
श्री गजानन महाराजांच्या वास्तव्यामुळे शेगांव हे गाव आध्यात्मिक जगतामध्ये नावारूपास आले. विदर्भाची पंढरी म्हणूनही ओळख निर्माण झाली.. श्री गजानन महाराज सन 1878 मध्ये शेगांव येथे प्रकट झाले. त्यांचा जन्म कोठे व कधी झाला याविषयी कोणासही माहीत नाही. खुद्द महाराजांनी याबाबतीत मौन बाळगले होते. तारुण्यावस्थेत प्रकट झालेल्या महाराजांनी शेगांवमध्ये येण्यापूर्वीचा काही काळ अक्कलकोट येथे व्यतीत केला होता. श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट) यांचे मार्गदर्शन घेऊन पुढे ते नाशिकचे श्रीदेव मामलेदार यांच्याकडे येते झाले. त्यांच्याकडूनही अनुभवाचे चार शब्द घेऊन ते शेगांव येथे परतले असे मानण्यात येते. शेगांव येथे येण्यापूर्वी महाराज अकोट येथे नरसिंगजी महाराजांबरोबर बसलेले पाहिल्याची आठवण श्री गजानन विजय ग्रंथकार श्री दासगणू महाराज यांनी लिहिली आहे.
श्री गजानन महाराजांनी समाधी घेतलेल्या दिवशी शिर्डी येथे श्री साईबाबा संपूर्ण दिवस शोकावस्थेत होते. माझा भाऊ चालला असे म्हणत त्या दिवशी ते जमिनीवर गडाबडा लोळलेदेखील. या सर्व संत-माहात्म्यांनी एकमेकांविषयी उत्कट प्रेम दाखविले तरीही स्वत:च्या जन्माविषयी किंवा एकंदरीत पूर्वायुष्याविषयी फारसा ऊहापोह केलेला दिसत नाही. याविषयी महाराजांनी मौन बाळगणे हे सूचक लक्षण समजावे. वास्तविक पाहता महाराजांचे बोलणे वर्हाडी थाटाचे होते. तरीही काही प्रसंगी त्यांचे बोलणे अत्यंत स्पष्ट उच्चार व शास्त्रशुद्ध भाषा अशा पद्धतीचे असे. त्यांना चारही वेद मुखोद्गत होते.
खेडवळ भाषेसोबत क्वचित प्रसंगी उत्कृष्ट हिंदी व स्पष्ट इंगजीमध्ये त्यांनी संवाद साधल्याचे वर्णनही काही भक्तांंच्या आठवणींमधून स्पष्ट झाले आहे. महाराजांना गायनकला अवगत होती. सर्व धर्मग्रंथाचे त्यांना आकलन झाले होते. कोणत्याही घटनेविषयी सांगतांना ते अचूकपणे ओव्या व ऋचा सांगून त्यांचे स्पष्टीकरण करीत असत. महाराज अंतर्ज्ञानी होते. मात्र त्यांनी कोणत्याही भक्ताशी थेटपणे फारसा संवाद साधला नाही. त्यांचे बोलणे भरभर, परंतु त्रोटक असे. बोलत असताना समोरील व्यक्तीकडे न पाहता भिंतीकडे पाहत किंवा स्वत:मध्ये मग्न राहून ते बोलत असत. ते कुणासही उद्देश्ाून बोलत नसत. त्यामुळे त्यांचे बोलणे आपल्याशी किंवा आपल्याविषयी आहे याचे भान व तारतम्य त्यांच्या भक्तांना बाळगावे लागे.
श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट) यांच्या अनुग्रहाचे भाग्य लाभलेल्या श्री गजानन महाराजांचे व्यक्तित्वही श्री स्वामी समर्थांप्रमाणेच होते. 1878च्या फेब्रुवारीमध्ये महाराज शेगांव येथे प्रकट झाल्यावर अवघ्या महिन्या-दीड महिन्यात श्री स्वामी समर्थांनी आपले अवतारकार्य संपविले. हा वरवर दिसणारा साधासुधा प्रसंग असला तरीही आध्यात्मिक जगतात एका फार मोठ्या घटनेचं सूतोवाच करणारा होता.
गणात गण बोटंग बोटंग । जटंभू रामु पिस्तंभू रामु ।, रामै गणात गिण बोते । जतै गणात गिण बोते । आदी पदे ते हाताच्या मधल्या बोटाने (मध्यमेने) अंगठ्यावर टिचकी वाजवून म्हणत असत. हे पद म्हणत असताना ते इतके तल्लीन होत असत की, नखाच्या घर्षणाने जखमा होऊन त्यातून रक्त गळत असे. पण महाराजांचे तिकडे लक्ष नसे.
