Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधबंधन योगात अडकले सिद्धू?

बंधन योगात अडकले सिद्धू?

प्रफुुुल्ल कुलकर्णी

नवज्योत सिंग सिद्धू या क्रिकेटवीर व राजकीय नेत्याला सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच कारावासाची शिक्षा सुनावली. वलयांकित व्यक्तीला शिक्षा झाली कि प्रत्येक जण कुतूहलाने व उत्सुकतेने अशा प्रकरणाकडे बघतो. बंधन योग आला की तुमच्या स्वातंत्र्यावर गदा व तुम्हाला एका खोलीत बंदी राहण्याची शिक्षा भोगावी लागते. नियम अटींचे पालन करावे लागते.

- Advertisement -

हस्तसामुद्रिकशास्त्रात तुरुंगवास होणार असेल तर त्याचा अंदाज बांधता येतो. तुम्ही केलेल्या गुह्यात अथवा तुम्ही अडकलेल्या गुन्ह्यात तुमचा सहभाग असेल त्यानुसार बंधन योग असतो. तुरुंगवास कुठल्या वर्षी होईल किंवा कोणत्या वयात होईल हे सांगता येते. गुन्हा दाखल होण्याचे वय सांगता येते, मग तुम्ही एक दिवसासाठी का असेना पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेऊन दुसर्‍या दिवशी न्यायालयात उभे करून तुम्हाला पोलीस कस्टडी अथवा जमीन मिळू शकतो. गुन्ह्यात तुमचे नाव आले किंवा फौजदारी केस दाखल होणार असेल तर हातावर स्पष्टपणे संकेत मिळतात. थोडक्यात बंधन योग असतील तर तुरुंगवासाच्या खाणा-खुणा डाव्या व उजव्या हातावर पाहावयास मिळतात.

डावा व उजवा हात – डावा हाथ हा पूर्व जन्मीच्या संचिताचा व उजवा हात हा कर्माचा असतो. डाव्या हातावर तुरुंगवास लिहिलेला असेल तर त्यातून सुटका परमेेशरच करू शकतो. कारण डाव्या हातावरच्या रेषा चिन्हे सहसा बदलत नाहीत. संचिताचा डावा हात पूर्व जन्मीच्या पाप-पुण्याचा मानला गेला आहे. अर्थात त्यात पितृ-मातृ दोष असतात. हस्त रेषेवरून भविष्य कथन करताना डाव्या हातावरील रेषा ग्रह चिन्ह, यांचे शुभ अशुभ आधी बघावे लागते. स्त्री असो पुरुष डावा हात हा संचिताचा असतो.व्यक्तीच्या वाट्याला आलेल्या पापपुण्याच्या लेखाजोखा डाव्या हातावर असतो. संचितात जे लिहिले आहे, ती घटना निश्चितच घडून येते. त्यात व्यक्ती किंवा मनुष्य हतबल असतो.

उजव्या हातावर कर्म असते. मनुष्य जीवन कसे जगेल, त्याच्या आयुष्यात त्याच्या कर्माप्रमाणे त्याला जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असते. व्यक्तीने निरंतर व प्रयत्नपूर्वक काम केले किंवा निर्धाराने, कष्टाने, जिद्दीने जीवनात यशस्वी होण्याचेे ठरवले तर त्याचे भाग्य बदलते. एवढेच नव्हे तर जेव्हा व्यक्ती एखाद्या गोष्टीचा ध्यास घेते व कार्य सफल करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा उजव्या हातावरील रेषासुद्धा शुभदायी आकार घेतात किंवा नव्याने हातावर येतात.

याचाच अर्थ असा आहे की, उजव्या म्हणजे कर्माच्या हातातील भाग्य बदलण्याचे सामर्थ्य मनुष्याला परमेेशराने बहाल केले आहे ते बदलण्याचे सामर्थ्य तुमच्यात हवे व त्यासाठी तुमचा निश्चय हा खूप महत्वाचा असतो. प्रत्येकाचे नशीब वेगळे आहे म्हणजेच कर्म पण भिन्न आहे. प्रत्येकाच्या कर्मात सुख दुःख वेगळे आहे. त्याला जीवनात मिळणार्‍या सुखसोयी व संधी वेगवेगळ्या आहेत.

