अ‍ॅक्शनपटांचा पहेलवान!

भविष्य आपल्या हाती
अ‍ॅक्शनपटांचा पहेलवान!

धमाल मालिकेतील अ‍ॅक्शन-कॉमेडीपट असो किंवा सिंघम मालिकेतील देमार चित्रपट. यांचा उद्देश एकच...मनोरंजन. या मनोरंजनाच्या दुनियेत रोहित शेट्टी नावाचा अ‍ॅक्शनपट निर्माता, दिग्दर्शक आता चांगलाच स्थिरावला. एकाअर्थी तो विद्यमान भारतीय अ‍ॅक्शनपटांचा पहेलवानच! रोहितच्या चित्रपटांचे लॉजिक काय, हा प्रश्न बाजूला ठेवला की त्याचे चित्रपट एन्जॉय करता येतात आणि भारतीय प्रेक्षक त्याचा निखळ आनंदही घेतात.

रोहितचा जन्म 14 मार्च 1974 ला झाला. हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि टिव्ही होस्ट अशा अनेक भूमिका पार पाडताना रोहित मधील पहेलवान नजरेस पडतोच. गोलमाल या चित्रपटाच्या मालिकांमधून रोहितने अ‍ॅक्शन-कॉमेडीचा असा काही तडका लावला की त्याचे चित्रपट म्हणजे मनोरंजनाची गॅरंटी याबाबत प्रेक्षकांमध्ये दुमत नसते. कॉप युनिव्हर्स म्हणजेच सिंघम मालिकेनेही त्याने एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. बोल बच्चन (2012), चेन्नई एक्सप्रेस (2013) दिलवाले (2015) या चित्रपटांनीही यशाचे नवे उच्चांक गाठले.

रोहित शेट्टी यांचे वडील चित्रपटातील हाणामारीच्या दृश्यात एक्स्ट्रा म्हणून झळकायचे. सहायक अभिनेता, स्टंटमन आणि फाईट डायरेक्टर अशी त्यांची कारकिर्द. बलदंड देह ही रोहितला वडिलांकडून मिळालेली प्रेरणा. रोहितनेे वयाच्या 17 व्या वर्षी बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगणचा पहिला चित्रपट ‘फूल और कांटे’मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर अजय देवगण आणि अक्षयकुमारच्या ‘सुहाग’ या चित्रपटातही तो सहाय्यक दिश्दर्शक होता. त्यानंतर ‘प्यार तो होना ही था’, ‘हिंदुस्तान की कसम’ आणि ‘राजू चाचा’ या चित्रपटांमधून अजयने रोहितला सहायक दिग्दर्शक म्हणून संधी दिली.

रोहितने 2003 मध्ये अजय देवगणसोबत जमीन या चित्रपटापासून स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. मात्र त्याला यश मिळाले 2006 मध्ये ‘गोलमाल’पासून! अ‍ॅक्शन कॉमेडी असलेला ‘गोलमाल’ हा चित्रपट भन्नाट हिट झाला. कॉमिक थ्रिलर संडे, गोलमाल रिटर्न्स, ऑल द बेस्ट: फन बिगिन्स पुढील दोन वर्षात झळकले. गोलमाल 3 तर थेट 100 कोटी व्यवसाय करणारा चित्रपट ठरला. या यशानंतर अधिक खुलेपणाने दिग्दर्शिय प्रयोग करण्यासाठी रोहित सज्ज झाला होता. पुन्हा एकदा मित्र अजय देवगणला त्याने ‘सिंघम’च्या अवतारात प्रेक्षकांसमोर सादर केले. या अ‍ॅक्शनपटाला चाहत्यांनी डोक्यावर घेतले. आज चर्चा असलेल्या कॉप युनिव्हर्स या पोलीस अ‍ॅक्शनपट मालिकांतील हा पहिला चित्रपट. 2012 मध्ये कॉमेडी ‘बोल बच्चन’ही हिट ठरला. रोहितने सुपरस्टार शाहरूख खान आणि दीपिका पदुकोणसोबत ‘चेन्नई एक्सप्रेस’ही सुपरहिट ठरला. 2013 मध्ये देशांतर्गत सर्वाधिक कमाई करणारा तर परदेशात तिसरा-सर्वाधिक कमाई करणारा बॉलीवूड चित्रपट म्हणून चेन्नई एक्सप्रेसची नोंद झाली. कमाईचे अनेक रेकॉर्ड चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटाने प्रस्थापित केले.

2014 मध्ये रोहित पुन्हा एकदा अजय देवगणसोबत ‘सिंघम रिटर्न्स’ घेऊन आला. 2011 च्या सिंघमचा हा सिक्वेल होता. रोहित 2014 मध्ये टेलिव्हिजन स्टंट गेम शो ‘फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी’ शोचा परीक्षक होता. शाहरुख खान आणि काजोल अभिनयीत 2015 मध्ये प्रदर्शित झालेला ‘दिलवाले’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला.

आज काल चित्रपटातील नायक पिळदार शरीरयष्टीचे असतात. पिळदार शरीरयष्टीसाठी अभिनेते मेहनत करीत असतात. नृत्य आले नाही तरी चालेल, अभिनयात कमी पडलो तर जमेल पण शरीरयष्टी पिळदार असावी, असा अनेक अभिनेत्यांचा ध्यास असतो. एकेकाळी पडद्यावरील अभिनेत्याला दाढी मिशी नसायची. आता दाढी मिशी व पिळदार शरीरयष्टीची क्रेज आहे. रोहितचे वडील हाणामारी दृश्यात दिसणार्‍या अनेकांपैकी एक असायचे. मात्र त्यांनीच रोहितला सिनेमासृष्टीतील बारकावे शिकवले. रोहितलाही कुस्तीची आवड. एकाअर्थी तो पहेलवानच. मात्र आता तो चित्रपट क्षेत्रात दिग्दर्शक म्हणून पहेलवान ठरला आहे.

