रवी ग्रहाच्या कृपेने अभिनेता ते मुख्यमंत्री!

भविष्य आपल्या हाती
रवी ग्रहाच्या कृपेने अभिनेता ते मुख्यमंत्री!

प्रफुुुल्ल कुलकर्णी

पंजाबचे (Punjab) राजकारण सध्या चर्चेत आहेत. तेवढेच चर्चेत आहेत या राज्याचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान. विनोदी अभिनेता अशी त्यांची पहिली ओळख. विनोदातून ताशेरे ओढत ते थेट गढूळ राजकारण स्वच्छ करण्यासाठी राजकारणाच्या मैदानात आले. गेल्या दशकात थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारत त्यांनी आपल्या वाटचालीने सर्वांनाच दखल घेण्यास भाग पाडले आहे. समाजाच्या सेवेसाठी त्यांनी झोकून काम केले, हे त्यांच्या यशाचे इंगीत आहेच. मात्र रवी ग्रहाची त्यांच्यावर असलेली कृपा देखिल दुर्लक्षून चालणार नाही.

भगवंत मान मान यांचा जन्म शीख कुटुंबात 17 ऑक्टोबर 1973 झाला. पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील सतोज हे त्यांचे गाव. स्टँडअप् कॉमेडियन अशी त्यांची प्रारंभिची ओळख. युवा विनोदी महोत्सव आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये भाग घेत त्यांनी आपली आवड जोपासली. त्यांचा पहिला कॉमेडी अल्बम कॉमेडियन जगतार जग्गीसोबत होता. दोघांनी मिळून अल्फा ईटीसी पंजाबीसाठी ‘जुगनू कहंदा है‘ हा टेलिव्हिजन कार्यक्रम केला. त्यानंतर राणा रणबीरसोबत कॉमेडी शोचे ते जोडीदार झाले. दोघांनी मिळून अल्फा ईटीसी पंजाबीसाठी जुगनू मस्त मस्त या टेलिव्हिजन कार्यक्रमाची निर्मिती केली. 2006 मध्य मान आणि जग्गी यांनी ‘नो लाइफ विथ वाईफ’ या शोचे कॅनडा आणि इंग्लंडमध्ये सादरीकरण केले.

2008 मध्ये ते स्टार प्लसवरील ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये सहभागी झाले. यामुळे प्रथमच त्यांना देशभर प्रसिद्धी मिळाली. 2011 च्या सुरुवातीला मान पीपल्स पार्टी ऑफ पंजाबमध्ये सामील झाले. मार्च 2014 मध्ये मान यांनी संगरूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांनी पहिली लोकसभा निवडणूक माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंग धिंडसा यांच्या विरोधात लढवली आणि 2 लाख 11 हजार 721 मतांनी विजय मिळवला. 2017 मध्ये त्यांनी जलालाबादमध्ये सुखबीर सिंग बादल आणि रवनीत सिंग बिट्टू यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली. ते बादल यांच्याकडून 18 हजार 500 मतांनी पराभूत झाले.

2019 च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत संगरूर मतदारसंघातून ते 17 व्या लोकसभेसाठी पुन्हा निवडून आले. 1 लाख 10 हजार 211 मतांच्या फरकाने त्यांची दुसरी टर्म जिंकली. लोकसभेत ते आम आदमी पक्षाचे एकमेव खासदार होते. 18 जानेवारी 2022 रोजी पंजाब विधानसभेच्या निवडणुकीआधी आम आदमी पक्षाकडून संभाव्य मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव घोषित करण्यात आले. ही निवड कथितरित्या जनतेच्या मतदानाद्वारे केली गेली होती. मान यांच्या नेतृत्वात 2022 ची पंजाब विधानसभा निवडणूक लढवली गेली आणि जिंकलीही! एकूण 117 जागांपैकी 92 जागा जिंकत त्यांनी पंजाबच्या राजकारणातील नवा इतिहास रचला. मान यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली.

भगवंत मान यांनी मार्च 2022 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भगवंत मान यांचा अभिनयापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास आश्चर्यकारक आहे. दूरदर्शनवरील विविध मालिकांमधून जनतेचे प्रश्न घेऊन ते विनोदी ढंगाने त्यावर ताशेरे ओढायचे. साहजिकच प्रमुख भूमिका करणारे भगवंत मान हे जनतेत लोकप्रिय झाले.

रवी ग्रहाच्या प्रसिद्धीचा फायदा

मान यांच्या हातावरील रवी ग्रह व रवी रेषा अत्यंत शुभ आहे. रवी ग्रहाची कृपा नशिबातच असावी लागते. तो प्रसन्न असला कि मानसन्मान, कीर्ती वृद्धिंगत होत जाते. रवी ग्रहाची कृपा नसेल तर एक तर तुमच्यात विद्वत्ता असून सुद्धा तुम्हाला प्रसिद्धीपासून ते दूर ठेवते. रवी ग्रह हा प्रसिद्धीबरोबर बदनामी पण देतो. राजकारणात येण्यासाठी आधीचे प्रसिद्धीचे वलय कामी आले. त्यामुळे राजकीय प्रवेश सुकर झाला.