23 फेब्रुवारी 1878. उन्हाळ्याचे दिवस. दुपारची वेळ. सर्वत्र कडकडीत उन्हाचे फटकारे पडत होते. अंगाची लाही लाही करणारा विदर्भातला परिचित उन्हाळा. अशा असह्य उकाड्यात शेगांवमधील एका वडाच्या झाडाखाली एक तरुण बसून जवळच पडलेल्या उष्ट्या पत्रावळींवरील खरकटी शीतकणे वेचून खात होता. देविदास पातुरकरांच्या मुलाचा ऋतुशांतीचा विधी चालू होता. त्यानिमित्ताने भोजनाच्या पंगती उठत होत्या. जेऊन गेलेल्यांच्या उष्ट्या पत्रावळी वाड्याबाहेरील वडाच्या झाडाजवळ टाकल्या जात होत्या. तेथेच तो तरुण शांतपणे त्यामधील शीतकणे वेचून खाऊ लागला.
बंकटलाल अग्रवाल व त्यांचा मित्र दामोदर कुलकर्णी यांनी तेथून जाताना हे द़ृश्य पाहिले आणि ते तेथेच थांबले. तो तरुण दिसावयास तेज:पुंज असा. मात्र त्याचे ते उष्टे खरकटे खाणे काहीसे विचित्र वाटत होते म्हणून बंकटलाल यांनी पुढे होत भोजन हवे आहे का? असे त्यास विचारले. बंकटलालकडे त्या तरुणाने पाहिले. धीरगंभीर, तेजस्वी असा चेहरा, पाणीदार डोळे, तरतरीत नाक, ग्ाुडघ्यापर्यंत पोहोचणारे हात व विलक्षण तेजस्वी अशी अंगकांती. बंकटलाल क्षणभर गोंधळले. साक्षात परमेश्वराचे चैतन्य समोर आले आहे असे त्यांना वाटले. त्या तरुणाने मानेनेच नुसता होकार दिला.
बंकटलाल यांनी देविदासपंतांकडून जेवण आणले व पत्रावळ त्याच्यासमोर ठेवली. त्या तरुणाने निर्विकारपणे पत्रावळ समोर ओढली व तो सर्व पदार्थ एकत्र करू लागला. गोड, आंबट, तिखट, तुरट सर्व पदार्थ एकत्र करून त्याचे मोठे मोठे गोळे तोंडात घालून त्याने जेवण फस्त केले. पत्रावळीवरचे शित न् शित वेचून खाल्ल्यावर दामोदरपंतांनी त्याला पाणी हवे का?, असे विचारले तेव्हा तो तरुण चटकन म्हणाला, अरे, मी ज्या अर्थी जेवलो त्या अर्थी मला पाणी हे लागणारंच. गुरं-ढोरंसुद्धा जेवल्यावर पाणी पितात.
ओशाळवाणे होत दामोदरपंत देविदासपंतांच्या वाड्यात पाणी आणावयास गेले. तोपर्यंत त्या तरुणाने शेजारच्या ओढ्यावर जाऊन तेथेच पाणी पिऊन घेतले. हे दृश्य पाहताच दामोदरपंत म्हणाले, अहो, मी तुमच्यासाठी स्वच्छ-सुमधुर पाणी आणले आहे. तुम्ही पीत असलेले पाणी गढूळ व घाणेरडे आहे. अस्वच्छ आहे.तो तरुण त्या अस्वच्छ पाण्याची ढेकर देत म्हणाला, अहो विद्वान, पाणी हे शेवटी पाणीच. शुद्ध असलं काय की अशुद्ध असलं काय? फरक काय पडतो? आपलं मन सर्वप्रथम शुद्ध असावयास हवं. तुमचं मन घाणेरडं असेल तर हे जग तुम्हाला अस्वच्छ व घाणेरडंच दिसेल. बंकटलाल व दामोदरपंत दोघेही ओशाळले. या तरुणाने आज आपणास एक चांगलीच शिकवण दिली याचे भान राखून त्यांनी त्याला नमस्कार करण्याचे ठरविले. मात्र त्यांच्या मनातील भाव ओळखून तो तरुण तेथून भरधाव पळत सुटला व पळता पळताच दिसेनासा झाला. अशा तर्हेने अचानकपणे शेगावांत दिसलेला तो तरुण पुढे श्री गजानन महाराज म्हणून प्रसिद्धीस आला आणि विदर्भास त्यांनी पंढरपूरचे अस्तित्व दिले.
