साप्ताहिक राशीभविष्य
साप्ताहिक राशीभविष्य weekly horoscope Bhavishyavedh

साप्ताहिक राशीभविष्य

16 ते 22 डिसेंबर 2021

मेष - जुन्या व्याधींकडे दुर्लक्ष नको

कोर्टकचेरी यापासून एक पाऊल दूर रहा. नोकरदार वर्गाला कामकाजामध्ये गती येईल. व्यवसायात चाललेल्या घडामोडी बदलत्या राहतील. गुंतवणूक वाढवण्याच्यादृष्टीने हाती घेतलेले कार्य सफल होईल. आर्थिक बाबतीत आवक बघून जावक ठरवा. सामाजिक बांधिलकी चांगल्याप्रकारे जपाल. कुटुंबातील जबाबदारी पार पाडताना तुमची भूमिका महत्त्वाची राहील. शारीरिकदृष्ट़्या जुन्या व्याधींकडे दुर्लक्ष करू नका. सामाजिक सेवा करण्याचे पुण्य पदरी पडेल.

शुभ तारखा : 16, 17

वृषभ- बचतीत वाढ करा

अफवांवर विश्वास ठेवू नका. इतरांच्या सांगण्यावरून पटकन कृती करणे, त्यामुळे गैरसमजाचे वादळ पसरू शकते हे लक्षात ठेवा. हे तीन दिवस आपल्याला खूप सहनशीलतेने घालवावे लागतील. नोकरदार वर्गाची कामात पळापळ होऊ नये, त्यासाठी दुसर्‍यांवर अवलंबून राहू नका. व्यावसायिकदृष्ट़्या कष्टाच्या मानाने मोबदला कमी मिळेल. त्यासाठी पूर्ण तयारीने कामाचे स्वरूप ठरवा. रोखठोक व्यवहाराला महत्त्व द्या. आर्थिकदृष्ट्या बचतीत वाढ करा. जीवलग मित्रांची भेट होईल. शारीरिकदृष्ट़्या योगसाधनेला महत्त्व द्या. राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप करणे टाळा. घरातील वातावरण तप्त होणार नाही याची काळजी घ्या. पथ्यपाणी सांभाळल्यास आरोग्याला त्रास होणार नाही.

शुभ तारखा : 18, 19, 20

मिथुन- आर्थिक आवक येण्याचे मार्ग वाढतील

नोकरदार वर्गाला गतीने कामाचा आढावा घ्यावा लागेल. कामात शिथिलता ठेवून चालणार नाही. मोठ़्या उद्योगधंद्यांचे चलनवलन चांगल्या स्वरूपात चालू होईल. उद्योगिकीकरण करणे आता सोयीस्कर असेल. छोट्या व्यावसायिकांच्या अडचणी दूर होतील. व्यवसायात आजच्यापुरता विचार करू नका. आगामी काळासाठी काही नियोजन करून ठेवा. आर्थिक आवक येण्याचे मार्ग वाढतील. सार्वजनिक क्षेत्रात सध्या मन लागणार नाही. नातेवाईक व मित्रमंडळी यांना तुमच्या मदतीची अपेक्षा असेल. मुलांसोबत मनोरंजन घडेल. प्रकृति स्वास्थ्य ठीक राहील.

शुभ तारखा : 17, 18, 21

कर्क- मानसिकदृष्ट्या समाधान लाभेल

अपेक्षित फळ मिळेल. नोकरदारांना वरिष्ठांविषयी वाटणारे दडपण कमी होईल. व्यावसायिकदृष्ट़्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊनही पाहिजे असा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे आर्थिकदृष्ट़्या मागील दिवसांची पोकळी भरून निघेल. राजकीय क्षेत्रात नव्या कारकीर्दीचा उगम होईल. धार्मिक गोष्टींविषयीची आतुरता वाढेल. घरातील सदस्यांसमवेत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा कराल. मानसिकदृष्ट़्या समाधान लाभेल.

शुभ तारखा : 12, 14

सिंह- बौद्धिक ताण कमी होईल

मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा. पौर्णिमाकाळात कामकाजाचा सूर लागणारा असेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कराल. नोकरदार वर्गाला अधिकार प्राप्त होईल. तुमच्यावर सोपवलेली जबाबदारी नि:संकोचपणे पार पाडाल. व्यावसायिकदृष्ट़्या समतोलता राखणे उत्तम जमेल. व्यवसायातील बौद्धिक ताण कमी होईल. नियोजित गोष्टी घडत राहतील. आर्थिक उत्पन्न चांगले असेल. ज्या कामांमध्ये हात घालाल, त्यात यश मिळत असल्याने तुमचा स्वत:चा आत्मविश्वास वाढेल. सामाजिक स्तरावरील बदल लक्षात घ्या. ओळखीचा फायदा करून घ्याल. मित्रांसोबत वेळ घालवाल. नातेवाईकांशी सलोखा वाढेल.

