मंगळ रेषेने सोडलेली साथ!

भविष्य आपल्या हाती
मंगळ रेषेने सोडलेली साथ!

प्रफुुुल्ल कुलकर्णी

देशाचे पहिले सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांचा अपघाती मृत्यू देशाला चटका लावून गेला. सामरीकदृष्ट्या अत्यंत अनुभवी सैन्य सेनापती भारताने गमावला. भारतीय सैन्य आणि देशासाठी हा मोठा आघातच ठरला. हस्तसामुद्रिक अभ्यास करताना जनरल रावत यांच्याबद्दल काही निरीक्षणे समोर येतात. त्यात काही संकेत दडले आहेत, ते आज आपण पाहणार आहोत.

मात्र त्याआधी जनरल रावत यांच्या दैदिप्यमान प्रवासाचा आढावा घेतला पाहिजे. त्यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी सध्या उत्तराखंड राज्यात असलेल्या गढवाल जिल्ह्यातील पौरी शहरात झाला. त्यांचे कुटुंब भारतीय सैन्यात अनेक पिढ्यांपासून सेवा बजावत आहे. वडील लक्ष्मणसिंग रावत यांनी 1951 मध्ये 11 गोरखा रायफल्समध्ये कमिशन घेतले. ते 1988 मध्ये लष्कराचे उपप्रमुख व लेफ्टनंट-जनरल म्हणून निवृत्त झाले. त्यांची आई उत्तरकाशी येथील विधानसभेच्या माजी आमदारांची कन्या होत. जनरल बिपीन रावत यांचे डेहराडूनमधील कँब्रियन हॉल स्कूल आणि शिमला येथील सेंट एडवर्ड स्कूलमधून शिक्षण झाले. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकादमी त्यांनी लष्करी प्रशिक्षणाचे धडे गिरवले. प्रशिक्षण काळात आपल्या गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ पटकावली.

रावत यांनी वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि लीव्हनवर्थ, कॅन्सस येथील युनायटेड स्टेट्स आर्मी कमांड अँड जनरल स्टाफ कॉलेजमधून लष्करी अभ्यासक्रमाची पदवी घेतली होती. मद्रास विद्यापीठातून संरक्षण अभ्यासामध्ये एम.फिल तसेच व्यवस्थापन आणि संगणक अभ्यासात पदविका प्राप्त केली होती. 2011 मध्ये मेरठ येथील विद्यापीठाने त्यांना लष्करी-माध्यम धोरणात्मक अभ्यासावरील संशोधनासाठी मानद डॉक्टरेट प्रदान केली होती.

लष्करी कारकीर्द - जनरल रावत 16 डिसेंबर 1978 रोजी गोरखा रायफल्सच्या 5 व्या बटालियनमधून सैन्यात दाखल झाले. त्यांची नियुक्ती त्यांच्या वडिलांच्याच रेजिमेंटमध्ये झाली होती. सुमदोरोंग चू खोर्‍यात 1987 च्या चीन-भारतीय चकमकीदरम्यान व त्यानंतर कॅप्टन रावत यांची बटालियन चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या विरोधात तैनात करण्यात आली होती. चीन व भारतीय सैन्यामधील 1962 च्या युद्धानंतर वादग्रस्त मॅकमोहन रेषेवर झालेला हा पहिला लष्करी संघर्ष होता. जनरल रावत हे उंचीवरील युद्धाचे विशेषज्ञ होते. जम्मू-काश्मीरमधील उरी येथील एका कंपनीचे प्रमुख म्हणून त्यांनी नेतृत्व केले. कर्नल म्हणून त्यांनी किबिथू येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पूर्वेकडील सेक्टरमध्ये नेतृत्व केले. ब्रिगेडियर पदावर बढती मिळाल्यानंतर त्यांनी सोपोरमध्ये राष्ट्रीय रायफल्सच्या 5 सेक्टरचे नेतृत्व केले. जनरल रावत यांनी काँगो या देशातील लष्करी मिशनमध्ये बहुराष्ट्रीय सैन्याचे नेतृत्व केले. या मोहिमेत युद्धजन्य व अतिरेकी कारवायांच्या कठीण परिस्थितीत त्यांनी यशस्वी कामगिरी केली व तेथील जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. हा कार्यकाळ चार महिने चालला. 2019 मध्ये अमेरिका भेटीदरम्यान जनरल रावत यांना युनायटेड स्टेट्स आर्मी कमांड आणि जनरल स्टाफ कॉलेज इंटरनॅशनल हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यांनी चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे 57 वे अध्यक्ष म्हणून काम केले. आपल्या कार्यकाळात जनरल रावत यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर आणि मोहिमांचे नेतृत्व केले.

