आला आला बैलपोळा

आला आला  बैलपोळा

आला आला शेतकर्‍या, पोयाचा रे सण मोठा,

हाती घेईसन वाट्या, आतां शेदुराले घोटा,

आतां बांधा रे तोरन, सजवा रे घरदार

खूप सुंदर अशा शब्दात बहिणाबाईंनी या बैलपोळा सणाचे वर्णन केले आहे. श्रावण महिन्यात सणांची रेलचेल पहायला मिळते. अनेक सण या महिन्यात आपल्याला भेटीला येतात. पावसाचे दिवस असल्याने सृष्टी आधीच हिरवाईचा शालु नेसुन नवीकोरी झालेली असते. संपुर्ण वातावरणात एक गारवा पसरल्याने मानवी मन देखील ताजं तवानं झालेलं असतं अश्या या श्रावण महिन्यात आपण नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यांसारखे सण साजरे करतो आणि या श्रावण महिन्याची सांगता होते ती श्रावण महिन्याच्या अखेरीस येणार्‍या पोळा या सणाने.

श्रावण अमावस्येला अर्थात पिठोरी अमावस्येला शेतकरी बांधव आपल्या सर्जा-राजाचा Sarja-Raja हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतांना आपल्याला दिसतात. संपुर्ण महाराष्ट्रात बळीराजा मात्र आपल्या जिवाभावाच्या सोबत्याचा हा सण अत्यंत पारंपारीक पध्दतीने आजही साजरा करतांना दिसतो.

आज आवतन घ्या उद्या जेवायला या! असं आमंत्रण या बैलांना पोळ्याच्या आदल्या दिवशी दिलं जातं. दुसर्‍या दिवशी सकाळी बैलांना नदीवर न्यायचं, त्यांना घासून अंघोळ घालायची. घरी आणल्यावर त्यांच्या सर्वांगावर गेरूने ठिपके द्यायचे, शिंगाना बेगड, डोक्याला बाशिंग, गळयात कवडया आणि घुंगरांच्या माळा घातल्या जातात. पायांमधे तोडे घालतात. नवी वेसण नवा कासरा घातल्यानंतर अंगावर रेशमी नक्षीकाम केलेली झुल पांघरली जाते. बैलांचा गोठा स्वच्छ करण्यात येतो. घरातील सुवासिनी बैलांची विधीवत पुजा करतात.

बैलांना पोळयाच्या दिवशी कोणतेही काम करू दिले जात नाही. गोडाधोडाचा पुरणपोळीचा घास त्याला भरवला जातो. बैलाची कायम निगा राखणार्‍या गडयाला नवे कपडे दिल्या जातात. पोळा हा सण बैलाचा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करण्यात येतो हा सण श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो या दिवशी शेतकरी बैलाची पूजा करतात. बैलांना कामावरून आराम मिळतो. सायंकाळी सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढली जाते व स्पर्धा आयोजित केल्या जातात हा सण शेतकर्‍यांचा महत्त्वाचा सण आहे या दिवशी प्रत्येक घरात पुरणपोळी केली जाते.

बैलपोळाची एक कथा अशी आहे की, कैलासावर शंकर-पार्वती सारी पाट खेळत होते त्यावेळी पार्वतीने डाव जिंकला पण शंकर भगवान Lord Shankar म्हणाले की, मी हा डाव जिंकला आणि त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि या वादाला साक्षी होता तो म्हणजे फक्त नंदी तेव्हा पार्वतीने नंदीला विचारले की डाव कोणी जिंकला त्यावेळी नंदीने शंकराची बाजू घेतली. तेव्हा पार्वती मातेला खूप राग आला आणि तिने नंदीला शाप दिला. मृत्यु लोकी तुझ्या मानेवर जू बसेल. तुला जन्मभर कष्ट करावे लागतील हा शाप ऐकून नंदीला त्याची चूक समजली. त्याला खूप वाईट वाटले त्याने देवी पार्वतीला माफी मागितली तेव्हा देवी पार्वती ने सांगितले की शेतकरी वर्षातून एक दिवस देव मानून तुझी पूजा करतील त्या दिवशी तुझ्या मानेवर जू ठेवणार नाहीत आणि तेव्हापासून हा बैलपोळा हा सण साजरा केला जातो

हिंदु संस्कृतीत वृक्षांप्रमाणेच वन्यजीवांना देखील पुजनीय मानल्या जातं. वर्षभर शेतात शेतकर्‍यासमवेत बरोबरीने राबणार्‍या बैलाप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणुन पोळा या सणाकडे आपण पाहातो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com