रोहितला चंदेरी दुनियेशी ओळख जशी कारकिर्दीत कामाला आली त्याप्रमाणे त्याच्या हातावरची मस्तक रेषा गुरु ग्रहावरून उगम पाऊन थेट मणिबंधापर्यंत गेलेली असल्याने रोहितच्या कल्पनाशक्ती व प्रसंगांचे नाट्यपूर्ण चित्रण करून प्रेक्षकांना रोमांचित करण्याची कला आत्मसात केली आहे. रोहितच्या चित्रपटात धाडसी व खिळवून ठेवणार्‍या दृश्यांचा भडीमार असतो. अजय देवगण, अक्षय कुमार, रणबीर सिंग यांना साजेशा पोलीस अधिकार्‍याच्या भूमिका उभ्या करण्यात तो यशस्वी झाला आहे.नाट्यमय प्रसंगातच विनोद निर्माण करण्याची त्याची हातोटी केवळ हातावरील असाधारण लांब असलेल्या मस्तक रेषेमुळे आहे. त्याला विनोद आवडतो. विनोदाचे नाट्य रूपांतरण करण्याची हातोटी आहे. मिश्किल विनोद, हाणामारीची दृश्ये, त्यात सस्पेन्स यांची रेलचेल त्याच्या चित्रपटांमध्ये असते. गुरु ग्रहावरून उगम पावणारी हृदय रेषा सज्जन व विद्वान व्यक्तिमत्वाची पावती देते. सर्वांशी सलोख्याचे व प्रेमळ संबंध कायम स्वरूपी ठेवण्यात हृदय रेषा मोलाची कामगिरी बजावते आहे. भाग्य रेषा आयुष्य रेषेजवळ बर्‍याच खाली उगम पाऊन मस्तक रेषेकडे जाताना वयाच्या 30 च्या सुमारास जास्त तेजस्वी व सरळ झाल्याने लहानपणी सामान्य आयुष्य काढलेल्या रोहित यांचे भाग्य उजळण्यास सुरूवात झाली. वयाच्या 30 वर्षापासून आज वयाच्या 47 वर्षांपर्यंत रोहितने अब्जाधीश होण्यापर्यंत प्रवास केला आहे.

रवी रेषा व भाग्य रेषेचा उगम मनगटाच्या थोडे वर एकत्रित झाला आहे. भाग्य रेषा मधल्या बोटाकडे म्हणजेच शनीकडे गेली आहे. रवी रेषा तिसर्‍या बोटाकडे म्हणजेच रवीच्या बोटाच्या खाली शनी बोटाला उजव्या बाजूला जवळ असल्याने प्रसिद्धी बरोबरच आर्थिक लाभ होत गेला. सर्व प्रयत्नांना यश मिळत गेले. सुरवातीच्या काही वर्षांत म्हणजे वयाच्या 17 वर्षापासून सह दिग्दर्शक म्हणून काम करताना व त्यानंतर वयाच्या 25 वर्षापर्यंत नशीब मेहेरबान नाही. मात्र वयाच्या 30व्या वर्षापासून मागे वळून पहिले नाही. वयाच्या 55 वर्षापर्यंत रोहितचा जलवा कायम राहणार आहे. हातावरील अंगठा मजबूत आहेच. शिवाय अंगठ्याची पहिले आणि दुसरे पेरे अत्यंत उत्तम आहे. अंगठ्याचे पहिले पेर हे कल्पना शक्ती देते व दुसरे पेर हे कल्पना शक्तीची तातडीने अंमलबजावणी करण्याचे काम करते. या स्वभावामुळे आळस नाही. ठरलेले काम वेळेत पूर्ण करण्याची मानसिकता आहे. बाकीचे चार बोटे, तळ हातापेक्षा लांबीला आखूड असल्याने मागचा पुढचा अडचणींचा विचार न करता निर्णय त्वरित घेण्याच्या सवयीमुळे कामे वेगाने उरकली जात आहेत. मस्तक रेषा चंद्र उंचवट्यावर मणी बंधापासून थोडीशी वर चंद्र उंचवट्यावर हाताच्या बाहेर गेली आहे. मस्तक रेषा आयुष्य रेषा व मस्तक रेषेच्या एकत्रीकरणानंतर वयाच्या 20 व्या वर्षी वेगळी होऊन स्वतंत्र झाली आहे. जेव्हा मस्तक रेषा व आयुष्य रेषा एकत्रित असतात तेव्हा निर्णयक्षमता कुंठित असते व जेव्हा मस्तक रेषा आयुष्य रेषेतून वेगळी होते तेव्हा व्यक्ती स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास सक्षम होतो. कलात्मक शक्ती या मस्तक रेषेतून अत्यंत प्रगल्भ व प्रभावी असल्याने व अशी रेषा लाखो लोकांमध्ये क्वचितच दृष्टीस पडणारी आहे. अत्यंत लांब मस्तक रेषा तर मी आयुष्यात प्रथम रोहितच्या हातावर पहिली आहे. मी दहा हजारांवर हात बघितले, त्यापैकी एकाच्याही हातावर एवढी हुशारी व कल्पना शक्तीचा एकत्रित मिलाफ असलेले अत्यंत दुर्मिळ मस्तक रेषा नाही. या मस्तक रेषेमुळेच रोहित आज कला क्षेत्रात चमकत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com