त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीचे नशीब वेगळे आहे. कोणी रस्त्यावर झोपडीत तर कोणी महालात जन्म घेतो. हे पूर्व जन्मीच्या संचितानुसार घडत असते. जीवन जगताना कर्मात होणार्‍या चुकांचे प्रायश्चित्त भोगावे लागते. म्हणजेच उजव्या हातावर शुभ अशुभ लक्षणांचा व्यतीच्या जीवनात परिणाम घडवून आणतात. हस्तसामुद्रिक असे एकमेव शास्त्र आहे की, ते कित्येक वर्ष आधी शुभयोग अथवा कुयोग यांचे भाकीत करू शकतात. मनुष्याच्या हातावर त्याचे संपूर्ण आयुष्य व आयुष्यातील सुख दुःखांचा काळ हातावर ग्रह, चिन्ह रेषा यांच्या नकाशाने उपलब्ध असतो. उजव्या हातावरील कुयोग टाळता येतात किंवा त्याची तीव्रता कमी करता येते. मात्र संचिताचा डाव्या हातावरील कुयोग हा फक्त परमेेशरच टाळू शकतो किंवा त्याची तीव्रता कमी करू शकतो.

चौकोन चिन्ह – हस्तसामुद्रिकशास्त्राप्रमाणे हातावरील चौकोन चिन्ह हे शुभ चिन्ह म्हणून मानले गेले आहे. परंतु आयुष्य रेषेच्या आत स्वतंत्रपणे चौकोन चिन्ह झाले असेल तर ते तुरुंगवास किंवा फौजदारी खटला दाखविते. चौकोन चिन्हाची सुरवात आयुष्य रेषेच्या आत ज्या वय वर्षात असेल त्या वय वर्षांत गुन्हा दाखल होतो. चौकोन चिन्ह छोटे मोठे आले त्याप्रमाणे तितक्या वर्ष तीव्रतेने खटला न्यायालयात प्रलंबित राहतो. पुढे उच्च न्यायालय व सर्वोच न्यायालयात अपील झाले तर खटला लांबतो.

ज्या वय वर्षात चौकोन चिन्हाची सुरवात आहे किंवा चौकोनाच्या वरच्या पहिल्या आडव्या रेषेच्या वयाला एक दिवस का असेना तुरूंगाची हवा खावी लागते. चौकोनाच्या सुरवातीपासून तुरुंगवासाच्या शिक्षेची टांगती तलवार खटल्याचा अंतिम सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत कायम राहते. सिद्धू यांच्या वय वर्ष 33 ला बरोबर चौकोन चिन्हाची सुरवात झाली व त्याच वय वर्षाला सिद्धू यांनी एका वृद्धाला रागाच्या भरात एक ठोसा दिला. ठोश्याने वृद्ध खाली कोसळला व बेशुद्ध पडला व नंतर इस्पितळात दोन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.

तळहातावरील आडव्या रेषा व त्या रेषेवरच आयुष्य रेषेच्या आत स्वतंत्र चौकोन चिन्ह हे तुरूंगवासाचे चिन्ह होय. तळहातावरील सर्व आडव्या प्रभाव रेषा या जीवनात अडथळा व विघ्न आणणार्‍या रेषा होत. तळहातावरील आडवी रेषा जिने आयुष्य रेषा छेदली आहे त्या रेषेवर आयुष्य रेषेच्या आत स्वतंत्र चौकी चिन्ह झाले असेल तर मोठ्या कलमांचा फौजदारी गुन्हा दाखल होऊन मनस्ताप होतो.

आकृतीत दाखविल्याप्रमाणे आडव्या प्रभाव रेषेला चिटकून आयुष्य रेषेच्या आत चौकोन चिन्ह पाहावयास मिळते. हातावरील आडव्या प्रभाव रेषा व्यक्तीच्या आयुष्यतील स्पीडब्रेकर होत त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात पुढे जाऊ देत नाही. तळहातावरील आडव्या रेषा ज्या व्यक्तीच्या हातावर असतील त्यांच्या प्रगतीत कायम अडसर किंवा अडथळे म्हणून काम करतात. व्यक्ती कितीही विद्वान असली तरी यशस्वी होत नाही. ज्या व्यक्तीच्या तळहातावर आडव्या रेषा नाहीत त्यांच्या जीवनात अडथळ्यांची शर्यत अभावानेच असते. या हातावरील आडव्या रेषेचे नामकारण झालेले नाही तरी त्याला मी राहू रेषा म्हणून नाव दिले आहे.

