Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधभारताचा लकी कर्णधार!

भारताचा लकी कर्णधार!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित गुरुनाथ शर्माचा जन्म 30 एप्रिल 1987 झाला. इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करतो. तडाखेबंद सलामीवीर फलंदाज अशी त्याची ओळख. रोहित देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून खेळतो. आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने विक्रमी पाच वेळा स्पर्धा जिंकली आहे. त्याच्या नावावर सध्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा (264) विक्रम आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तीन द्विशतके झळकावणारा तो एकमेव खेळाडू आहे.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

2019 च्या विश्वचषकात रोहितने पाच शतके झळकावल्यानंतर, 2019 मध्ये आयसीसीचा वनडे इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला. 2015 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2020 मध्ये प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद खेलरत्न दोन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान झाला आहे.

- Advertisement -

रोहितला 1999 मध्ये काकांच्या प्रोत्साहनामुळे क्रिकेट कॅम्पमध्ये सहभागी होता आले. शिबिरातील प्रशिक्षक दिनेश लाड यांनीच त्यांच्या शाळेत त्याचा प्रवेश करवून घेतला. रोहित यांना महागडी शाळा परवडत नसताना प्रशिक्षक लाड यांनी शिष्यवृत्ती मिळवून दिली. रोहित शर्मा भाग्यवान आहे. नियतीने आयुष्यात मोलाची मदत करणार्‍या आई वडीलांव्यतिरिक्त आजी, आजोबा व काका या व्यक्ती दिल्या.

हातावरील भाग्यरेषा

उजवा हात – रोहित यांच्या दोनही हातावरील भाग्य रेषा मणिबंधापासून उगम पावत असून त्या थेट शनी ग्रहावर गेल्या आहेत. हातावर रोहित यांच्यासारखी भाग्य रेषा असेल तर त्या व्यक्तीला लहानपणापासूनच आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत नाही. मनगटाजवळील भाग्य रेषा लहानपणी हवे ते देण्यास समर्थ असते. आजी आजोबांकडून मुंबईत संगोपन व शिक्षण झाले. हे रोहितचे भाग्य होय. प्रशिक्षक लाड यांच्याकडून क्रिकेटचे प्रशिक्षण लाभणे, शाळेत शिष्यवृत्तीसह प्रवेश मिळणे, हा सुद्धा नशिबाचा भाग होय. असे असले तरी रोहितनेे क्रिकेटवर घेतलेली मेहनत आपण नाकारू शकत नाही.संधी मिळणे ही बाब खूप महत्त्वाची आहे, कारण नागपूरजवळील शाळेत मुंबईसारख्या क्रिकेटच्या प्रशिक्षणाच्या सोयी मिळू शकत नव्हत्या. म्हणूनच नियतीने त्यांच्या शिक्षणाची सोय मुंबईत केली.

मुंबईत प्रशिक्षक मिळाले, क्रिकेटच्या सरावाची संधी मिळाली व अनेक क्रिकेटच्या स्पर्धेत भाग घेऊन रोहित यांनी त्यांच्या खेळाची चुणूक दाखविली. भाग्यरेषा आयुष्यातील जन्मापासून मृत्यूपर्यंत आर्थिक परिस्थितीचा आलेख दाखविते. व्यक्ती कमावती नसते तेव्हा लहानपणापासून शिक्षण होऊन नोकरी-व्यवसायाला सुरुवात करेपर्यंत आर्थिक परिस्थिती हातावर भाग्य रेषा रुपी हजर असते. भाग्य रेषेचा उगम मनगटापासून होतो मनगटापासून सर्वसाधारणपणे मस्तक रेषेच्या खाली एक सेंटीमीटरपर्यंत सरासरी 20 ते 25 वय येते. या वीस ते पंचवीस वयापर्यंत भाग्य रेषा कशी आहे, त्यानुसार पालकांच्या उत्पन्नाचा अंदाज येतो. लहानपणी सर्व सुखसोयी उपलब्ध होणार असतील तर भाग्य रेषा बारीक व सरळ रेषेत असते. पालकांचे उत्पन्न किती हे भाग्य रेषा लहान वयात असताना मुलांच्या हातावर असते, किंवा व्यक्ती कमवायला लागत नाही तोपर्यंतचे त्या मुलाला सहजी उपलब्ध होणार्‍या किंवा न होणार्‍या आर्थिक बाबी दाखवित असते. रोहित यांच्या हातावरील लहान वयात असलेली भाग्य रेषा उत्तम आहे. परंतु पालकांचे उत्पन्न तुटपुंजे आहे, पण रोहितच्या भाग्यात असलेल्या सोयीसुविधा आजी-आजोबा व काकांनी पूर्ण केल्या. डाव्या हातावरची भाग्य रेषा संचित दाखविते व उजव्या हातावरची प्रारब्ध अथवा कर्माची असते.

