या नव्या मार्गाचा शोध घ्या. आठवड्याच्या सुरूवातीला प्रवास होणार आहे. प्रवास सुखकर आणि लाभदायक ठरेल. वरिष्ठांच्या मदतीने संपत्तीविषयक विवादावर तोडगा निघेल. नोकरीपेशा महिलांसाठी आठवडा अनुकूल आहे. अविवाहितांसाठी विवाहयोग आहेत. प्रेमसंबंध अधिक बहरतील. जोडीदारासोबत सामंजस्य कायम राहील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण वाट्याला येतील.

शुभ तारखा : 21, 23

मिथुन- प्रगतीचे नवे मार्ग सापडतील

आपण ठरविल्याप्रमाणे गोष्टी घडत जाणार आहेत. त्याअर्थाने हा आठवडा आपल्यासाठी लकी आहे. मोठ्या योजनांच्या आखणी आणि अंमलबजावणीसाठी हा आठवडा अनुकूल आहे. योजलेले काम पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकद लावा. नोकरी अथवा व्यवसायात प्रगतीचे नवे मार्ग सापडतील. आपल्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळणार आहे. वरिष्ठांकडून आपल्या कामाचे कौतुक होईल. सुख-सुविधांसाठी काही प्रमाणात खर्च होणार आहे. आरोग्य नरम-गरम राहील.

शुभ तारखा : 19, 21

कर्क- आळस झटका

स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडा. वास्तव स्वीकारून मेहनतीवर जोर द्या. अन्यथा समोर आलेली संधी गमावण्याची वेळ येईल. हरभर्‍याच्या झाडावर चढविण्याचा प्रयत्न होईल, त्यापासून स्वत:ला वाचवा. नोकरीच्या ठिकाणी कागाळ्या करण्यांपासून सावध रहा. आळस झटकून कामाला लागा. वेळेचे नियोजन करा आणि यशाकडे पाऊल टाका. प्रेमसंबंधांमध्ये दोघांत तिसरा आल्याने गैरसमज वाढतील. अशा वेळी संवादाने स्थितीवर मात करा. मैत्रीणीच्या मदतीने हाताबाहेर जाणारी स्थिती सावरता येईल. जोडीदार खंबीरपणे साथ देईल. शुभ तारखा : 22, 23

सिंह- अडकलेला पैसा हाती येईल

सरलेल्या आठवड्यापेक्षा हा आठवडा अधिक चांगला जाईल. वरिष्ठांच्या मदतीने घरगुती समस्येवर समाधान निघणार आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्यात सुधारणा होणार आहे. कुटुंबातील आवडता सदस्य घरी परतणार असल्याने आनंदी वातावरण राहील. मित्राच्या मदतीने मोठे व्यावसायिक करार होणार आहेत. घरासाठी किंमती वस्तू खरेदीसाठी खर्च होणार आहे. नोकरी किंवा व्यवसायात अपेक्षीत प्रगती होईल. बाजारात अडकलेला पैसा हाती येईल. प्रेमसंबंधात निर्माण झालेले गैरसमज दूर होतील. जोडीदारासोबत पर्यटनाचे योग आहेत.

शुभ तारखा : 18, 21

कन्या- चर्चेतून मार्ग काढा

काम टाळण्याच्या सवयीवर मात करा. हितशत्रूंच्या कारवाया वेळीच ओळखा. आपल्या योजना सर्वांना कळतील, असे वागू किंवा बोलू नका. अन्यथा हितशत्रू आपल्या योजनांना सुरूंग लावतील. घर किंवा जमीन खरेदी-विक्रीबाबत कोणत्याही प्रकारची घाई चांगली ठरणार नाही. कौटुंबिक समस्येवर चर्चेतून मार्ग काढा. भावंडांच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष केल्याने अडचणी वाढतील. प्रेमसंबंधांत विचारपूर्वक पाऊल टाका. आपल्या जोडीदाराच्या भावना ओळखा. त्याकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याची विशेष काळजी घ्या. जोडीदाराची आरोग्य समस्या काळजी निर्माण करणार आहे.

