बोटांच्या छापांवर सप्तग्रहांचे परिणाम!

भविष्य आपल्या हाती
बोटांच्या छापांवर सप्तग्रहांचे परिणाम!

प्रफुुुल्ल कुलकर्णी

दहाही बोटांवरील ठशांचे गुणधर्म त्या बोटांखालील असलेल्या शुभ-अशुभ ग्रहानुसार बदलतात! अंगभूत कौश्यल्याची डीएमआयटी चाचणी प्रत्येक बोटांच्या ठशांच्या रेषा, ठश्यांचा मध्यापासून व बोटाच्या पहिल्या पेर्‍यापर्यंत मोजल्या जातात. बोटांवरील ठशांच्या मध्यबिंदूपासून या रेषा पेर्‍यापर्यंत मोजल्या जातात व ठशांवरील डेल्टा (त्रिभुज प्रदेशाची रचना) जेथून रेषा वळण घेतात त्या बिंदूपासून सर्व रेषांचे व ठशांचे परीक्षण करावे लागते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे बोटांवरील ठसा कोणता हे ओळखता आले पाहिजे. थोडक्यात डीएमआयटी चाचणी कितीही अचूक शास्त्रीय प्रणालीवर आधारित असली तरी जी व्यक्ती बोटांचे ठशे घेते व त्याचे मूल्यांकन करते त्या प्रक्रियेला अत्यंत महत्व आहे. बोटांचे ठशे घेणे व अचूकपणे संगणकात सेव्ह करणे हि प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. ज्या वेळेस बोटांच्या ठश्यांचे मूल्यांकन अचूक येते त्या वेळेस व्यक्तीच्या बौद्धीक क्षमतेचा अवाहलही अचूक येतो.

जगात दोन व्यक्तींचे ठसे एकसारखे सापडत नाहीत. मुख्य नऊ ठसे आहेत. काही वेळेस अपघाताने नवीन ठश्याची निर्मिती पाहावयास मिळते. जसे कि पांच बोटांऐवजी सहा बोटे हातावर असतात. बोटांवरच्या तीन पेर्‍या ऐवजी चार पेरे असतात. त्याप्रमाणे काही बोटांवरील ठसे हे वेगळाच आकृतिबंध घेऊन आलेले असतात. त्यांचे मूल्यांकन करणे खूप कठीण असते.

मागच्या आठवड्यातील बोटांच्या ठश्यांचे वैशिष्ट्ये सदरात शंख ठसा ज्याच्या रेषा किंवा ठश्याचा शेवटचा ओघ अंगठ्याकडे असेल त्याचे गुणधर्म समाविष्ठ केले नव्हते ते आज सविस्तर देत आहोत.

- शंख ठसा अंगठ्याकडे रेषांचा ओघ

अंगठ्याकडे ओघ असलेल्या ठश्यांच्या गुणधर्मात विलक्षण बदल दिसून येतो. हे लोक अधिक अहंकारी असतात आणि त्यामुळे ते थोडे अधिक बलवान किंवा दबंग असू शकतात. अंगठ्याकडे ओघ असलेल्या लोकांत स्वयं केंद्रित प्रवृत्ती असते. त्या मानाने करंगळीकडे रेषांचा ओघ असणार्‍या शंख ठश्यात सर्वसमावेशकता असते. इतरांना सामावून घेण्यास अधिक सक्षम असतात. अंगठ्याकडे ओघ असलेल्या ठश्यांत प्रवाहाच्या उलट्या दिशेला जाण्याची तीव्र इच्छा असते. एक असुरक्षित, अस्थिर, अति-प्रतिसाद देणारे व्यक्तिमत्व हा ठसा निर्माण करतात. अंगठ्याकडे जाणार्‍या रेषांचा ओघ असलेला शंख ठसा हा सामान्यतः फक्त तर्जनीवर आढळतो. म्हणूनच या पॅटर्नचे सर्वात मोठे महत्त्व आहे. शंखाचा उलटा ठसा मग तो डाव्या हातावर असो अथवा उजव्या पहिल्या गुरूच्या बोटांवर असता यांची परमेश्वरी आराधना असामान्य असते. त्यात वेगळेपणा असतो. सामान्य जनतेप्रमाणे यांची परमेश्वरी आस्था, पूजा अर्चा असत नाही.