प्रत्येकाच्या हातावर छोटी मोठी भाग्य रेषा असते. भाग्य रेषेच्या स्वरूपाप्रमाणे जन्मापासून मृत्यूपर्यंत आर्थिक क्षमता किती? याची नोंद असते. भाग्य रेषा म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा वास हा नशिबाने दिलेला असतो. नव्हे तर लक्ष्मी त्या व्यक्तीच्या नशिबाप्रमाणे व्यक्तीच्या हातावर जन्मतःच भाग्य रेषारुपी असते. व्यक्तीच्या हातावर एक भाग्य रेषा नसून त्या एक ते पाच या संख्येने असू शकतात. प्रत्येक भाग्य रेषा किती व केव्हा धनलाभ देईल याचे गणितही अचूक मांडता येते.

रोहितचा डावा हात- रोहितच्या डाव्या हातावरची भाग्य रेषा लहानपणापासून उत्तम व भाग्यकारक आहे. हि भाग्य रेषा आर्थिक विवंचना कधीच देणार नाही, अशी भाग्यशाली आहे. डाव्या हातावर भाग्य रेषेव्यतिरिक अंगठ्याच्या पहिल्या पेर्‍यावर यव चिन्ह झाले आहे. ज्यांच्या डाव्या हातावरील अंगठ्यावर गव्हाच्या दाण्यासारखे पूर्ण बंद असलेले यव चिन्ह असते त्यांची लहानपणी आबाळ होत नाही व उत्तम पालन पोषण होत असते.

हृदय रेषा- रोहित यांची हृदय रेषा गुरु ग्रहावरून उगम पाऊन बुध ग्रहावर समाप्त झाली आहे, गुरु ग्रहाच्या मध्यावर हृदय रेेषेचा उगम असल्याने रोहित हे अत्यंत प्रामाणिक व सज्जन गृहस्थ आहेत. हृदय रेषेचे दोन फाटे मस्तक रेषेकडे गेले आहेत. त्यातील पहिला फाटा गुरु ग्रहावर गेला असून दुसरा मस्तक रेषा व आयुष्य रेषा एकमेकांपासून अलग होताना मस्तक रेषेवर हृदय रेषा जाऊन थांबली आहे. हृदय रेषेची अशी रचना हातावर असता अशा व्यक्ती अतिशय संवेदनशील, भावुक व प्रेमळ असतात. दुसरा हृदय रेषेचा फाटा मस्तक रेषेवर गेल्याने त्यांच्या मनातील प्रेम भावना अत्यंत कोमल व वात्सल्यपूर्ण आहेत. मस्तक रेषा व आयुष्य रेषेचा उगम एकत्र मस्तक रेषा व आयुष्य रेषेचा उगम एकत्र वय वर्ष 30 पर्यंत आहे. अशी स्थिती हातावर असता असे लोक आज्ञा धारक असतात. आई वडिलांच्या व गुरूच्या आज्ञेत राहतात. या मस्तक रेषा व आयुष्य रेषेच्या एकत्र उगमामुळे रोहित यांनी त्यांचे गुरू, काका व आजी आजोबा यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट खेळात दिलेले लक्ष व एकाग्रता त्यांना सुप्रसिध्द क्रिकेटपटू बनण्यात कामाला आली आहे.

मस्तक रेषा- हातावरील मस्तक रेषा आडवी लांब आहे ती वरच्या मंगळ ग्रहाकडे जाताना थोडीशी चंद्र ग्रहाकडे उतरली आहे. अशी मस्तक रेषा हातावर असता व्यक्ती धीरगंभीर व विचारपूर्वक निर्णय घेणार्‍या व अत्यंत मेहनती असतात. रोहित यांच्या मस्तक रेषेमुळे त्यांच्यात एकाग्रता व कष्ट करण्याची वृत्ती अंगी आली आहे.

