भोजनाचा मनावर होणारा परिणाम

भोजनाचा मनावर होणारा परिणाम

सात्त्विक अन्न खाण्यामुळे आपल्यात एक प्रकारचा बदल दिसून येतो. कारण जसे अन्न, तसे मन होते. सात्त्विक अन्न हे फक्त शाकाहारी नाही, तर ते ईश्वराचे स्मरण करून बनवलेले अन्न असते. जर आपण रागाच्या भरात स्वयंपाक केला असेल, तर त्यास सात्त्विक अन्न म्हणत नाहीत. म्हणून स्वयंपाक करणार्‍याने कधीही रागाच्या भरात, उदास, नाराज होऊन स्वयंपाक करू नये. स्वयंपाक करत असताना कधीही आईला, बहिणीला, पत्नीला (जे कोणी स्वयंपाक करत असतील, त्यांना) ओरडू नये, रागवू नये, त्यांच्याशी भांडू नये. कारण त्या स्थितीत त्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन स्वयंपाक करत असताना, त्या पदार्थांत त्याच प्रकारची स्पंदने जातात आणि तेच आपण खाणार असतो. ही लक्षात ठेवण्याची महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आणि म्हणूनच पूर्वी सोवळ्याने स्वयंपाक करण्याची पद्धत होती.

भोजन तीन प्रकारचे असते

(1) जे आपण हॉटेलमध्ये खातो (2) जे घरात आई, पत्नी बनवते आणि (3) जे आपण मंदिरात अन्नकोटात खातो, ते भोजन. तिन्ही भोजनांत वेगवेगळी स्पंदने असतात.

(1) हॉटेलमध्ये पदार्थ बनवतात, ते विकत घेऊन खावे लागते. ते आपण नेहमी खाल्ल्यास त्यातील स्पंदने आपणास आंतरिक समाधान देत नाहीत. त्यामुळे कधी कधी त्या अन्नाने आपणास त्रासही होतो. ते पदार्थ कोण शिजवतं, त्यावेळी त्याच्या मनात काय चालले आहे, त्याचा भाव कोणता आहे, ते सगळं त्या अन्नात उतरतं, तेच संस्कार त्या अन्नावर होतात. तोच भाव आपल्यात उतरतो.

(2) घरात आई, पत्नी जे पदार्थ करते, ती फार प्रेमाने करत असते. म्हणून त्या पदार्थांंत सात्त्विक स्पंदने असतात, ती आपणास समाधानी बनवतात.

परंतु हल्ली अनेक घरांत स्वयंपाकी ठेवले जातात. त्यांच्या मनातील विचार आपणास सुख देत नाहीत.

घरात मुलगा जेवत असेल आणि आपल्या आईला म्हणत असेल, की मला अजून एक पोळी वाढ. तेव्हा आईचा चेहरा आनंदाने फुलून येतो. ती अजून प्रेमाने एक पोळी त्याला वाढते. त्यात तिचे प्रेम असते, आनंद असतो. पण हेच आपण स्वयंपाक्याकडे मागितले, तर तो वाढेल; पण त्यात प्रेम असेलच, असे नाही. असे जेवण अंगी लागत नाही.

(3) मंदिरात अन्नकोटात आपण जे खातो, तो भगवंतास दाखवलेला प्रसाद असतो. ती भावना प्रसादाची असते. ते अन्न ईश्वराला स्मरण करून शिजवलेले असते म्हणून ते अन्न प्रसाद होते.

आपणही रोज घरात ईश्वरासाठी भोजन बनवत आहोत, असे समजून त्याच्या स्मरणात अन्न शिजवावे म्हणजे तो प्रसाद होईल. यासाठी आपले स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा, मन शांत ठेवा, देवाचे भजन किंवा गीत लावा किंवा नामस्मरण करत स्वयंपाक करावा म्हणजे रोज प्रसादच भक्षण होईल.

स्वयंपाक करताना अनेक उपायही करता येतात. घरात काही त्रास असेल, तर त्यावर हा एक उपाय आहे. ती गोष्ट चांगली व्हावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करत स्वयंपाक करावा.

परमेश्वरास प्रार्थना करावी, की हे अन्न खाणार्‍यांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम, वात्सल्य, आपुलकी, विश्वास निर्माण होऊ दे. त्यांच्या मनात शांती निर्माण होऊन सकारात्मकता, तुझ्याविषयी श्रद्धा निर्माण होऊ दे, अशी प्रार्थना अन्न शिजवताना मनातल्या मनात म्हणत जा.

अन्नात जादू आहे आणि त्यावर स्वयंपाक करताना होणार्‍या संस्कारांचाही परिणाम होतो. स्वयंपाक करणार्‍याच्या मानसिक भावभावनांच्या संस्कारांचा त्याच्यावर विलक्षण परिणाम होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजी असो, कुकर असो, काही असो, त्या पात्राला हात लावून कृष्णार्पणमस्तु म्हणून नमस्कार करा. मग बघा, काय जादू होते. सगळी आसपासची सूक्ष्म स्पंदनं संपून जातील आणि उरेल किंवा तयार होईल प्रसाद !

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com