
सौ. वर्षा भानप
श्री गणेश श्रीकृष्ण खापर्डे हे उमरावतीचे फार मोठे श्रीमंत गृहस्थ होते. त्यांना वर्हाडात सर्वजण दादासाहेब म्हणत. त्यांनी विनंती केल्यावर महाराज त्यांच्या घरी गेले. महाराजांची यथासांग विधिवत पूजा झाली. तेथेच एक गणेश आप्पा म्हणून एक लिंगायत वाणी होता. त्याच्या पत्नीचं नाव चंद्राबाई असं होतं. ती परम भाविक होती. ती पतीला म्हणाली, कसही करून या साधूंना आपल्या घरी आणा बरं! तुम्ही विनंती करून पहा.
आपलं मन जर निष्पाप असेल तर यांच्या आगमनामुळं आपलं घर पवित्र होईल. त्यावर तिचा नवरा गणेश आप्पा म्हणाला, तुला काय वेड लागलंय की काय ? ह्या साधूंना घरी न्यायला फार मोठा बलवत्तर वशिला पाहिजे. श्री खापर्डेसारख्या श्रीमंत माणसाला यांना घरी न्यायला किती कष्ट पडले असतील ते लक्षात घे व उगीच हट्ट करीत बसू नको. त्यावर चंद्राबाई म्हणाली, माझ मन मला सांगत आहे कि, आपल्या घरी साधू श्री गजानन महाराज येतील. तुम्ही त्यांना नुसती घरी येण्याची विनंती करा. गरीबावर संतांची विशेष प्रीती असते. महाराजच गणेश अप्पाचा हात धरून म्हणाले, अरे तुझं घर येथून किती लांब आहे ? मला तुझ्या घरी येऊन काही वेळ बसावं असं वाटतं. मनात असेल ते बोल ना रे ? तुला कसली रे भीती?कोणतीही शंका कुशंका मनात न आणता माणसानं स्पष्ट बोलावं रे !
महाराजांनी असं म्हटल्यावर गणेश आप्पाचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने महाराजांना घरी नेले व उभयता पती पत्नीने महाराजांची पूजा केली व त्यांचा संसार त्यांनी श्री च्या चरणी अर्पण केला. अशा अनेक पूजा झाल्या. प्रत्येक पूजेच्या वेळी आत्माराम भिकाजीचा भाचा बाळाभाऊ हजर असे. हा मुंबईचा राहणारा असून तारमास्तर होता. तो रजा घेऊन उमरावतीस त्याच्या मामाला भेटायला आला होता. या बाळाभाऊंनासुद्धा महाराजांचा ध्यास लागला. ते म्हणाले की, अशा साधूचे चरण सोडून कोठेही जाऊं नये. हा प्रपंच पूर्णपणे अशाश्वत आहे मग मी कशाला त्यात आपले मन गुंतवू? मी यांचे चरण सोडणार नाही. या विचाराने प्रत्येक पूजेला बाळाभाऊ हजर रहात होते.
काही दिवसांनी महाराज उमरावतीहून शेगावी परत आले. पण मळ्यात न जाता मोठ्याच्या मंदिराच्या परिसरात आले. त्या मंदिराच्या पूर्वेस एक ओसाड जागा होती. तेथे श्री महाराज येऊन राहिले. आपल्या मळ्यातली जागा सोडून श्री गजानन महाराज ओसाड जागेत जाऊन राहिले आहेत ही बातमी कृष्णा पाटलांना कळली. ते धावत येऊन महाराजांना दंडवत करून मान खाली घालून बसले. दुःखामुळे त्यांचं वस्त्र भिजून जाईल इतकं पाणी त्यांच्या डोळ्यांतून वाहत होतं.
