Sunday, April 28, 2024
Homeभविष्यवेधरेषांचे दोन तुकडे गोविंदाच्या यशाला आडवे!

रेषांचे दोन तुकडे गोविंदाच्या यशाला आडवे!

प्रफुुुल्ल कुलकर्णी

मसाला-कॉमेडी चित्रपटांचा स्टार म्हणून नाव घ्यायचे असल्यास अभिनेता गोविंदा यांचे नाव ओघाने येते. बोलका अभिनय, विनोदाचे अचूक टायमिंग आणि भन्नाट नृत्य या जोरावर त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. 90 च्या दशकात विनोदी चित्रपट आणि गोविंदा हे समिकरणच झाले होते. या काळात अनेक चित्रपट हिट झाले.

- Advertisement -

या चित्रपटांतील फडकती गाणी आणि त्यावरील गोविंदांची डान्स स्टाईल यावर प्रेक्षक आजही फिदा आहेत. मात्र त्यांच्या यशाचा काळ लवकरच ओसरला. त्यांचे समकालीन अभिनेते आजही पडदा गाजवत असताना गोविंदांना चित्रपट मिळेनासे झाले. हे असे का घडले? याचे उत्तर त्यांच्या हातावर आहे. शनी ग्रहावर असणारे हृदय रेषेचे दोन तुकडे आडवे आहेत. यामुळे मोठी झेप घेण्यात अडथळा आला.

गोविंदा यांचा जन्म 21 डिसेंबर 1963 रोजी झाला. तत्कालीन अभिनेते अरुणकुमार आहुजा आणि गायिका-अभिनेत्री निर्मलादेवी यांचे ते सुपूत्र. त्यांच्या आई वाराणसीच्या. वडील अरूणकुमार 1930 च्या दशकात अभिनेता होण्यासाठी तत्कालीन पाकिस्तानात असलेल्या गुजरांवाला (पंजाब) या शहरातून मुंबईत आले. अभिनेता म्हणून गोविंदा यांच्या वडीलांची व्यावसायिक कारकीर्द 1939 ते 1954 अशी 15 वर्षे चालली. या वर्षांत त्यांनी 30 चित्रपटांमध्ये नायक म्हणून काम केले.

मुंबईच्या कार्टर रोडवरील एका बंगल्यात राहणारे हे कुटुंब उत्तर मुंबई उपनगरातील विरार येथे स्थायिक झाले. जिथे गोविंदाचा जन्म झाला. 6 मुलांपैकी ते सर्वात लहान. भाऊ कीर्तीकुमार हा अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि गायक तर बहीण कामिनी खन्ना या लेखक, संगीत दिग्दर्शक आणि गायिका. त्यांचे काका आनंद सिंग हृषिकेश मुखर्जी यांचे सहाय्यक दिग्दर्शक होते. वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर वडिलाच्या सल्ल्यानुसार गोविंदा यांनी चित्रपटांकडे मोर्चा वळविला. काका आनंद दिग्दर्शित ‘तनबदन’मध्ये ते पहिल्यांदा झळकले. 1985 मध्ये त्यांच्या ‘लव्ह 86’ चे शूटिंग सुरू झाले. मात्र ‘इल्जाम’ त्याआधी रिलीज झाला.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवून दिले. त्यानंतर प्रदर्शित झालेला ‘लव्ह 86’ दखिल हिट झाला. त्यानंतर गोविंदा 165 चित्रपटांमधून झळकले. दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा एक फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी जिंकला. शोला और शबनम, आंखे, राजा बाबू, कुली नंबर 1, हिरो नंबर 1, दीवाना मस्ताना, दुल्हे राजा, बडे मियाँ छोटे मियाँ, अनाडी नंबर 1 आणि जोडी नंबर 1, हसिना मान जायेगी, हद करदी आपने, साजन चले ससुराल हे त्यांचे गाजलेले चित्रपट.