आकृतीत आयुष्य रेषेचा आत चौकोन आहेत ते तुरुंवासाचे नव्हे तर आयुष्यातील वाद व कटकटीचे असतात. आयुष्य रेषेच्या आत मंगळ रेषेच्या सहाय्याने अंगठ्याकडून अथवा शुक्र ग्रहावरून आडव्या रेषा आयुष्य रेषेपर्यंत येऊन थांबत असतील किंवा त्या आयुष्य रेषेला छेदल्याने बरेचसे चौकोन दिसत असतील तर हे चौकोन तुरुंगवासाची चिन्ह नव्हे. परंतु हे चौकोन चिन्ह आयुष्य रेषेला लांबपर्यंत आयुष्य रेषेच्या आत आहेत, तोपर्यंत त्या व्यक्तीच्या आयुष्यातील कलह किंवा कटकटी संपुष्टात येत नाहीत. हा काळ व कटकटीमध्ये व्यावसायिक, भागीदारी, कौटुंबिक, कोर्ट कचेर्‍यातील किंवा आपापसातील भांडणे व तंटे संपत नाहीत. थोडक्यात आयुष्य रेषेच्या आत उभ्या व आडव्या रेषेंमुळे बरेचसे चौकोन तयार झाले असतील तर ते कोणत्याही स्वरूपाचे कटकटीचे व वादांचे असू शकतात. जे वर्षोनुवर्ष मिटत नाहीत.

सिद्धू यांचा रस्त्यावर गुरूनाम सिंग यांच्याशी वाद झाला त्यावेळेस गुरूनाम सिंग 65 वर्षांचे वयस्कर गृहस्थ होते. सिद्धू यांनी गुरुनाम सिंग यांना ठोसा मारल्याने ते रस्त्यावर कोसळले. पुढे दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. गुरुनाम सिंग यांच्या कुटुंबाने सर्वोच्य न्यालयापर्यंत लढा दिला. परंतु सिद्धू त्यावेळी निर्दोष मुक्त झाले. परंतु गुरुनाम सिंग यांच्या वारसांनी परत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. न्यायालयाने निकालात नमूद केले की हाताचा वापर एक शस्त्र म्हणून देखील केला जाऊ शकतो. कोर्टाने म्हटले की, हा प्रहार शारीरिकरित्या तरूण व्यक्तीवर झाला नाही तर 65 वर्षांच्या व्यक्तीवर झाला होता. या प्रहाराचा परिणाम माहित नव्हता, असा दावा केला जावू शकत नाही. संयम गमावण्याचे परिणाम भोगावे लागतील. भारतीय दंड संहितेच्या कलम 323 अंतर्गत साध्या दुखापतीच्या गुन्ह्यासाठी सिद्धूला दोषी ठरवण्यात आले. 19 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्वेच्छेने दुखापत केल्याबद्दल दोषी ठरवले (भारतीय दंड संहितेच्या कलम 323) आणि 1 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. खझउ च्या कलम 323 (स्वेच्छेने दुखापत करण्यासाठी शिक्षा) मध्ये जास्तीत जास्त एक वर्षापर्यंय तुरुंगवासाची किंवा एक हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. काही वेळेस व्यक्ती नियतीच्या फेर्‍यात हतबल असते व तिला कारावास भोगावा लागतो. सर्वच शिक्षा भोगत असलेले कैदी गुन्हेगार नाहीत. परंतु हातून अजाणतेपणाने कृत्य घडल्यामुळे व सिद्ध झल्याने ते तुरुंगात आहेत. पण ते सर्व गुन्हेगार प्रवृत्तीचेच आहेत, असे म्हणता येत नाही.

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

8888747274

- Advertisment -

ताज्या बातम्या