आपल्या प्रसिद्धीच्या वलयाचा लाभ घेणे प्रत्येकाला जमत नाही. त्यासाठी हातावरील बुध ग्रह व बुध रेषा या शुभ असणे गरजेचे आहे. मान यांच्या हातावरील बुध रेषा उत्तम आहे. त्यामुळे त्यांनी हुशारीने अभिनेते असताना राजकारणात प्रवेश केला. राजकारणातल्या प्रवेशाने त्यांना सुरवातीपासूनच यश मिळाले त्यातच आम आदमी पार्टीत सामील झाल्यामुळे व मिस्टर क्लीन म्हणून छबी जपल्याने मान यांनी लोकसभेची निवडणूक सहज जिंकली.

मान यांना आम आदमी पार्टीचे नेतृत्व करायला मिळणे हेदेखिल त्यांच्या पथ्यावर पडले. येथे बुध ग्रहाचे मोलाचे योगदान मान यांना मिळाले. त्यांच्यात करंगळी दोष आहे. करंगळी वक्र आहे. ती कदाचित छोट्या अपघाताने वक्र झाली असावी. अन्यतः बुध ग्रहाची करंगळी वक्र असता व्यक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवणे धोक्याचे असते.

हातावरील व्यसनाच्या रेषा

हस्तसामुद्रिकशास्त्रात व्यसनाच्या रेषा चंद्र ग्रहावर पाहावयास मिळतात. हातावरील चंद्र ग्रहावर मनगटापासून साधारण दीड ते दोन इंचावर हाताच्या बाहेरून आता चंद्र ग्रहावर येणार्‍या रेषा आयुष्य रेषेपर्यंत ठळकपणे दिसत असतील तर व्यक्तीला या चंद्र ग्रहावरील रेषा व्यसनाधीन बनविते. चंद्र ग्रहावरील मनगटापासून वर असलेल्या आडव्या रेषा नेहमी वाईट व्यसनाच्या नसतात. काही व्यक्ती एखाद्या कार्यात, अभ्यासात झोकून देत असतील किंवा त्या विषयाचा ध्यास घेऊन काम करीत असेल तरीही या आडव्या रेषा चंद्र ग्रहावर आढळतात. चंद्र ग्रहावरील आडव्या रेषा नक्की वाईट व्यसनाच्या का व्यासंगाचा हे ओळखण्यासाठी हृदय रेषा व मस्तक रेषा यांचा अभ्यास बारकाईने करणे गरजेचे आहे. हृदय रेषा कमकुवत व भावनिक असेल तर व मस्तक रेषा व्यसनाच्या आहारी जाणारी व चंद्र ग्रहावर जास्त खाली उतरलेली असेल तर व्यक्ती वाईट व्यसनाच्या आहारी जाते.

मान यांच्या हातावरील गुरु ग्रह अत्यंत शुभ आहे. गुरु ग्रह हा नेतृत्वाचा कारक आहे तसेच अनुशासन, धार्मिकपणा, सचोटी, सहिष्णुता व बंधुभाव गुरु ग्रह प्रदान करतो. हृदय रेषा गुरु ग्रहावर गुरु बोटाच्या पेर्‍यापर्यंत गेली असेल तर व्यक्ती एकनिष्ठ असते. तसेच निष्ठेबरोबरच आचरण हे शुद्ध असते त्यात लबाडी असत नाही. मान यांच्या हातावरील हृदय रेषा सुद्धा गुरु ग्रहाच्या बोटाच्या तिसर्‍या पेर्‍यापर्यंत गेली असल्याने त्यांच्यात एकनिष्ठता व सचोटीचे गुण वसले आहेत. भाग्य रेषा व उत्कर्ष रेषा वयाच्या बरोबर अठ्ठेचाळीस वर्षात उतुंग आहे. तिचा उगम आयुष्य रेषेतून होत असून भगवंत मान यांच्या आयुष्यातील वयाच्या अठ्ठेचाळीस वर्षाला मोठी चमक दाखविते आहे. भाग्य रेषा शनी ग्रहाच्या मधोमध गेलेली नाही, भाग्य रेषा हाताच्या डाव्या बाजूस रवी ग्रहाच्या बाजूने साहनी ग्रहावर स्थिरावली आहे. याचा अर्थ मान यांच्या डे वय वर्ष पंचावन्ननंतर व आयुष्याच्या शेवटपर्यंत मोठी संपत्ती असणार नाही किंवा ते संपत्ती आपल्या नावावर ठेवणार नाहीत. मस्तक रेषा हाताच्या मध्यभागी वळून खाली चंद्र ग्रहावर उतरली आहे. हि मस्तक रेषा अभिनय कौशल्यासाठी साथ देते आहे.

मस्तक रेषा चंद्र ग्रहाच्या सानिध्यात आल्याने नियोजन, कल्पना व हुशारीचा लाभ मान यांना मिळाला आहे. विवाह रेषा उत्तम व सरळ बारीक शुभ लक्षणी आहे. त्यामुळे मान यांना वैवाहिक सौख्याचा लाभ उत्तम मिळणार आहे. हातावर आयुष्य रेषेसोबत मंगळ रेषा वय वर्ष 55 पर्यंत साथ देत असल्याने मुख्यमंत्री पदाची टर्म उत्साहात व न थकता सत्कारणी लागणार आहे. त्याचा फायदा जनतेला व त्यांच्या पक्षाला निश्चितच होणार आहे. मान यांची मुख्यमंत्री पदाचा पंजाबच्या विकासाचे नवे पर्व घेऊन येणार असे संकेत आहेत.

8888747274

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com