शुभ तारखा : 21, 24

तूळ - प्रेमसंबंधात सावधानता आवश्यक

जोशात होश गमावू नका. अति उत्साह किंवा आत्मविश्वास घातक ठरणार नाही, याची काळजी घ्या. एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना हितचिंतक, मित्रांचा सल्ला नक्की घ्या. नोकरी किंवा व्यवसायात सावधपणे पावले टाका. प्रेमसंबंधातही अधिक सावधानता बाळगा. प्रेमसंबंधांचे प्रदर्शन नाहक बदनामीचे निमित्त ठरणार नाही, याकडे लक्ष द्या. आपल्या संबंधांचा खुलासा प्रत्येकाकडे करण्याचा मोह टाळा. आर्थिक नियोजन काटेकोर करा. कोणत्याही स्थितीत जोडीदाराकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्या. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. शुभ तारखा : 18, 20

वृश्चिक - महिलांसाठी धावपळीचा आठवडा

चांगल्या दिवसांसारखे वाईट दिवसही जास्त काळ सोबत करत नाहीत. समस्यांवर एकेक करत मात करा. या आठवड्यात मित्र आणि कुटुंबातील सदस्य मदतीला असतील. संपत्तीविषयक समस्येवर वरिष्ठ किंवा प्रभावी व्यक्तीच्या मदतीने मार्ग निघाल्याने समाधान मिळेल. घरातील गरजांवर अधिक पैसा खर्च होईल. नोकरी करणार्‍या महिलांसाठी हा आठवडा धावपळीचा आहे. स्वकीयांसोबत मतभेद होतील. प्रेमसंबंधात एकमेकांवरील विश्वास वाढेल.

शुभ तारखा : 20, 23

धनू - वाहन सावधपणे चालवा

मोठ्या अडचणीवर मात केल्याने सुखद अनुभव घेण्याचे योग आहेत. आरोग्य आणि संबंधांबाबत अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. जूनी आरोग्य समस्या डोके वर काढणार आहे. वाहन सावधपणे चालवा. आठवड्याच्या मध्यात नोकरी किंवा व्यवसायात काही संधी चालून येतील. लाभ उठविण्याआधी सर्व बाजूंनी पूर्ण विचार करा. कामाच्या निमित्ताने प्रवासाचे योग आहेत. कुटुंबासोबत आनंदाने क्षण वाट्याला येणार आहेत.

शुभ तारखा : 23, 24

मकर - मेहनतीत सातत्य राखा

आठवडा संमिश्र ठरणार आहे. घरात मंगलकार्याचे योग आहेत. जीवाभावाचा मित्र मोठ्या कालखंडानंतर भेटणार आहे. घरातील व्यक्तीच्या यशामुळे आनंदी वातावरण राहील. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळणार आहे. मेहनतीत सातत्य ठेवा. नोकरी किंवा व्यवसायासंबंधी कोणताही धाडसी निर्णय घेण्यापासून अंतर राखा. त्यात आता फायदा दिसत असला तरी भविष्यात नुकसान होण्याचे संकेत आहेत.

शुभ तारखा : 18, 22

कुंभ - रोजगाराच्या संधी

रोजगारासाठी प्रयत्न करणार्‍यांना या आठवड्यात यश मिळणार आहे. कार्यक्षेत्रात वरिष्ठ आणि सहकार्‍यांच्या मदतीने अनेक दिवसांपासून खोळंबलेली कामे मार्गी लागतील. राजकारणात असलेल्यांना नव्या संधी आणि जबाबदार्‍या मिळतील. सुखसुविधांवर खर्च होणार आहे. उखळपट्टी अधिक होणार नाही, याची काळजी घ्या. अन्यथा आर्थिक समस्यांचा सामना करावा लागेल. घरातील ज्येष्ठ सदस्याचे आरोग्य चिंता वाढवेल.

शुभ तारखा : 20, 24

मीन - योजनांवर लक्ष द्या

लहान समस्यांकडे दुर्लक्ष करून आपल्या योजनांवर लक्ष केंद्रीत करा. आता हाती आलेली संधी गमावली तर नंतर पश्चातापाची वेळ येईल. प्रवास करताना आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढणार आहे. महिला धार्मिक कामांमध्ये व्यस्त असतील. प्रेमसंबंध अधिक मधूर होतील. जीवनसाथीसोबत विश्वास वाढेल.

शुभ तारखा : 19, 22

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com