
सौ. वंदना अनिल दिवाणे
16 मार्च -वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. तुमची महत्वाकांक्षा दांडगी राहील. तुमचे आदर्श उच्च राहतील. स्वतंत्र बाणा असल्यामुळे आपल्या जीवनात तुम्ही इतरांना दखल देणे किंवा लुडबूड करणे अशा प्रकारच्या गोष्टी करु देणार नाहीत. तुम्ही फार मोठ्या मनाचे व उदार हृदयाचे आहात. धर्मासंबंधी वेगळी मते असतील. अंतःस्फूर्तीची देणगी प्राप्त आहे. विलक्षण बुद्धीमत्तेमुळे श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण होईल.
17 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. शनी ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्याविषयी इतरांच्या मनात अनेक प्रकारचे गैरसमज बदनामीकारक खोट्या गोष्टी भरवण्याचा शत्रूपक्ष प्रयत्न करील. त्यामुळे तुमच्या आर्थिक उत्पन्नात अडथळे येणे, नातेवाईकांशी न पटणे अशा प्रकारच्या गोष्टी घडण्याची भीती आहे. सतर्क रहावे. लवकर विवाह केल्यास तुमच्या प्रगतीच्या आड अनेक प्रकारची बंधने येतील व तुमच्या गुणांचा विकास होणे कठीण जाईल. पैशाचे आकर्षण नसले तरी आवश्यकतेप्रमाणे पैसा मिळत राहील.
18 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. निर्णय घेऊन खोलवर विचार करता कोणत्याही कार्याचे धडक कार्यक्रमात रुपांतर करण्याची तुम्हाला सवय आहे. मागून पश्चाताप करण्यापेक्षा अगोदरच एखाद्या तज्ञाचा सल्ला घेऊन मग कृती करणे फायद्याचे राहील. क्रोधी स्वभावामुळे अनेक गुप्त शत्रू निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापारी उलाढालीत भागिदारांची चांगली पारख करावी. तुमची महत्त्वाकांक्षा दांडगी राहील. अनेक प्रकारच्या अडचणींना धैर्याने तोंड देऊन तुम्ही अखेर आपले उद्दिष्ट गाठू शकाल.
19 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर सूर्य,हर्षल, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. हर्षलच्या प्रभावाने अंतःस्फूर्तीची देणगी प्राप्त झाली आहे. स्वप्नांद्वारे किंवा अन्य मार्गाने पुढील घटनांची चाहूल लागेल. मिळालेल्या सूचनांचा उपयोग करून प्रगती करण्यासाठी उपयोग करा. आर्थिक आवक वाढविण्याच्या बाबतीत भाग्यवान आहात. उच्च जबाबदारीच्या पदावर नियुक्ती होण्याची संधी आहे.
20 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्युन, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. चंद्र आणि नेपच्युन यांच्या प्रभावामुळे तुमची कल्पनाशक्ती फार चांगली राहील. त्यातून तुम्हाला कलाक्षेत्रात विशेष यज्ञ मिळेल. मात्र त्यासाठी एक पथ्य पाळणे आवश्यक आहे. ते म्हणजे कला क्षेत्रातील एखादाच विषय घेऊन आयुष्यभर त्यात बदल न करता आपले लक्ष केंद्रीत करावे. स्वतःलाच स्वतःचे गुरु मानून कलासाधना केल्यास तुम्हाला यश मिळेल. लक्ष्मीची कृपा असूनही तिला धरून ठेवणे कठीण जाईल.
21 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरु, रवि या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे बौद्धिक कार्य उरकण्याची इतकी प्रचंड शक्ती तुमच्याजवळ राहील की कितीही काम केले तरी त्या कामात तुम्हाला थकल्यासारखे वाटणार नाही. या एकाच कारणामुळे उद्योगाच्या कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला प्रचंड यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. भव्य आणि दिव्य गोष्टीचे तुम्हाला फार आकर्षण राहील.
22 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, मंगळ, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. जीवनामध्ये तुम्हाला सुरुवातीच्या आयुष्यात नातेवाईक कुटुंबातील लोक आणि पत्नीच्या नातेवाईक यांच्याकडून बराच त्रास होण्याचा संभव आहे. तुमच्याकडून घेणारे बरेच लोक असले तरी तुम्हाला देणारा कुणीच नाही. त्यामुळे कुठल्याही प्रगतशील उद्योगात तुम्हाला स्वतःवरच अवलंबून रहावे लागेल. तुम्हाला दृष्टांत, स्वप्नसृष्टी किंवा त्याशिवाय पुढील घटनांची आधीच चाहूल लागेल. स्वमिळकतीपेक्षा वारसाहक्काने संपत्ती भरपूर मिळेल.