शुभ तारखा : 17, 18

कन्या - व्यवसायात चढ-उतार राहील

अहंकाराला थारा देणे टाळा. विरोधकापासून दोन हात लांब राहिलेले चांगले. चांगल्या गोष्टींचा प्रयत्न सोडू नका. नोकरदार वर्गाने समोर आलेला पर्याय स्वीकारणे हेच हिताचे राहील. बेकायदेशीररीत्या गोष्टींना साथ देणे टाळा. व्यवसायात चढ-उतार राहील. भागीदारी व्यवसायात समजुतीने संवाद साधा, त्यामुळे कामातील उत्साह टिकून राहील. हिशोबाच्या नोंदी ज्या त्या वेळी ठेवा. आर्थिकदृष्ट़या कोणतेही व्यवहार रोखीने करा. सामाजिक माध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढा करा. कुटुंबातील महत्त्वाची जबाबदारी निश्चितपणे पार पाडाल. सासरवाडीकडील लोकांशी गोडीचा संपर्क ठेवा.

शुभ तारखा: 19, 21, 22

तूळ - जोडीदाराची साथ राहील

नोकरदार वर्गाला जास्त कामाचा भार उचलावा लागेल. वरिष्ठांचे दोन शब्द ऐकून घ्यावे लागतील. जोडीदाराची साथ राहील.राजकीय क्षेत्रात चौकसपणे गोष्टींचा आढावा घ्याल. दूरच्या नातेवाईकांशी काही कारणानिमित्त भेट होईल. भावंडांना योग्य सल्ला द्याल. पथ्यपाणी सांभाळल्यास आरोग्याला त्रास होणार नाही. नोकरदार वर्गाने संयम ठेवणे हिताचे राहील.आर्थिकदृष्ट़्या खर्च करताना विचारपूर्वक पाऊल उचलले पाहिजे. कौटुंबिक वाद टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या.

शुभ तारखा: 20, 22

वृश्चिक - खर्चावर नियंत्रण ठेवा

इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करणे टाळा. आपण भले व आपले काम भले हेच ध्येय या तीन दिवसांत ठेवा. अंगलट येणार्‍या गोष्टींपासून लांब राहिलेले चांगले, हे लक्षात ठेवा. स्पर्धात्मक गोष्टींच्या मागे लागू नका. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत मिळतेजुळते घ्यावे लागेल. व्यवसायाच्या माध्यमातून अनेक व्यक्तींशी संपर्क वाढेल. मात्र अनोळख्या व्यक्तींवर अवलंबून राहू नका. भागीदारी व्यवसायात गुंतवणूक करणे टाळा. आर्थिकदृष्ट़्या खर्चावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिकदृष्ट़्या हेवेदावे विसरा.

शुभ तारखा : 17, 19

धनू - आर्थिकदृष्ट्या अनपेक्षित फळ मिळेल

मनावरचा संयम सोडू नका. एखादे काम झाले नाही म्हणून राग राग करणे टाळा. शांतपणाने घेतले तर त्रास होणार नाही. नोकरदार वर्गाला महत्त्वाची जबाबदारी स्वीकारताना फार कष्ट करावे लागणार नाहीत. त्यासाठी वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. व्यावसायिकदृष्ट़्या उलाढाल मनासारखी वाढलेली असेल. केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होईल. आर्थिकदृष्ट़्या अनपेक्षित असे फळ मिळेल. राजकीय क्षेत्रात वर्चस्व राहील.

शुभ तारखा : 19, 21, 22

मकर - उत्पादनातून नफा मिळेल

नोकरदार वर्गाला कामकाजाव्यतिरिक्त मिळणारा वेळ नवीन कामासाठी देता येईल. व्यावसायिकदृष्ट़्या हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. स्वकर्तृत्वावर बर्‍याच गोष्टी साध्य कराल. उत्पादनातून नफा मिळेल. व्यावसायिक अंदाज खरे ठरतील. पैशांचे प्रश्न कमी होऊ लागतील. सामाजिक क्षेत्रातील हालचालींकडे लक्ष केंद्रित कराल. धार्मिक गोष्टीतील आनंद वाढेल. मित्रपरिवारासोबत संवाद घडेल. आरोग्य उत्तम राहील.

शुभ तारखा : 21, 22

कुंभ - आर्थिक बाबतीत दुहेरी लाभ

नोकरदार वर्गाला कामातील बदल होण्यासाठी वाट बघावी लागणार नाही. व्यावसायिकदृष्ट़्या भागीदारी व्यवसायासाठी प्रस्ताव येतील. हे प्रस्ताव स्वीकारायला हरकत नाही. प्रत्येक वेळी मन मारून मर्यादित गोष्टी कराव्या लागत होत्या, त्या आता कराव्या लागणार नाहीत. प्रश्नांची मालिका कमी झाल्याने आगामी काळाचे नियोजन करता येईल. उद्योग-व्यवसायात मोठी झेप घेता येईल. आर्थिक बाबतीत दुहेरी लाभ होईल. सार्वजनिक ठिकाणी वेळ देणे जमणार नाही.

शुभ तारखा : 16, 18, 19

मीन - घेतलेले निर्णय योग्य असतील

इतरांवर अवलंबून कोणतीही गोष्ट साध्य होत नाही हा अनुभव विसरू नका. वनस्पतिजन्य व्यवसायात गुंतवणुकीत वाढ होईल पण ती फायद्याची असेल. जे काही करायचे असेल, ते स्वत:च्या निर्णयावर करा. त्यात नक्की यश मिळेल. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य असतील. नोकरदार वर्गाला केलेल्या कामकाजाचा आराखडा वरिष्ठांकडे मांडताना योग्य शब्दांत व्यक्त व्हाल.

शुभ तारखा : 17, 20

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com