त्यांना महाराज म्हणाले, एवढा का रडतो रे बाबा? तुला कोणते दुःख झाले ते मला सांग बरं ! त्यावर दोन्ही हात जोडून पाटलांनी विचारले, महाराज आपण माझ्या मळ्याचा अव्हेर का बरं केलां? असा कोणता अक्षम्य अपराध माझ्याकडून झाला? मी आपले लेकरु आहे. ही एका माळ्याच्या मालकीची देशमुखाच्या बाजूची जागा आहे. येथे तुम्ही राहू नका. मळ्यात रहायची मर्जी नसेल तर तुम्ही माझ्या राहात्या घरी चला. तुम्हावाचून मला काहीच प्रिय नाही. अवघ्या पाटील मंडळीना ही गोष्ट कळली. ते ही महाराजाना विनंती करू लागले कि , तुम्ही आमच्या घरी या. महाराज म्हणाले, तुमच्या हितासाठीच मी या जागेवर येऊन बसलो आहे व ते का? हे सर्व तुम्हाला नंतर कळेल. पण आता यावर काही वाद नको ! जा बंकटलालाला घेऊन या. मी त्याचं घर सोडल्यावर तो रागावला नव्हता का? ते त्याला विचारा. माझी तुमच्यावर कृपा आहे. बंकटलाल तेथे गेले व तेथे जमलेल्या मंडळीची समजूत घालून म्हणू लागले कि, यांच्या मर्जीविरुद्ध तुम्ही महाराजाना मळ्यांत नेऊ नका. श्री गजानन महाराज जेव्हा येथून गेले तेव्हा त्याच्या मर्जीपुढे मी काहीच करू शकलो नाही.
बंकटलालनी सांगितलेल्या ह्या प्रस्तावावर सर्वांचं एकमत झालं. सर्वांनी मिळून त्या ठिकाणी मठ बांधला व ह्या कार्याकरिता त्यासाठी परसराम सावजींनी विशेष कष्ट घेतलेत. श्री गजानन महाराजांबरोबर नेहमी त्यांचे चार नि:स्सीम भक्त राहात होते ते भास्कर, बाळाभाऊ, पितांबर आणि उमरावतीचे गणेश आप्पा ! त्याचबरोबर रामचंद्र गुरवही बरोबर राहात होते. अशा या पांच पांडवांमध्ये श्री हरी म्हणून गजानन महाराज शोभून दिसू लागले. तशातच बाळाभाऊंची वृत्ती अति विरक्त झाली होती. त्यांनी त्यांच्या नोकरीची अजिबातच पर्वा केली नाही. आपण घरी या म्हणून घरच्या लोकांची त्यांना वरचेवर पत्रे येत होती. पण त्यांच्यावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. भास्कर समर्थांना म्हणाला, गुरुराया, हा पेढे खायला आतुर झाला होता म्हणून आपल्याला सोडून दुसरीकडे जायला धजत होता. याला घरी जायची इच्छा होत नाही म्हणून तुम्ही याला चांगला मार द्या म्हणजे हा आपल्या घरी जाईल. बाळाभाऊनी मोठं मोठे आमिष दिले पण त्याचा काही फायदा झाला नाही उलट ते नोकरीचा राजीनामा देऊन पुन्हा परत आले.
बाळाभाऊंना पुन्हा शेगावात आलेलं पाहून भास्कर त्यांना म्हणाले, येथे वरच्यावर येऊन आम्हाला का त्रास देतोस रे?ओढाळ बैलाला बडवून हाकलून दिलं तरी पुन्हा तो कायम हिरव्या गवतावर पडायला येत असतो तू तसाच लोचत दिसतोस. लोचटा तुझी कृति बिलकुल अगदी तशीच आहे. ज्याला संसाराची विरक्ति झाली आहे त्यांनीच येथे यावं.भास्करांचं असं गर्वयुक्त भाषण महाराज स्वतः ऐकत होते जे त्यांना ते अजिबात आवडलं नाही. भास्करांचे अज्ञानमती ज्ञान नष्ट करण्यासाठी श्री गजानन महाराजांनी एक घटना केली. एका गृहस्थाच्या हातातली एक बरीच मोठी छत्री घेऊन महाराजांनी बाळाभाऊंना खूप झोडपून टाकले. ती छत्री मोडून गेली मग एक मोठी वेळूची भरीव काठी हातात घेऊन त्या काठीने बाळाभाऊंना मारायला सुरुवात केली. पण बाळाभाऊ समर्थांच्या पुढे तसेच पडून राहिले. कित्येकांना वाटलं की, बहुधा हे माराने मरण पावले. बाळाभाऊना दिलेला मार पाहून भास्करही चिंतातुर झाला होता. पण समर्थांच्या समोर बोलण्याची त्यांची छाती होईना.
