आध्यात्मिक प्रेम

आध्यात्मिक प्रेम

जीवनामध्ये आनंदी राहण्यासाठी शाश्वत प्रेमाने भरपूर राहणे आवश्यक आहे. शाश्वत प्रेम केवळ प्रभूचे प्रेम आहे, जे दिव्य (दैवी) व आध्यात्मिक प्रेम आहे. या संसारात (दुनियेमध्ये) जेव्हा आपण दुसर्‍यावर प्रेम करतो तेव्हा आपण त्या व्यक्तिच्या बाह्य रुपावर केंद्रित होतो आणि आपल्याला जोडणार्‍या आत्मिक प्रेमाला विसरून जातो. खर्‍या प्रेमाचा अनुभव आम्ही अंतःकरणापासून अंतःकरणापर्यंंत (मनापासून) आणि आत्म्यापसून आत्म्यापर्यंत करतो. व्यक्तीचे बाह्य रूप हे अभिव्यक्त रूप असते त्यामुळे त्याच्या आतमध्ये असलेले खरे प्रेम ते दडपून टाकते.

समजा आपल्याकडे खाण्यासाठी काही धान्य आहे. धान्य प्लास्टिकच्या थैलीत किंवा डब्यात ठेऊ शकतो, परंतु आपण त्या थैलीला किंवा डब्याला नाही, तर त्याच्या आतील धान्याला खाण्यासाठी इच्छुक असतो. त्याचप्रमाणे आपण एखाद्या व्यक्तिला म्हटलं की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तर आपण त्याच्या बाह्य सौंदर्यापेक्षा त्याच्या अंतरी असलेल्या सद्गुणांच्या आचरणांवर किंवा आत्मिक रूपावर प्रेम व्यक्त करत असतो.

संत राजिंदर सिंह जी महाराज
संत राजिंदर सिंह जी महाराजSant Rajinder Singh ji Maharaj

हे आपल्याला कसे कळेल? जग हे परिवर्तनशील आहे. आयुष्यात मानवामध्ये किती बदल होतात. सुुरुवातीला तो एक नवजात शिशु असतो, मग लहान बालक असताना शाळेत जातो, नंतर किशोरावस्थेत येतो व त्यानंतर वयस्क म्हणजे तीस, चाळीस, पन्नास, साठ, सत्तर, ऐंशी, नव्वद, शंभर वर्ष ओलांडतो. वयोमानानुसार त्या व्यक्तिच्या स्वभावात, शरिरात अमूलाग्र बदल होतात तरी सुद्धा आपण त्या व्यक्तीवर आयुष्यभर प्रेम करतो, जरी त्या व्यक्तीचे बाह्यस्वरूप सतत बदलत असले तरीही, वास्तविक आपण नेहमी त्या व्यक्तीच्या अंतरी असलेल्या आत्मिक रूपावर, अंतरी असलेल्या सद्वर्तन, सद्गुणांवर प्रेम करतो.

वैशिष्ट्य म्हणजे आम्ही त्या व्यक्तीच्या आत्मतत्वावर प्रेम करतो. आम्हाला त्या व्यक्तीचे मूळ (आत्मिक) स्वरूप आवडते, आणि ते मूलभूत आत्मिक रूप म्हणजे स्वयं प्रेम होय. आपल्या जीवनाचा उद्देश हा आहे की खरे आत्मिक स्वरूप जाणून स्वत:ला ओळखणे आणि परमात्म्याला प्राप्त करणे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संतसद्गुरू आपली मदत करतात. एक पूर्ण संत सद्गुरु आपल्या शिष्यावर कृपादृष्टीने शक्तिपात दीक्षा देऊन शिष्याच्या आत्म्यास त्याच्या अंतरातील दिव्य मंडलातील प्रभूच्या दिव्य ज्योति (तेज:पुंजप्रकाश) व श्रुतिशी(अनहद नाद) जोडले जाण्यासाठी पात्रता निर्माण करतात. तेव्हा शिष्याला त्याच्या आत्मिक रूपाचा परिचय होतो. नंतर सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली नियमित ध्यान अभ्यास करून शिष्याचा आत्मा आध्यात्मिक मार्गावर प्रगती करत जातो आणि शेवटी प्रभू परमात्म्यात विलीन होतो.

या तर आपण सर्वजण आपल्या चित्तवृत्तीला बाहेरून हटवून अंतर्मुख होऊया, किंवा बाह्य नाशिवंत वस्तूंवरील ध्यान आसक्ती कमी करून परम आनंदाच्या (आत्मिक आनंदाच्या) लहरी अनुभवू या आणि आपल्या खर्‍या आत्मिक रूपाचा अनुभव घेऊया. तरच या मनुष्यदेहात येण्याचे आमचे ध्येय पूर्ण होईल, आणि आपण प्रभू परमात्म्यामध्ये लीन होण्याच्या मार्गावर कायमस्वरूपी अग्रेसर राहून जीवनाचे परम ध्येय प्राप्त करू शकतो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com