बुध रेषा – रोहितच्या हातावरील बुध रेषा शुक्र ग्रहावरील आयुष्य रेषेतून थेट करंगळीच्या खाली बुध ग्रहावर गेली आहे. अशा प्रकारची बुध रेषा व्यक्तीच्या हातावर असता व्यक्ति अत्यंत हुशार असतात. यांचे त्यांच्या सामाजिक जीवनातील आडाखे व खेळातील डावपेच आखताना हे अतिशय चतुराईने वागतात. बुध रेषा जात्याच हुशारीची रेषा आहे. ही रेषा शंभर व्यक्ती पैकी जास्तीत जास्त दोन व्यक्तीच्या हातावर असू शकते. शुक्र व बुध ग्रहाच्या युतीमुळे प्रत्येक यशाच्या टप्प्यात शुक्र ग्रहामुळे ऐश्वर्य प्राप्त होते व बुध ग्रह व्यक्तीला मोठे होण्यासाठी हुशारी, चतुराई व युक्ती प्रदान करत असतो.

रवी रेषा- रवी रेषा मान सन्मान, प्रसिद्धी, यश व कीर्ती देते. त्याला रवी ग्रह साथ देत असतो. रवी ग्रहावर एकच रेषा असेल तर रवी ग्रहाचे फलित द्विगुणित होते. रवी ग्रह आंतराष्ट्रीय खूप मोठी ख्याती व प्रसिद्धी देतो. यासाठी रवी व बुध ग्रहाच्या दोन बोटांमधून खाली रवी ग्रहावर जाणारी तिरकी रेषा रवी रेषेत जाऊन मिळत असेल तेव्हा घडते. रोहितच्या हातावर अशीच बुध व रवि बोटांच्या पेर्‍यातून खाली रवी ग्रहावर तिरकी रेषा आली आहे. ती रवी रेषेत जाऊन विलीन झाली आहे.

आडव्या तिडव्या प्रभाव रेषा नाहीत- रोहित यांच्या दोनही हातावर आडव्या तिडव्या प्रभाव रेषा नाहीत. हातावर आडव्या तिडव्या प्रभाव रेषा असतील तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात त्या स्पीड ब्रेकरचे काम करतात, अडथळा आणतात, कामे प्रलंबित राहतात. व्यक्ती आयुष्याच्या शर्यतीत मागे पडतात. हातावरील दोन आडव्या रेषा एक हृदय रेषा व दुसरी मस्तक रेषा सोडून हातावर आयुष्य रेषा, भाग्य रेषा व मस्तक रेषेला छेद देणार्‍या छोट्या मोठ्या रेषा व्यक्तीच्या आयुष्यात अडसर निर्माण करतात. आडव्या प्रभाव रेषा गडद व जाड व मोठी असेल तर ती कायम अशुभ फलित देते. त्या मानाने फिक्या फिक्या पातळ, बारीक रेषा त्या व्यक्तीच्या आयुष्यात तात्पुरता अवरोध निर्माण करतात. हातावरील आडव्या रेषा कोणत्या वय वर्षात हातावर आहेत हे आयुष्य रेषेवरील कालनिर्णयाने अचूक ठरविता येते.

मजबूत हाताचे पंजे- रोहितचे दोनही हाताचे पंजे मजबूत आहेत. उजव्या हातावर नजर टाकली असता मजबूत पंज्याबरोबर पंजा व अंगठा किती रुंद आहे, याची कल्पना येते. रोहित उजव्या हाताने बॅटिंग करतो. सहजी मारलेला फटका सिक्सर होतो तेव्हा मजबूत हाताच्या पंज्याची पकड व ताकद यांची कल्पना येते. मजबूत हाताच्या पंजा, अंगठा व बोटांमुळे व्यक्तीची निर्णय क्षमता ठाम व एकाधिकारशाहीची असते.

रोहितच्या आयुष्यातील टप्प्यांचा अभ्यास केल्यावर लक्षात येते की, भाग्य घेऊन जन्माला आला आहे. आयुष्यात यश मिळविण्यासाठी मेहनत घेतली स्पष्ट आहे. पण मेहनतीबरोबरच नशीब बुलंद असावे लागते. रोहितचे नशीब बुलंद आहे. त्यामुळे 16 ऑक्टोबरपासून आस्ट्रेलियात सुरू होणार्‍या आयसीसी टि-20 क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाच्या विजेतेपदाच्या अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही.

माो. 8888747274

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

- Advertisment -

ताज्या बातम्या