बाळाभाऊंना समर्थानी मारायला सुरवात केल्यावर, छत्री नंतर काठीही मोडली. ते पाहून समर्थ बाळाभाऊंना पायानं तुडवू लागले. मठातला हा प्रकार पाहून महाराजांचा शिष्य समुदाय पळत गेला. त्यातले काही त्यांच्या आवडीच्या मंडळीना बोलवायला गेले. बंकटलाल, कृष्णाजी मठाकडे धांवत आले पण समर्थांचा हात धरायला कुणीच तयार होईना ! बंकटलाल भीत भीत म्हणाले, समर्था हा आपला भक्त आहे. आता तरी याला पायाने तुडवू नका. बंकटलालांचे बोलणं ऐकून समर्थ हास्य स्मित करीत म्हणाले, हे ईसं काय असंबद्ध बोलता? ना मी बाळाला मारलंय , ना त्याला तुडवलंय ! त्याला निरखून पहा म्हणजे तुम्हाला कळेल. महाराज बाळभाऊंना म्हणाले, वत्सा, उठ आता व या सर्व मंडळींना तुझे अंग दाखव. जशी समर्थांची आज्ञा झाली तसेच तेथील मंडळी बाळाभाऊंना निरखून पाहू लागले. ते पहातात तो वळाचे कोठेही नांव नाही. कुठं काही लागलेलंही दिसेना. उलट अगोदर सारखेच ते आपल्या आनंदात निमग्न होते. हे सगळं झाल्यावर भास्करांना बाळाभाऊंचा अधिकार कळला.
सुकलाल अगरवाल म्हणून एकजण बाळापुरात होते. त्यांच्या गोठ्यात एक द्वाड गाय होती. घरी बांधून ठेवलेलं असलं तरी हां हां म्हणता बांधलेली चर्हाटं तोडून टाकायची. साखळीला सुद्धा ती जुमानत नसे. ती गाय नसून एक प्रकारे वाघीणच होती. बाळापुरातले लोक तिचा त्रास सहन करून करून अगदी कंटाळून गेले होते.लोक सुकलालना म्हणाले, या गाईला खाटकाला द्या किंवा बंदुकीने गोळी घालून मारून टाका. त्यावर सुकलाल लोकांना म्हणाले, प्रयत्न करून तुम्हीच तिला मारुन टाका. एका पठाणानें तिला बंदुकीने मारण्याचा प्रयत्न केला पण तिला त्याबातीत कसे काय कळले कोण जाणे !
