जादूई आवाजावर चंद्र ग्रहाचा प्रभाव

भविष्य आपल्या हाती
जादूई आवाजावर चंद्र ग्रहाचा प्रभाव

आशा मंगेशकर-भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावशाली आणि यशस्वी गायिका म्हणून त्या ओळखल्या जातात. आठ दशकांहून अधिक काळातील कारकिर्दीत त्यांनी विविध भारतीय भाषांमधील चित्रपट आणि अल्बमसाठी गाणी रेकॉर्ड केली आहेत. त्यांना दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, अठरा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कारासह नऊ फिल्मफेअर पुरस्कार व अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दोन ग्रॅमी नामांकनांव्यतिरिक्त सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेसाठी सात फिल्मफेअर पुरस्कार. 2000 मध्ये त्यांना चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2008 मध्ये त्यांना भारत सरकारने देशाचा दुसरा-सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. याशिवाय त्यांचे सर्वाधिक स्टुडिओ गाण्याच्या ध्वनी मुद्रणासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले गेलं आहे. त्यांच्या आवाजाच्या जादूवर चंद्र ग्रहाचा कसा प्रभाव आहे, याविषयी जाणून घेणार आहोत.

आशा भोसले यांच्या विविध गायिलेल्या गाण्यांमध्ये चित्रपट संगीत, पॉप, गझल, भजने, पारंपारिक भारतीय शास्त्रीय संगीत, लोकगीते, कव्वाली आणि रवींद्र संगीत यांचा समावेश आहे. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी 20 हून अधिक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. 1913 मध्ये त्यांनी माई चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केले आणि त्यांच्या अभिनयासाठी त्या काळात समीक्षकांची प्रशंसा मिळाली होती.

आशा भोसले यांचा जन्म सांगलीतील गोवार या छोट्याशा गावात दीनानाथ मंगेशकर आणि शेवंती मंगेशकर यांच्या परिवारात झाला. दीनानाथ हे मराठी संगीत मंचावरील अभिनेते आणि शास्त्रीय गायक होते. आशा या फक्त नऊ वर्षांच्या असताना त्यांचे वडील दीनानाथ यांचे निधन झाले. मंगेशकर कुटुंब पुण्याहून कोल्हापुरात आणि नंतर मुंबईत स्थलांतरीत झाले.

मोठी बहीण लता मंगेशकर यांच्यासोबत कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आशा यांनी चित्रपटांमध्ये गाणे आणि अभिनय करण्यास सुरुवात केली. आशाजींनी माझे बालपण (1943) या मराठी चित्रपटासाठी गीत चला चला नव बाळा गायले. या चित्रपटाचे संगीत दत्ता डावजेकर यांनी दिले होते. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायनाची सुरूवात केल्यानंतर कधीच मागे वळून पहिले नाही. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी गणपतराव भोसले यांच्याशी कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केले.

उजव्या हाताचे हस्तसामुद्रिकदृष्ट्या विश्लेषण

हातावरील प्रतिभावान चंद्र ग्रह- मंगेशकर घराण्याला आवाजाची दैवी देणगी मिळालेली आहे. आज आपण आशा भोसले यांच्या उजव्या हातावरील रेषांचा व हातावरील विशेषतः चंद्र ग्रहाचे कारकत्व पाहणार आहोत. लता- रफी-किशोरकुमार- मुकेश यांची पन्नासच्या दशकातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. या सर्व दिग्गजांना सरस्वती प्रसन्न होती. या सरस्वतीचा मुख्य कारक ग्रह चंद्र आहे. चंद्र ग्रहच प्रतिभा प्रदान करतो.

प्रत्येकाच्या हातावर करंगळीखाली हृदय रेषा त्याखाली मस्तक रेषा असते. मस्तक रेषेच्या खाली म्हणजे जवळजवळ तळहाताच्या मध्यापासून मणिबंधापर्यन्त चंद्राचे क्षेत्र असते. तळहातावर अंगठ्याच्या आतल्या भागात शुक्र हा सर्वात मोठ्या आकाराचा ग्रह होय. या शुक्र ग्रहापेक्षा शुक्रासमोरील चंद्र ग्रह आकाराने थोडा लहान असतो. चंद्र ग्रह हा मनाचा कारक ग्रह आहे.परंतु चंद्र ग्रहावरून प्रतिभा पहिली जाते. चंद्र ग्रह स्वच्छ म्हणजे आडव्या तिडव्या रेषा नसलेला व स्वतंत्रपणे ज्याचा पृष्ठ भाग तळहातापासून अलग किंवा जेव्हा वेगळा असतो. तेव्हा परमेश्वर कृपेने त्या व्यक्तीत प्रचंड प्रतिभा असते. प्रतिभा असलेला चंद्र ग्रह शुक्र ग्रहांपेक्षा मनगटाकडे अधिक सरकलेला असेल तर उच्च कोटीची हुशारी आणि अधिक प्रतिभा लाभते.

