किरोच्या नजरेतून

2 ते 8 मार्च 2023 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे जन्मतारखेनुसार भविष्य..
किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

2 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्युन व गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. तुमची कल्पनाशक्ती चांगली आहे. त्यामुळे कला क्षेत्रात तुम्हाला जास्त यश मिळू शकेल. मात्र त्यासाठी काही पथ्य पाळावे लागेल. एक तर तुम्ही आपली निश्चयात्मक शक्ती वाढवली पाहिजे आणि दुसरे असे की हातात घेतलेल्या कामात सारखा बदल करु नये. असे केल्यास तुम्हाला जीवनात उत्तम यश मिळेल. आर्थिक स्थिती वर खाली होत राहील. अवाक्याबाहेरच्या कल्पना कृतीत आणण्याचा प्रयत्न करू नये.

3 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. तुमच्या सूर्य राशीचा स्वामी देखील गुरुच असल्यामुळे तो अत्यंत प्रबळ झाला आहे. त्यामुळे तुमची महत्वाकांक्षा दांडगी तर राहीलच. शिवाय कितीही बौद्धिक काम केले तरी तुम्हाला थकवा येणार नाही. तुम्ही कोणताही व्यवसाय अथवा नोकरी निवडलेली असो. त्यात प्रगती करणे तुम्हाला सोपे जाईल. सहकार्याच्या बाबतीत तुम्ही भाग्यवान असाल. तुमचे भागीदार व तुमच्या हाताखाली काम करणारे लोक तुम्हाला चांगले सहकार्य देतील. विपुल धनप्राप्तीची महत्त्वाकांक्षा राहील.

4 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, गुरु, सूर्य या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. हर्षलच्या अस्तित्वामुळे तुमचे विचार, परंपरा आणि रुढीच्या विरुद्ध असणार आहेत. सुरुवातीच्या जीवनात तुम्हाला अनेक प्रकारचे दुःख, संकटे, नातेवाईकांशी वितुष्ट यांच्यापासून त्रास होण्याची शक्यता आहे. सगळ्यांना तुमच्याकडून काही मिळावे अथवा घ्यावे अशी अपेक्षा वाटेल. तुम्हाला मदत करणारा मात्र कोणीच नसल्यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहून तुम्ही तुमच्या भावी आयुष्याच्या योजना बनवाव्यात. तुमचे विचार मौलिक व अपारंपारिक आहेत. संपत्ती चांगल्याप्रकारे टिकवून ठेवाल.

5 मार्च- वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. गुुरूला बुधाची मिळालेली साथ अतिशय चांगली असली तरी युतीचा उपयोग चांगल्या की वाईट कामासाठी करता यावर अवलंबून आहे. सकारात्मक बुद्धीमत्तेचा उपयोग योग्य केल्यास जीवन कृतार्थ होईल. आयुष्याचा पूर्वार्ध कष्टदायक गेला तरी उत्तरार्ध सुखात जाईल. पैसे मिळवणे सोपे असले तरी मिळालेले पैसे टिकवणे जड जाईल. वृद्धापकाळासाठी तरतूद करावी.

6 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र व गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. तुमच्या ग्रहांची चौकट इतकी छान आहे की जीवनात अपयश येणे ही गोष्ट तुमच्यासाठी अशक्य आहे. तुम्हाला सौंदर्याचे फार वेड राहील. यामुळे संगीत, चित्रकला, काव्य, वाङमय अशा प्रकारच्या गोष्टीत चांगले यश मिळेल. तुमचा स्वभाव अतिशय भावनाप्रधान असल्याने दुसर्‍याच्या त्रासाच्या वेळी त्यांना मदत करण्यासाठी धावून जाल. तुम्हाला पुष्कळ मित्र असतील व ते सर्व तुमचे भक्त असतील. निरनिराळ्या मार्गांनी पैसा येत राहील.

7 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर नेपच्युन, चंद्र, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. तुमची महत्वाकांक्षा दांडगी राहील. स्वतंत्र वृत्ती व आदर्शवाद याच्यामुळे तुमचे जीवन इतरांपेक्षा निश्चितपणे वेगळे राहील. तुम्ही मोठ्या मनाचे असले तरी धार्मिक गोष्टीबद्दल तुमची अशी स्वतंत्र मते असतील. भविष्यात घडणार्‍या घटनांची चाहूल चालू राहील. गूढ शास्त्रांचे धनसंग्रहाशी काहीसे वाकडे झाल्यामुळे धनप्राप्तीच्या बाबतीत तुम्ही इतके सतर्क राहणार नाही आणि तरी तुमच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्यामुळे व त्यात दैवीशक्तीचा भाग असल्याने तुम्ही श्रीमंत व्हाल.

8 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनी, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. आयुष्याच्या सुरुवातीला तुम्हाला बरेच कष्ट व संघर्ष करावा लागेल, परंतु वयाच्या 33 किंवा 35 वर्षानंतर तुमच्या आयुष्याची गाडी रुळावर चढल्याप्रमाणे सुरळीत चालेल. तुमच्याविषयी अनेक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न तुमचे विरोधक करतील. दुःखांना, संकटांना तुम्ही आत्मविश्वासाने, निश्चयाने महत्वाकांक्षेवर डोळा ठेवून तोंड देऊन आपले लक्ष प्राप्त करण्यात सफल व्हाल यात शंका नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com