मग तिने आपल्या शिंगाने मारून पठाणाला उताणे पाडले. मी गायीला परगांवाला नेऊन सोडून दिली होती. पण ती पुन्हा परत आली. आता मी काय करु ते तुम्हीच सांगा. त्यावर लोक म्हणाले, आता त्यावर एकच उपाय आहे. शेगावच्या गजानन महाराजांनी गोविंद बुवांचा घोडा गरीब केला होा तसा आता तुम्ही ही या गाईला घेऊन शेगांवाला जा व तिला गजानन महाराजाना अर्पण करा. तें अवघ्यांना पसंत पडले. एका पटांगणात हरळकुंढयाचा ढीग केला व तेथेच बाजूला गाईला खाण्यासाठी सरकी ठेवली तेव्हा कुठं ती गाय ती सरकी खाण्यासाठी आली. जशी गाय आली त्याचबरोबर दहावीस जणांनी फास टाकून तिला पकडले व साखळदंडानें बांधून गाडीवर उचलून ठेवून श्री गजानन महाराजांना ती गाय अर्पण करण्यासाठी शेगावला घेऊन आले. पण आश्चर्य असं झालं कि, जस जसं शेगाव जवळ येऊ लागलं तसतसं गाईच्या स्वभावात बदल येऊ लागला.
महाराजापुढे पुढे येताच ती एकदम गरीब झाली. ते दृष्य पाहून महाराज म्हणाले, हा काय मूर्खपणा केला? गाईला अशा यातना देणं बरोबर आहे का? तिला आत्ताच माझ्यासमोर मुक्त करा. ती आता कोणालाही काही करणार नाही. महाराज तेथे त्वरेने येऊन त्यांनी आपल्या पवित्र हातानी गाईची बंधने तोडली. बंधने तुटल्यावर गाय गाडीच्या खाली आली. तिने श्री गजानन महाराजाना वंदन करण्यासाठी आपले पुढचे पाय महाराजांसमोर टेकले. नंतर खाली मान घालून तीन प्रदक्षिणा केल्या व श्रीं चे दिव्य चरण चाटूं लागली. हा झालेला प्रकार सर्वांनी आपल्या उघडया डोळ्यांनी पाहीला. समर्थांच्या प्रभावाला शेषही वर्णूं शकणार नाही. समर्थ धेनूला म्हणाले, बाई, आता कोणाला त्रास देऊ नकोस. हा मठ सोडून पण कोठेही जाऊ नको. ही लीला पाहून सर्वांनी समर्थांचा उच्च स्वरानें त्रिवार जयजयकार केला.
कारंज्याला घुडे नांवाचा एक श्रीमंत माणूस होता. त्याला पोटाचा आजार झाला होता पैसा खर्च करून काही उपयोग झाला नाही. त्याने समर्थांची कीर्ति ऐकली होती. म्हणून तो शेगावला आला. रोगाच्या व्यथेने त्याला चालायला येत नसल्याने दोघां तिघांनी उचलून त्याला महाराजांसमोर शेगावला आणले. समर्थाना साधा नमस्कार करायला सुद्धा तो असमर्थ होता. त्याच्या पत्नीने महाराजांसमोर पदर पसरला आणि म्हणाली की, दयाघना ! मी आपली धर्मकन्या, माझ्या पतीच्या दुर्धर यातना आपण हरण कराव्यात अशी प्रार्थना करते. माझ्या कुंकवाचे रक्षण करा हीच विनंती. त्यावेळी समर्थ आंबा खात होते. तोच आंबा त्यांनी बाईंच्या अंगावर फेकला व म्हणाले की, तू आता येथून जा, हा आंबा तुझ्या पतीला खायला दे, म्हणजे त्याचं पोट दुखणं बंद होऊन जाईल. भास्कर म्हणाले, अहो बाई, आतां येथे काही बसू नका.जा लवकर आपल्या घरी व पतीला लगेच हा आंबा खायला द्या. महाराजांच्या हातून जो आंब्याचा प्रसाद तुम्हाला मिळालाय तोच तुमच्या पतीला खायला द्या म्हणजे तुमचे काम होईल व त्यांना अत्युत्तम गुण येईल. बाईने पतीला खाण्यास दिला.