आशाजींच्या हातावरील चंद्र ग्रह करंगळीच्या खालील हाडापासून वेगळा होऊन फुगीर झालेला आहे. मणिबंधाच्या आतून हाताच्या कडेने एक स्वतंत्र रेषा उगम पाऊन त्या रेषेची समाप्ती हृदय रेषखाली वरच्या मंगळ ग्रहावर झाली आहे. या रेषेने हातावर चंद्र ग्रहासाठी स्वतंत्र सीमा रेषा बनविली आहे व सीमांकन करून चंद्र ग्रहाचे स्थान तळ हातावर स्वतंत्र केले आहे. स्वतंत्र उभ्या रेषेमुळे मणिबंधापासून हृदय रेषेपर्यंत चंद्राचा स्वच्छ व अत्यंत शुभदायी उभार तयार झाला आहे.

त्यांच्या तळहाताकडे पाहिले कि चंद्र ग्रह तरुण आहे. त्यावर वार्धक्याच्या खुणा नाहीत. बाकी उर्वरित सर्व तळहातावर वार्धक्याच्या खुणा दिसून येत आहेत. मणिबंधाच्या रेषेच्याही अलीकडून एक चंद्र प्रभावी रेषा उगम पावत असून ती चंद्रावरच्या भाग्य रेषेत विलीन झाली आहे. ही चंद्रावरची प्रभाव रेषा त्यांच्या गायनातील आगळे वेगळे कौशल्य अधोरेखीत करीत आहे.

उपजत विद्वत्ता, कला या अतिशुभ चंद्र ग्रहामुळे प्राप्त झाली आहे. ही परमेश्वराची दैवी देणगीच आहे. कारण करोडो लोकांत किंवा जनतेत अशी चंद्र ग्रहाची अलौकिक प्रतिभा प्राप्त होते किंवा एखाद्याच्याच नशिबी असते.

हृदय रेषा - मधल्या बोटापासून पहिल्या बोटाच्या खाली हृदयरेषेचे चार फाटे आहेत. सुरवातीचा हृदय रेषेचा फाटा हा मस्तकरेषेत जाऊन मिळाला आहे व हा प्रेमसंबंध घडवून आणतो. त्यावरचा हृदय रेषेचा फाटा गुरु ग्रहावर सरळ रेषेत आहे. हा फाटा अत्यंत कोमल भावनांचा प्रतीक आहे. हृदय रेषेचा तिसरा फाटा हा गुरु ग्रहावर पहिल्या बोटाच्या पेर्‍यात समाविष्ट झाला आहे. हा हृदय रेषेचा फाटा आंधळ्या प्रेमाचा आहे. हृदय रेषेचा कुठलाही एक फाटा अथवा हृदय रेषा पहिल्या बोटाच्या पेर्‍यात गेला असेल तर अश्या व्यक्ती समोरच्यावर मोठा विश्वास टाकतात. यांच्यातला व्यक्तिवरील विश्वास हा अढळ असतो. कोणी काहीही म्हणाले तरी हे ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. हृदय रेषेचा चौथा फाटा हा गुरु ग्रहावर थांबला आहे. हा फाटा उत्तम विचार, आचार, नैतिकता, धार्मिकता श्रद्धा व जिव्हाळा, कायमस्वरूपी प्रेमळ भावना प्रदान करतो. मस्तक रेषा व आयुष्य रेषा लांबपर्यंत एकत्र आहेत. त्यामुळे व्यक्ती संस्कारी असते. मस्तक रेषा सरळ वरच्या मंगळ ग्रहापाशी चंद्र ग्रहाच्या उभाराच्या आधी थांबली आहे. ती उशिराने व्यवहारी ज्ञान देत आहे. आयुष्य रेषेतून मंगळ रेषा वयाच्या 25 व्या वर्षी उगम पाऊन ती थेट मणिबंधापर्यंत गेली आह. ही रेषा जास्तीची ऊर्जा व उत्साह देते. आयुष्य रेषा वयाच्या ऐंशी वर्षाला अशुभ झाली व थांबली आहे. परंतु मंगळ रेषा आयुष्यरेषेला साथ देते थेट मनिबंधापर्यंत उत्तम असल्याने आयुष्यमान योगे घडून आला आहे. गुरुचे बोट म्हणजे पहिले बोट मधल्या शनी बेटाकडे आकर्षित झाले आहे. अशी बोटांची उघड झाप होतांना नैसागिक स्थिती असेल तर अश्या व्यक्ती अस्वस्थ असतात, त्यांना कायम काही ना काही काळजी सतावत असतात. असुरक्षित भावना असते. विवाह रेषा हातावर तीन आहेत मात्र तिसरी करंगळीच्या खालची पहिल्या क्रमांकाची विवाह रेषा सर्प जिंव्हा कृती झाली आहे, अशी स्थिती असता जोडीदाराबरोबर मतभेद असतात, आवडीनिवडी वेगळ्या असतात.