धक्कादायक आपघात- जनरल बिपीन रावत हे देशाच्या तीनही सैन्य दलाचे पहिले प्रमुख होते. केंद्र सरकारने तीनही सैन्य दलाच्या समन्वयासाठी चीफ ऑफ डिफेंन्स स्टाफ म्हणजेच सरसेनाध्यक्ष पद निर्माण केले. या पदावर नियुक्ती झालेले रावत हे पहिले जनरल होते. सीमेवरील सामरिक व धोरणात्मक समन्वय, सैनिकांच्या कल्याणकारी योजना व सैन्याच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने रावत यांनी या पदावरून दिशादर्शक भुमीका बजावली. त्यांचा कार्यकाळ संपण्याआधीच हेलिकॉप्टर अपघाताने त्यांना आपल्यातून हिरावून घेतले. जनरल रावत यांच्या उजव्या हाताचा स्पष्ट फोटो उपलब्ध झाल्याने हस्तसामुद्रिकदृष्ट्या त्यांच्या अकाली व अपघाती मृत्यूच्या दृष्टीने हातावरील गंडांतर योग कुठले होते हे पाहणे व तपासणे हा उत्सुकतेचा विषय होता. निधन कोणाचेही असो, ते अकाली अथवा अपघाती असेल तर मनाला चटका लावून जाणारे असते.

अपघातात मृत्यू होताना प्रत्येकाच्या जीवनाची दोरी तुटलेली असते का? हा एक संशोधनाचा विषय आहे. तरीही विमान, रेल्वे, बस अपघात होता, तेव्हा अपघातात निधन झालेल्यांची संख्या मोठी असते. मग प्रत्येक प्रवाशाचा मृत्यू हस्तसामुद्रिकशास्त्र व अन्य ज्योतिषशास्त्रानुसार निश्चित असतो का? याला उत्तर एकच आहे, निसर्ग व नियती! त्याचबरोबर वैमानिक असो अथवा कुठल्याही वाहनाचा चालक असो त्याच्या हाती प्रवास करणार्‍या लोकांची मदार असते. चालकाची चूक असो, यांत्रिक बिघाड असो, निसर्गाची साथ नसणे, म्हणजेच दैवी साथ नसल्याने अपघातात प्रवाशांचे निधन होत. त्या अपघातातून काही सहीसलामत आश्चर्यकारक वाचतात, अशीही उदाहरणे आहेत. आज आपण अपघातात चूक कोणाची, निसर्गाची, वैमानिकाची की हेलिकॉप्टर बिघाडाची यावर विचार करणार नाहीत. अ‍ॅक्ट ऑफ गॉडच्या जास्त खोलात न जात जनरल बिपीन रावत यांच्या हातावरील आयुष्याची दोरी तुटली होती का, ते पाहणार आहोत.

आयुष्य रेषा - हस्तसामुद्रिकदृष्ट्या दोन्ही हातावरील आयुष्य रेषा ज्या वय वर्षापर्यंत सुदृढ वा निर्दोष आहेत, तोपर्यंत मनुष्याचा जीवनप्रवाह अखंड कार्यरत असतो. मात्र उजव्या किंवा डाव्या हातावरील ज्या वय वर्षात आयुष्य रेषेत दोष अथवा खंड पडला असेल तर त्या वय वर्षात व्यक्तीचे आयुष्य संपुष्टात येते. आयुष्य रेषेसोबत तिच्या शेजारी असलेली मंगळ रेषा असेल तर ती आयुष्य रेषा बिघडलेली असली तरी व्यक्तीच्या जीवनप्रवाहात खंड पडू देत नाही. एकप्रकारे मंगळ रेषा आयुष्य रेषेसोबत असल्यास त्या व्यक्तीचे ती संरक्षणाचे काम करते. हातावरील हृदय रेषा ही हृदय रोग दाखविते. मस्तक रेषा मेंदूसंबंधी व्याधी दाखविते व आरोग्य रेषा विविध आजारसंबंधी सूचना देते. या सर्व रेषांच्या आरोग्याच्या दृष्टीने असलेल्या व्याधी या व्यक्तीच्या जीवनावर घाला घालणार्‍या किंवा दुर्धर आजाराच्या असतील तर त्या सर्वांच्या खाणाखुणा ह्या आयुष्य रेषेवर त्या वय वर्षात निश्चित दिसून येत असतात. जनरल रावत यांच्या हातावरील शनी ग्रहावर सुद्धा अपघाताच्यादृष्टीने खाणाखुणा आहेत.

त्यांच्या उजव्या हातावर दोन आयुष्य रेषा आहेत. पहिली गुरु ग्रहाच्या खालून उगम पावली आहे. ती पूर्ण लांबीची नाही. ती जेमतेम हाताच्या मध्य भागापर्यंत म्हणजेच वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत आहे. दुसरी आयुष्य रेषा मस्तक रेषेच्या खाली उगम पावत असून ती वयाच्या 55 नंतर पुसट झाली आहे. परंतु रावत यांच्या हातावर मंगळ रेषा वयाच्या 63 वर्षापर्यंत असल्याने तिची साथ रावत यांना लाभली. 63 नंतर मात्र मंगळ रेषेची साथ संपुष्टात आली आहे. याचाच अर्थ त्यांचा जीवन प्रवास वयाच्या 63 व्या वर्षापर्यंत होता, याचे हे सूचक मानता येईल. पुढे त्यांच्या आयुष्याची दोरी तुटलेली दिसते. जनरल रावत यांच्या निधनाने देशाचे अत्यंत नुकसान झाले. त्यांनी देशाच्या सैन्य आधुनिकीकरण व रणनितीमध्ये मोठे योगदान दिले. देश त्यांनी दिलेल्या समर्पणात्मक सेवांबद्दल कायम ऋणी राहील.

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

8888747274

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com