घरी आल्यावर जो तो त्यांना विचारू लागला कि शेगावात काय काय झालं?असं विचारू लागल्यावर बाईनी शेगावचा वृत्तांत तेथील लोकांना सांगितला व म्हणाली कि, समर्थांनी प्रसाद म्हणून आंबा दिला व आदेश केला कि हा आंबा तुझ्या पतीला तुझ्या हातानं खायला दे. त्याप्रमाणे मी केले. आज सकाळी त्यांना आंबा खाऊ घातला. हे वैद्यांनी जेव्हा ऐकले, तेव्हा ते बाईंना म्हणाले, अहो बाई, तुम्ही हे काय केले ? आंबा हेच या पोटांतील रोगाला कुपथ्य आहे. वैद्यकीय निदानात हेच सांगितल आहे. तो प्रसाद तुम्ही खायला हवा होता. पत्नीचे पुण्य पतीला उपयोगी पडते. वैद्यांचं बोलणं ऐकून सर्व नातेवाईक घाबरले. काही वेळानं असे अघटित घडलंं की, लक्ष्मणाचे पोटाला अचानक रेच होऊन ते मऊ झालं. शौच्यावाटे व्याधि निघून गेली. पहिल्यासारखी शक्ति आली. लक्ष्मण बरा झाल्यावर शेगांवला आला आणि महाराजांना म्हणू लागला की, महाराज आपण माझ्या घरी या व आपले पवित्र चरण माझ्या घरास लावून पवित्र करा. त्याच्या विशेष आग्रहा वरून महाराज कारंज्याला गेले. लक्ष्मणाने घरी नेऊन पूजा केली व म्हणाला कि ही अवघी संपत्ती आपलीच आहे. तिचा दक्षिणा म्हणून स्वीकार करावा. तोंडानं असं म्हणाला पण एका ताटांत काही रुपये ठेऊन ते ताट त्याने पुढे केले. ते बघून महाराज म्हणाले, सगळं मला अर्पण करू माझं काही उरलं नाही असं आत्ता तूच म्हणालास ना?मग हे रुपये कोठून आले?असे दांभिकपणाचे चाळे करु नको. मला तू आपलं घर दिलं मग उघड सगळी दारं आता आणि सगळी कुलुपं रस्त्यावर फेकून दे. यावर लक्ष्मण मौन धरुन बसला. पण समर्थानी त्यांचा आग्रह सोडला नाही.
म्हणाले, खजिन्याचे दार उघड. लक्ष्मणाने भीत भीत दार उघडले आणि खजिन्याच्या उंबर्यावर स्वतः जाऊन बसला व म्हणाला , महाराज , या व वाटेल ते घेऊन जा. त्याच्या अंतरीचा भाव वेगळाच होता. हे त्याचे दांभिक पण समर्थांच्या लक्षात आले होतेच. लक्ष्मणाचे रंगरूप बघून महाराजानी त्याचं घर सोडून दिलं. खरं तर त्याच्या घराची वा धन दौलतीची गरज समर्थाना बिलकुल नव्हती. ते तर वैराग्याचे सागर पण तो जे बोलला त्याचा सत्यपणा समर्थानी बघितला व त्यांना त्याच्या दांभिकपणाचा राग आला. म्हणून ते उठून गेले. जाता जाता बोलले, माझं माझं म्हणतोस काय? भोग त्याची फळं ! मी तुझ्यावर कृपा करायला आलो होत व तुला त्यापेक्षा दुप्पट द्यावं असा विचार करून तुझ्या घरी आलो होतो. पण ते तुझ्या नशिबात नाही रे तेच पुढे खरे झाले. सहा महिन्यांत लक्ष्मी फस्त होऊन लक्ष्मणावर भीक मागायची वेळ आली. परमार्थांत किंचितही खोटेपणा खपत नाही हे लोकांच्या लक्षात यावं यासाठीच समर्थानी हे चरित्र लिहून घेतलं. हा श्री गजानन विजय ग्रंथाचा हा दहावा अध्याय सर्व श्री गजानन महाराजांच्या भक्तांना सुखदायी होवो व सर्वाचे कल्याण करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करोत.
9420747573