वैवाहिक सौख्यात कमतरता - अंगठ्याच्या आत शुक्र ग्रहावरून एक जाडसर रेषा आडवी आहे व ती थेट बुध ग्रहावर जाऊन थांबली आहे. ही तळहातावरील शुक्र व बुध ग्रहापर्यंत आडवी जाणारी रेषा, मस्तक रेषा, मंगळ ग्रहाचे मैदान,हृदय रेषा यांना छेद देऊन बुध ग्रहावर गेल्याने वैवाहिक सौख्यात या रेषेने बाधा व कमतरता आणली आहे. मणिबंधकडून बोटाकडे जाणार्‍या मुख्य रेषा, भाग्य रेषा, रवी रेषा बुध रेषा या रेषांनी हृदय रेषेला छेद देऊन त्या बोटांच्या खालील ग्रहावर गेल्या असतील तर या रेषा भाग्यकारक असतात. एखादी तळ हातावर आडवी रेषा आयुष्य रेषा, भाग्य रेषा, मस्तक रेषा,रवी रेषेला छेद देऊन ती रेषा बोटाखालील ग्रहावर थांबत असेल तर ती रेषा नेहमी नशिबाला आडवी येत असते.

रवी रेषा - रवी रेषेचा उगम आयुष्य रेषेच्या आत मंगळ रेषेच्या आतून शुक्र ग्रहावरून ती थेट बोटाच्या तिसर्‍या पेर्‍याखाली म्हणजे रवी ग्रहावर जाऊन थांबली आहे. मंगळ रेषेच्या आत शुक्र ग्रहावर आयुष्यात प्रभाव पडणार्‍या व आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर जीवनात सहवासात येणार्‍या व्यक्ती असतात. या शुक्र ग्रहावर मंगळ रेषे नंतर उभ्या असतात या उभ्या असलेल्या शुक्र ग्रहावरील रेषा प्रत्येक रेषेच्या पोतांप्रमाणे त्या व्यक्तीच्या जीवनात बरे वाईट प्रभाव पाडतात.

आशा भोसले यांच्या हातावरील या शुक्र ग्रहावरील प्रभाव रेषा शुभदायी आहेत. त्यामुळे या शुक्रावरच्या प्रभाव रेषांचा अनुकूल प्रभाव त्यांच्या जीवनात झाला आहे. या प्रभावशाली व्यक्तींमुळे त्यांच्या जीवनात उतुंग यश गाठणे सोपे झाले. विविध कालखंडात आयुष्यात येणार्‍या व्यक्तीमुळे त्यांचे जीवन प्रभावित झाले व जीवनात अमाप यश मिळाले. या प्रभावशाली व्यक्तीत ओ.पी.नय्यर व आर.डी. बर्मन यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारांच्या समावेश आहे. त्यांच्यामुळे आशाजींच्या जीवनात उतुंग यश मिळाले. त्यांच्या गायकीची कसोटी लागली व एक वेगळी खास गायनशैली विकसित झाली. रवी रेषेला रवी ग्रहावर आणखी एक तिरकी रेषा मंगळ ग्रहांच्या मैदानावरून जाऊन मिळते आहे, ही रेषा सुद्धा आशाजींच्या यशात हातभार लावणारी रवी रेषा आहे, या रेषेने त्यांच्या मान सन्मान, कीर्तीत भर घातली आहे.

आशाजींना विधात्याने न भूतो ना भविष्ये असा श्रवणीय गोड आवाजाचा गळा दिला. त्यांच्या मधुर गीतांच्या जादूने जगभरात सर्वांना वेड लावले. भारतीयांच्या मना मनात त्यांच्याबद्दल आदराचे स्थान आहे. आयुष्यात त्यांना ऐश्वर्य लाभले. भौतिक सुखे त्यांच्या पायाशी लोळण घेत आहेत. तरीही जीवनात वैवाहिक सौख्याची कमतरता आहे. जीवनाचा सुरवातीच्या काळातील संघर्ष आहे. आता त्या नव्वदीच्या घरात आहेत. यांना शेवटपर्यंत उत्तम आरोग्य लाभो हीच त्यांच्या चाहत्यांची कामना आहे.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

8888747274

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com