स्वयंपाकघरासाठी आग्नेय दिशा श्रेष्ठ

स्वयंपाकघरासाठी आग्नेय दिशा श्रेष्ठ

वास्तुशास्त्रामध्ये घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा वाढवण्याच्या टिप्स सांगण्यात आल्या आहेत. किचनमध्ये वास्तू नियमांचे पालन केल्यास आरोग्य संबंधित लाभ होऊ शकतात.

1. किचनमध्ये पुरेसा प्रकाश आणि हवा येण्याजाण्याची व्यवस्था असावी. किचनमध्ये सूर्यप्रकाश आल्यास विविध प्रकारचे वास्तुदोष दूर होऊ शकतात. हवा खेळती राहिल्यास वातावरण आरोग्यवर्धक राहते.

2. स्वयंपाकघर आग्नेय म्हणजे दक्षिण-पूर्व दिशेला बनविणे सर्वात उत्तम राहते. ही दिशा अग्नीशी संबंधित कार्य करण्यासाठी श्रेष्ठ राहते. या व्यतिरिक्त वायव्य कोपरा म्हणजे उत्तर-पश्चिम दिशाही किचनसाठी योग्य राहते.

3.किचनमध्ये आग आणि पाण्याचे स्रोत एकत्र असू नयेत. पाणी आणि गॅस दूर-दूर ठेवावेत. हे दोन्ही तत्त्व एकमेकांचे विरोधी आहेत. हे एकत्र ठेवल्यास वास्तुदोष वाढतात.

4. स्वयंपाकघरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे, अन्यथा आरोग्यासाठी हे हानिकारक ठरते. स्वच्छता नसल्यास वास्तुदोषही वाढू शकतात. वास्तुदोषामुळे मानसिक तणावही वाढू शकतो.

5. रोज सकाळ-संध्याकाळ स्वयंपाक केल्यानंतर सर्वात पहिले देवाला नैवेद्य दाखवावा. असे केल्यास देवाच्या नैवेद्य स्वरूपात आपल्याला अन्न मिळते आणि यामुळे आपले विचार पवित्र होतात. नकारात्मक विचार दूर राहतात.

6 नेहमी प्रसन्न मनाने स्वयंपाक करावा. दुःखी किंवा क्रोधामध्ये स्वयंपाक करू नये.

स्वयंपाक घरातील या चुका टाळा

भारतीय संस्कृती, परंपरा यांमध्ये अनेक गोष्टींना महत्त्व आहे. आपली वास्तू ही आपल्यासाठी सबकुछ असते. आपण ज्या घरात राहतो, ते नीटनेटके ठेवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. कोणत्याही घरातील महत्त्वाची जागा म्हणजे स्वयंपाकघर वा आधुनिक भाषेतील किचन. दररोज पोटाची खळगी भरण्यापासून ते भांड्याला भांडं लागण्यापर्यंत अनेक गोष्टी स्वयंपाकघरात केल्या जातात. घरातील महिला ज्या ठिकाणी सर्वाधिक वेळ घालवतात, ते स्वयंपाकघर. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी स्वयंपाकघरात वेगवेगळे प्रयोग केले जातात. मात्र, ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातही स्वयंपाकघराला महत्त्वाचे मानले गेले आहे. अनेक गोष्टी आपण जुनाट म्हणून त्याकडे लक्ष देत नाही. मात्र, पूर्वजांनी योग्य तर्क, शास्त्र आणि नेमक्या आधारावर त्या सांगितलेल्या असतात. त्यामागे निश्चित काहीतरी कारण असते. कालौघात अशा अनेक गोष्टी मागे पडलेल्या आपण पाहतो. स्वयंपाकघरात वास्तुशास्त्राप्रमाणे योग्य बदल केल्यास वास्तुदोष दूर होऊन आपणास धनलाभाचे योग प्राप्त होऊ शकतात. घरात सुख, शांतता, उत्तम आरोग्य प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते. स्वयंपाकघरात आपण करत असलेल्या काही चुकांमुळे वास्तुदोष वाढू शकतो, असे मानले जाते. स्वयंपाकघरातील कोणत्या चुका टाळाव्यात? या चुका सुधारल्यास काय फायदा होऊ शकतो? जाणून घ्या...