श्री गजानन महाराज येथे उष्ट्या पत्रावळीतून शिते वेचताना अन्नाच्या होणार्या नासाडीबद्दल सुचवितात, जगातल्या कित्येक कोटी बांधवांना पुरेसे अन्न मिळत नाही याचे भान राखून आपणही अन्नाची नासाडी करणे टाळले पाहिले. सर्व अन्न एकत्र करून खाण्याच्या कृतीमध्ये जणू ते सुचवितात की अन्न हे पूर्णबह्म आहे. ते उदरभरण नसून यज्ञकर्म आहे. अन्नातील सर्व रस, चव ही शरीररसात एकरूप व्हायलाच हवी. अन्नास पवित्र मानून त्याच्यातील कडू, गोड, तुरट आदी सर्व रसांचे सेवन केले पाहिजे. चौरस आहाराने शरीराचे बल वाढते. गढूळ पाणी पिण्याच्या कृतीतूनही ते भेदभावाच्या विकृतीवर हल्ला करतात. कोणत्याही गोष्टीकडे वाईट किंवा पापबुद्धीने पाहिल्यास त्याचे परिणामही वाईट स्वरूपातच भोगावे लागतात. सर्वत्र चांगल्या, स्वच्छ मनाने तसेच निकोप वृत्तीने पाहिले तर जगही आपल्याला सुंदर दिसू लागेल.
महाराजांना दत्तावतारी असं संबोधले जाते. मात्र स्वत: महाराजांनी सर्वच संप्रदायांना आपलेसे मानले. त्यांनी भक्तांना राम, दत्त, शंकर, विठ्ठल अशा अनेक स्वरूपात दर्शन दिले. स्वत:च्या समाधीस्थानावर श्रीराम, लक्ष्मण, सीता यांचे मंदिर असावे अशी इच्छा असणारे महाराज नित्यनेमाने विठ्ठलाच्या वारीसही जात असत. मेहताबशासारख्या मुसलमान संतांशीही त्यांचे सख्य होते. त्यांच्या भक्तगणांमध्ये तर विविध जाती-धर्माची माणसे होती. डॉ. लोबो हिला तर महाराजांमध्ये येशू ख्रिस्ताचे अस्तित्व जाणवले व ती महाराजमय झाली. महाराजांचे सर्व भक्तांशी असलेले वर्तन एकसारखे. कोणत्याही प्रकारचा दुजाभाव त्यात नव्हता. मात्र भक्ताची योग्यता तपासून, पारखून त्याच प्रकारची कृपा ते त्या भक्तावर करीत असत. देवादिकांनी प्रसन्न व्हावे यासाठी सर्वप्रथम तप करावे लागते, आराधना करावी लागते मगच ते प्रसन्न होतात, कृपा करतात. संतांचे तसे नसते. ते समोर आलेल्या यथायोग्य भक्तावर लागलीच कृपा करतात. त्याचे दु:ख जाणून त्याला आश्वासित करतात व हळूच त्याला आपल्या भक्तिमार्गात आणतात. त्यावेळेस कोणताही आपपर भाव राखला जात नाही. जानकीराम सोनार, कर्मठ विप्र, भास्कर पाटील, काशीचे गोसावी महाराजांशी सर्वप्रथम उद्धटपणे वागले. मात्र महाराजांनी त्यांना संशयरहित केले. त्यांना भगवंत म्हणजे काय हे चमत्कारातून पटवून दिले. पुढे ही सर्व मंडळी महाराजांची नि:स्सीम भक्त झाली.
महाराज आजही संजीवन समाधीमध्ये स्थिर आहेत. आपण मनापासून श्रद्धेने एखादी गोष्ट महाराजांपुढे मांडली असता किंवा एखाद्या समस्येसाठी साकडे घातले असता महाराजांचा त्याला त्वरित प्रतिसाद मिळतो. मात्र त्यासाठी महाराजांवर आपली पूर्ण निष्ठा व श्रद्धा पाहिजे. जानराव देशमुख, गणू जवरे, माधव मार्तण्ड जोशी, रतनसा, डॉ. कवर यांनी कठीण प्रसंगात महाराजांना अगदी हृदयापासून हाक मारली असता महाराज त्यांच्या हाकेला धावून गेले. आजही अंत:करणापासून त्यांना साद घाला, लागलीच त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतो. यामागे अनुभव आहे. या सांगोवांगीच्या कथा नव्हेत.