प्रत्येक बोटांवरील शंख प्रकारात त्या त्या ग्रहांचे गुणधर्म समाविष्ट असतात. त्यामुळे शंख ठसा भिन्न गुण दिशा निर्देश देतो. शंख ठसा असलेले लोक अधिक खंबीर असले तरी बाह्य व सामाजिक वातावरणाला त्यांना दुबळे बनवते. अंगठ्याकडे ओघ असलेल्या ठश्यांच्या गुणधर्मात सामान्य शंख ठश्यापेक्षा असामान्य गुण असतात. या व्यक्ती स्वतःला इतर लोकांपेक्षा आपण वेगेळे व असामान्य आहोत असे समजतात. तशी त्यांची भावना असते. ह्या लोकांत अहंभाव असतो व सतत दुसर्‍यावर प्रभाव टाकण्याच्या प्रयत्न करीत असतात.

दहाही बोटांवरील ठशांचे गुणधर्म त्या बोटांखालील असलेल्या शुभ-अशुभ ग्रहानुसार बदलतात. हस्त सामुद्रिक शास्त्रात ज्या बोटाखाली जो ग्रह आहे, त्या ग्रहाच्या नावाने ते बोट ओळखले जाते. पहिले बोट गुरु, दुसरे,शनी, तिसरे, रवि व चौथे करंगळीच्या बुध ग्रहाचे म्हणून ओळखले जाते. अंगठ्याला बोट म्हणत नाही. अंगठा हा स्वतंत्र आहे. या अंगठ्याच्या सानिध्यात खालचा मंगळ व शुक्र ग्रहाचा प्रभाव पाहावयास मिळतो. सामुद्रिक शास्त्रात हाताच्या आकारावरून व्यक्तिमत्व ओळखता येते. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना हातावरील बोटे हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. नुसत्या बोटांच्या आकारावरून, त्या बोटात असलेल्या सांध्यावरून व्यक्तिमत्वाची ठळक ओळख होते. बोटांवरील पेरे, त्यावरील चिन्ह तीळ, बोटांवरील रेषा इत्यादी सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. त्यानंतरच व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची ओळख होते.

हस्तसामुद्रिकशास्त्रात बोटांच्या समग्र अभ्यासात बोटांच्या ठश्यांचा व त्याच्या परिणामांचा संबंध किंवा त्यावरील अभ्यास भारतात पाहावयास मिळत नाही. संपूर्ण बोटात त्या त्या ग्रहांचे शुभ अशुभ कारकत्व दडलेले असते. बोटांच्या ठश्यांचा संबंध बोटांखालील ग्रहाच्या शुभ अशुभत्वाचा निश्चितच येतो. किंबहुना व्यक्तीच्या उपजत कौशल्याचा विचार करता व्यक्तीचे कौशल्य हे बोटांखालील ग्रहांच्या स्थितीनुसार किंवा त्यांच्या शुभ-अशुभ परिणामांनुसार बदलत असते.

एखादे बोट जास्त वाकडे असेल किंवा खूप जाड किंवा बारीक असेल तर त्या बोटाखालील ग्रहांच्या शुभ अशुभ गुणधर्मात बदल होतो. बोटांवरील असलेल्या विविध ठश्यांचे कारकत्वसुद्धा त्यामुळे बदलत असते. कौशल्याच्या डीएमआयटीचा दावा आहे की, ही चाचणी म्हणजे हस्तसामुद्रिकदृष्ट्या भविष्य नसून ती विज्ञानाच्या कसोटीवर उतरलेली संशोधना अंती सिद्ध झालेली प्रणाली आहे. कौशल्य चाचणीचा विकास दोनशे वर्षांपासूनच आहे पण हस्तसामुद्रिक पुरातन काळापासून कसोटीवर उतरलेले शास्त्र आहे. बोटांच्या ठश्यांच्या अभ्यासाबरोबरच संपूर्ण बोट त्याखालील ग्रहांचा अभ्यास व त्या विद्यार्थ्यांचेे नशीब किती बलवत्तर आहे हे जाऊन घेणे तितकेच महत्वाचे आहे. व्यक्तीतील असलेल्या कौशल्याप्रमाणे तिला तिच्या आयुष्यात संधीच मिळाली नाही तर त्या उपजत कौशल्याचा त्या व्यक्तीस व्यावहारिक जगतात कुठलाही उपयोग होत नाही.