गोविंदा 2004 ते 2009 पर्यंत लोकसभा खासदार होते. काँग्रेसच्या तिकीटावर मुंबई उत्तर मतदारसंघातून ते निवडून आले होते. 2007 मध्ये पार्टनर या चित्रपटातून त्यांनी पडद्यावर पुनरागमन केले. राजकारण न रूचल्याने 2008 मध्ये त्यांनी राजकारण सोडून त्याच्या अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर त्यांच्या वाट्याला भुमिका आणि यश माफकच आले.

अभिनेता गोविंदा स्टार तर झाले मात्र त्यांना सुपरस्टारच्या बिरूदाने हुलकावणी दिली. त्यांची अभिनय कारकीर्द पहिली तर त्यांच्यात अभिनेत्याला आवश्यक सर्व गुण आहेत. त्यांचे विनोदी चित्रपट बॉक्स आफिसवर प्रचंड लोकप्रिय ठरले. अभिनयाचा कस लागेल असे चित्रपट त्यांच्या वाट्याला अभावानेच आले. त्यांच्याकडे अभिनयाचा वारसा घरातून होता. चित्रपटात काम मिळविण्यासाठी त्यांना झगडावे लागले नाही. त्यामुळे चंदेरी दुनियेत त्यांचे पदार्पण लवकर झाले. विनोद, नृत्य व मसाला चित्रपटांतून निखळ मनोरंजन करत ते प्रेक्षकांच्या मनात शिरले. मात्र पुढील वाटचाल मर्यादित राहिली.

हस्तसामुद्रिकदृष्ट्या गोविंदा यांच्या हाताच्या रेषा व ग्रह यांचा विचार करता ते भाग्यवंत किंवा नशीब घेऊनच आलेले आहेत. कारण भाग्य रेषा आयुष्य रेषेतून उगम पावते. तसेच बुध रेषा व रवी रेषा उत्तम आहे. बुध रेषा ही हुशारी देते व रवी रेषा ही मानसन्मान देते. रवी रेषा मधल्या बोटाकडे म्हणजे शनी ग्रहाकडे वळाली असल्याने अशा व्यक्तींना व्यावहारिक चिंता जास्त असते व ते पैसे मिळणार म्हणून चित्रपट स्वीकारतात. त्यात त्यांची व्यक्तीरेखा व अभिनयाच्या कौशल्याबाबत विचार नसतो.

कायम व्यग्र राहून दोन-दोन शिफ्टमध्ये काम करून अधिक पैसा मिळविण्याचा त्यांचा कल असतो व हीच बाब गोविंदा यांच्याबाबत दिसून आली. त्यांच्या हातावरील ग्रहांचा विचार करता हातावरील ग्रह उच्च व शुभ स्थानी आहेत. हातावरील मस्तक रेषा चंद्र ग्रहावर गेली आहे. तसेच मस्तक रेषेचा एक स्वतंत्र तुकडा चंद्र ग्रहावर आडवा आहे. तो अभिनय कौशल्य देतो. हातावरील चंद्र ग्रहाचा उंचवटा मनगटाकडे शुक्र ग्रहापेक्षा जास्त मोठा आहे. हा आत्यंतिक हुशारी प्रदान करतो. गोविंदा यांच्याकडील नृत्य शैली वादातीत आहे. त्यांच्या नृत्याने प्रेक्षक आजही रोमांचित होतात. नृत्य करताना त्यांचा अभिनय अथवा चेहर्‍यावरील हावभाव हे त्यांच्या मनस्वी व अथक परिश्रमाची परिणीती आहे. परिश्रम करण्याची मानसिकता व व्यावहारीपणा हा गोविंदा यांच्या हातावरील मस्तक रेषेचा एक फाटा वरच्या मंगळ ग्रहाकडे मार्गस्थ झाल्यामुळे आहे.