या चुकांमुळे होऊ शकते धनहानी

स्वयंपाकघर हे लक्ष्मीचे स्थान मानले जाते. स्वयंपाकघरातील अनेक गोष्टींचे योग्य पालन केल्यास, योग्य स्वच्छता, टापटीपपणा, नीटनेटकेपणा कायम राखल्यास लक्ष्मी मातेची कृपा होऊ शकते, असे सांगितले जाते. अनेक घरातील देवघर स्वयंपाक घरात असते. त्यामुळे आणखीन सावध राहणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात कधीही चप्पल-बूट घालून जाऊ नये. असे केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. याशिवाय कात्री, सुरी यांसारख्या धारदार वस्तू भिंतीवर अडकवू नये. असे केल्यास प्रगती मार्ग खुंटतात, अशी मान्यता असल्याचे वास्तुशास्त्र सांगतात.

दुधाबाबत मान्यता

स्वयंपाकघरातील सर्वांत महत्त्वाच्या पदार्थांमध्ये वरचा क्रमांक लागणारा घटक म्हणजे दूध. दुधाचे फायदे, दुधाचे महत्त्व आपणास वेगळे सांगावयास नको. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात दुधाचे व्यवस्थापन करताना अतिशय काळजी घेणे महत्त्वाचे असते. स्वयंपाकघरात दूध कधीही खुले ठेवू नये. दुधाची पातेली, दूध असलेले भांडे नेहमी झाकून ठेवावे. असे न केल्यास समस्या, अडचणींचा ससेमिरा मागे लागू शकतो. त्यात वाढ होऊ शकते. आर्थिक, शारीरिक, मानसिक समस्या, अडचणी उद्भवू शकतात, असे सांगितले जाते. याचे दुसरे व्यावहारिक कारण म्हणजे दूध हे जितके सक्षम, सकस आहे, तितकेच ते संवेदनशील आहे. दुधात एखादी गोष्ट पडून आपल्या पोटात गेल्यास आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात.

जेवताना घ्यावयाची काळजी

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात बसून भोजन केल्यास अनेक प्रकारच्या ग्रहदोषांपासून मुक्तता मिळते, अशी मान्यता आहे. मात्र, स्वयंपाकघरात भोजन करताना योग्य दिशांचे विशेष भान ठेवले पाहिजे, असे सांगितले जाते. स्वयंपाकघरात बसून जेवताना पश्चिम आणि दक्षिण दिशेकडे तोंड करू नये. तसेच स्वयंपाकघराच्या केंद्रभागी बसून जेऊ नये, असे सांगितले जाते. असे केल्यास त्याचे अनुकूल परिणाम पाहायला मिळतात, अशी मान्यता आहे. याशिवाय आपल्या स्वयंपाकघरातील शेगडी, गॅस बाहेरील व्यक्तीला दिसू नये, अशा पद्धतीने ठेवावी, असे वास्तुशास्त्र सांगते.

घरातील शेगडी, सिंक कोणत्या दिशेला हवी ?

स्वयंपाकघरात खाद्यपदार्थ तयार करताना गृहिणींचा चेहरा कोणत्या दिशेला असावा, यावर वास्तुशास्त्रात भर देण्यात आला आहे. घरात रांधताना गृहिणीचा चेहरा पूर्व दिशेला असावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते, असे सांगितले जाते. वास्तुशास्त्राप्रमाणे किचनमधील सिंक, पाण्याचे स्रोत, सांडपाण्याचे पाईप यांची दिशा उत्तरेस किंवा उत्तर पूर्व दिशेला असावी. त्याचप्रमाणे स्वयंपाकघराच्या छतावरून जाणारे पाण्याचे स्रोत उत्तर दिशेने जाऊ नये, असे सांगितले जाते.

या गोष्टींचीही घ्या काळजी

वास्तुशास्त्राप्रमाणे स्वयंपाक घरात मेज (डायनिंग टेबल) असल्यास त्याची दिशा उत्तरपूर्व असावी. यामुळे घरातील माणसांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते, असे सांगितले जाते. याशिवाय किचन आणि शौचालयांची भिंत एक नसावी. तसेच दुमजली घरांमध्ये किचनच्या वर शौचालय नसावे. तसेच घरात मुख्य प्रवेशद्वारासमोर किचनची खोली नसावी, असेही सांगितले जाते. वास्तुशास्त्राप्रमाणे किचनची खिडकी ही उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेल असायला हवी. स्वयंपाक घरातील खिडकी बहुतांश वेळ उघडीच असावी. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. घरातील सदस्यांमधील आपलेपणा वाढतो. नातेसंबंध दृढ होण्यास मदत होते, असे सांगितले जाते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com