ग्रहांचा मानवी जीवनावर प्रभाव व परिणाम होत असतो. तो किती शुभ व किती अशुभ याप्रमाणे व्यक्तीच्या नशिबी सुख दुःखे येतात. चंद्राच्या प्रभावाने भरती ओहोटी येते व चंद्र ग्रहाचा मानवी मनावर परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे अन्य ग्रहाचा परिणाम व्यक्तीच्या हातावर असलेल्या ग्रहांचा प्रभावामुळे त्यांच्या जीवनात विविध प्रकारचे लाभ आणि तोटे दोन्हीही होत असतात.

वाचकांसाठी अतिशय उपयुक्त अशी आकृती सोबत देत आहे. त्यानुसार वाचकांना त्यांची मुले किंवा ते स्वतः नशीबवान आहे कि नाही, हातावरील ठसा शुभदायी आहे का नाही? हे अगदी सहज समजते.

आकृतीत दाखविल्याप्रमाणे बोटाच्या खाली ग्रह उंचवट्यावर तळहाताकडून येणारी एकच रेषा असेल तर तो ग्रह शुभकारक होतो व त्या बोटावरचा ठसा जो असेल तो आपोआपच शुभ फल देतो. चारही बोटावरच्या एका रेषेचे कारकत्व खाली देत आहे.

1- गुरु ग्रहावर एकच रेषा येत असेल तर ती व्यक्ती तिच्या जीवनात निश्चितच यशस्वी होते. 2- शनि ग्रहावर एकच रेषा येत असेल तर ती व्यक्ती तिच्या जीवनात भरपूर धन कमावते, श्रीमंत होते. 3- रवी ग्रहावर एकच रेषा येत असेल तर ती व्यक्ती तिच्या जीवनात मोठ्या प्रमाणावर मान सन्मान, कीर्ती, प्रसिद्धी प्राप्त करते. 4- बुध ग्रहावर एकच रेषा येत असेल तर ती व्यक्ती तिच्या जीवनात व्यापारात अथवा नोकरीत मोठे यश मिळविते.

वरील चार ग्रहांचे शुभ फल त्या व्यक्तीस फक्त ग्रहावर जाणार्‍या एका रेषेने प्राप्त होतात. म्हणूनच फक्त उत्तम ठसा बोटांवर असून चालत नाही, तर त्या उत्तम गुण असलेल्या ठश्याच्या खालील ग्रह व रेषा शुभ असले पाहिजेत. म्हणजेच ठश्यांच्या साथीला नशीब चांगले हवे तरच जीवनात व्यतीच्या हुशारीला व तिच्या उपजत कौशल्याला दिशा मिळते व ती जीवनात यशस्वी होते. आपण हातावरील चार बोटे पाहिलीत. परंतु अंगठ्यावर आलेली उभी रेषा शुभ फल दायी असली तरी, अंगठ्याच्या पहिल्या पेर्‍या खाली जर यव चिन्ह येत असेल तर ती व्यक्ती तिच्या जीवनात आर्थिकदृष्ट्या निश्चितच संपन्न असते.

आकृतीत अंगठ्यावरील यव चिन्ह आहे, हे चिन्ह फक्त डाव्या हातावर असता आई वडिलांच्या अधिपत्त्याखाली असताना कोणत्याही गोष्टींची कमतरता असत नाही. यव चिन्ह फक्त उजव्या हाताच्या अंगठ्यावर असेल तर व्यक्ती स्वतःच्या कर्माच्या प्रयत्नाने कमाई ला सुरवात केल्यानंतर आयुष्यात सधन होते, कर्जबाजारी होत नाही. पोटा पाण्याची चिंता राहत नाही. दोन्ही हातांवरच्या अंगठ्याच्या पहिल्या पेर्‍यावर यव चिन्ह असेल तर आयुष्यभर आर्थिक चिंता सतावत नाही.

आकृतीत अंगठ्यावरील यव चिन्ह

अंगठ्यावर जसे पहिल्या पेर्‍याखाली यव चिन्ह शुभ त्याचप्रमाणे अंगठ्यावर चक्र व मयूर पंखासारखे चिन्ह सुद्धा शुभ फलदायी आहे. आयुष्यात हे लोक आपल्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होतात.

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

8888747274

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com