गोविंदा यांच्या हातावरील ग्रहांचा विचार करता हातावरील ग्रह व रेषा उच्च व शुभ स्थानी आहेत. मग ते सुपरस्टार म्हणून का नावाजले गेले नाहीत? त्यांच्या वाट्याला अभिनयाचा कस लागेल असे चित्रपट का आलेे नाहीत? ते सर्वगुणसंपन्न असूनही अपयशाचा सामना का करावा लागतो आहे? त्यांच्या बरोबरचे अभिनेते विविध जाहिरातींच्या माध्यमांतून आजही सक्रीय आहेत, चित्रपटांत व्यस्त आहेत. मग गोविंदा मागे का पडले? हस्तसामुद्रिकदृष्ट्या अभ्यास करताना हातावरील शनी ग्रहावर असणारे हृदय रेषेचे दोन तुकडे आडवे आहेत व हे तुकडे नशिबाला ब्रेक लावण्यास कारणीभूत आहेत.

शनी ग्रहावरील दोन आडव्या रेषा त्यांच्या हातावरील गुरु ग्रहाच्या बाजूने म्हणजेच पहिल्या बोटाच्या बाजूने भाग्य रेषेजवळ जे आडवे दोन रेषांचे तुकडे आहेत ते गोविंदा यांच्या नशिबाला आडवे आले आहेत. अशाच प्रकारची आडवी शनी ग्रहावरची रेषा आपण दिग्विजय सिंग यांच्या हातावरही अभ्यासली आहे. शनी ग्रहावरील भाग्य रेषेपाशी असलेल्या आडव्या रेषा जितक्या मोठ्या किंवा संपूर्ण शनी ग्रह व्यापात असतील तर व्यक्तीचे सहज होणारे कामे होत नाहीत व नशीब त्यांना मागे खेचते. ही शनी ग्रहावरील आडवी रेषा जेवढी गडद रंगावर व जाड असेल तर ती अधिक जास्त अशुभ असते, त्या मानाने पातळ बारीक व फिक्क्या रंगावरील अथवा छोटी आडवी रेषा ही व्यक्तीच्या आयुष्यात कमी अडथळे आणते.

ज्योतिष शास्त्राचा विचार केला तर शनी ग्रहावरील भाग्य रेषेपाशी असलेल्या आडव्या रेषा संपूर्ण शनी ग्रह अथवा अंशतः व्यापात असतील तर तो पितृदोष समजला जातो. पितृदोष हा त्या व्यक्तीला आयुष्यात त्याची जेवढी विद्वता व हुशारी असेल तितक्या प्रमाणाते त्याला यश देत नाही. या व्यक्तींना आयुष्यात अडथळ्यांचा सामना करावा लागतो. छोटी छोटी सहज होणारी कामे होत नाहीत, काही कामे त्या कामातील रस निघून गेल्यावर होतात किंवा कायम स्वरूपी पेंडींग राहतात. शनी ग्रहावरील ही आडवी रेषा ज्या व्यक्तीच्या हातावर असेल तर ती त्यांच्या आयुष्यात स्पीड ब्रेकरचे काम करते. त्यांच्या कामाचा वेग मंदावतो व अडथळा येतो. अशा वेळेस बाकीचे सहकारी व भाग्यवान लोक पुढे निघून जातात. दोष निवारण शास्त्रानुसार कमी करता येतात व कामात येणारे अडथळे कमी होतात किंवा येत नाहीत.

गोविंदा यांच्या उजव्या कर्माच्या हातावर शनी ग्रहावर असणार्‍या आडव्या रेषा या पितृ दोषाच्या रेषा आहेत. गोविंदा यांना पितृ दोष असल्याने त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा अडथळ्यांचा सामना करावा लागला व त्यांची हुशारी, विद्वत्ता, अभिनय कौश्यल्य, नृत्ये, अष्टपैलू, देखणे व्यक्तिमत्व, चित्रपटात मिळणारी सहज संधी व परिपूर्ण अभिनेत्याचे गुण असूनही ते सुपरस्टार या बिरूदापर्यंत पोहचण्यात अपयशी ठरले.

- Advertisment -

ताज्या बातम्या