किरोच्या नजरेतून

23 ते 29 मार्च 2023 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे जन्मतारखेनुसार भविष्य..
किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

23 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, गुरु, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. तुम्हाला जीवनामध्ये उत्तम यश मिळू शकते. मात्र त्यासाठी जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन सकारात्मक असणे आवश्यक आहे. कुसंगती आणि कुविचार यापासून दूर राहणे तुमच्यासाठी फार आवश्यक आहे. तुमची बुद्धीमत्ता तीक्ष्ण असून त्याचा उपयोग धनप्राप्तीसाठी चांगला होईल. विशेषतः शेअर्स संबंधीत व्यवहारात तुम्हाला जास्त यश मिळेल. मात्र मिळालेले पैसे सांभाळणे खर्चाच्या वाढत्या प्रमाणामुळे शक्य होणार नाही. धनसंग्रहात अडचणी येत असल्यामुळे वृद्धापकाळासाठी तरतूद करून ठेवावी.

24 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, मंगळ, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. तुमच्या ग्रहांची चौकट इतकी सबळ आहे की काही विशेष चूक झाली नाही तर जीवनात तुम्हाला सहज यश मिळेल. तुम्हाला सौंदर्याचे फार वेड असल्याने संगीत, पेंटींग, काव्य, साहित्य इ. कलांबद्दल फार आकर्षण वाटेल. स्वभाव भावनाप्रधान असल्याने गरीब व दुःखी व्यक्तींबद्दल अतिशय सहानुभूती वाटल्याने स्वतःची झीज सोसून तुम्ही त्या व्यक्तीला मदत कराल. अनपेक्षित मार्गाने धनप्राप्ती होईल.

25 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर नेपच्युन, चंद्र, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. तुमची महत्वाकांक्षा दांडगी राहील. तुमचे आदर्श उच्च प्रकारचे असतील. स्वतंत्र बाण्याप्रमाणे आपल्या मनाप्रमाणे वेगळ्या पद्धतीने राहण्याची तुम्हाला फार हौस वाटेल. तुम्हाला धार्मिक भावना उदार असल्या तरी त्याविषयी तुमची मते भिन्न आणि वेगळ्या प्रकारची असतील. तुमच्याभोवती घडणार्‍या घटना व नैसर्गिक बदल यामागील गूढ व्यक्तीचा वेध घेण्याचा तुम्हाला फार आवड वाटेल. त्यामुळे काहींना स्वप्नातून पुढील घटनांची सूचना प्राप्त होणे शक्य आहे. पैशाला तुमचे आकर्षण वाटेल व तुम्ह श्रीमंत व्हाल.

26 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनी, गुरू, मंगल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. शनीच्या प्रभावाने व्यक्तीमत्वाला उदासीनतेची झालर असण्याची शक्यता आहे. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. त्यासाठी शनी भरपूर कष्ट करून घेईल. कंटाळा न वाटता हौस आणि आनंदच वाटेल. मिळालेल्या यशामुळे अनेक गुप्तशत्रु निर्माण होतील. मत्सराची बाधा झाल्याने बदनामी करणे, गुप्त कारस्थाने करणे, असा त्रास देतील. भरपूर प्रमाणात अर्थप्राप्ती होत राहील.

27 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. मंगळाच्या प्रभावामुळे कोणताही निर्णय त्वरीत घेऊन त्याप्रमाणे तडकाफडकी कृती कराल. सदैव बेचैन असल्यामुळे चिडचिड करण्याची सवय असण्याची शक्यता आहे. सावध रहा. आयुष्यभर आर्थिक स्थितीमध्ये नेहमीच वर खाली होत राहील. तुमच्या सल्ल्याने इतर श्रीमंत होतील. तुम्ही तसेच रहाल.

28 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, रवि, गुरु, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. रवि आणि हर्षल यांच्या एकत्रितपणामुळे स्वभाव अत्यंत संवेदनशील राहील. अंतःस्फूर्तीची देणगी प्राप्त आहे. करिअर किंवा राहण्याच्या स्थळाविषयी बदल करण्यापूर्वी इतरांचा सल्ला घेण्यापेक्षा स्वतःच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्यास जास्त फायद्याचा राहील. सुरूवातीला निर्णय तोट्याचा वाटला तरी शेवटी त्यात जास्त फायदा असल्याचे दिसून येईल. उतावळ्या स्वभावामुळे कोणत्याही कामात विलंब झालेला आवडणार नाही. आर्थिक बाबतीत भाग्यवान आहात संधी तुम्हाला शोधत येईल.

29 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, मंगळ, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. कलाक्षेत्राकडे जास्त ओढ राहील. इच्छाशक्ती व निर्णयशक्तीत वाढ करून त्याप्रमाणे न डगमगता कृती केल्यास जीवनात प्रचंड यश मिळू शकेल. मात्र हे फक्त कलाक्षेत्रात लागू आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी. नैसर्गिक सौंदर्य, रंगसंगती, सूरसौंदर्य यांची चांगली जाण राहील. त्यामुळे आवडत्या कलाक्षेत्रात प्रगती करणे सोपे जाईल. भौतिक सुखाचे आकर्षण नसल्याने सुरूवातीचे आयुष्य खडतर जाण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत अनिश्चीतता असेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com