रवी व गुरु ग्रहांनी श्रेयाला बहाल केली गायन प्रतिभा !

रवी व गुरु ग्रहांनी श्रेयाला बहाल केली गायन प्रतिभा !

भविष्य आपल्या हाती

प्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड - 8888747274

अलिकडच्या दशकात देशातील बहुविध शहरांतून आलेल्या गायक-गायिका आणि कलावंतांनी आपली कला, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर ‘बॉलिवूड’ कवेत घेतलं. गायन क्षेत्रात तर असे अनेक प्रतिभावंत आढळतात.

मात्र त्यांच्यातही काही खास आहेत. त्यापैकी एक म्हणजे आजचे आघाडीचे नाव श्रेया घोषाल. पश्चिम बंगालमधील मुर्शीदाबादेत श्रेयाचा 12 मार्च 1984 रोजी जन्म झाला. वयाच्या अवघ्या 37 वर्षात असतानाच तीने चार राष्ट्रीय पुरस्कार, सात फिल्मफेअर पुरस्कारांसह डझनावर अन्य पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. भारतीय चित्रपट पाहत, त्यातील सुमधूर गाणी ऐकत आपलाही तेथे ठसा उमटविण्याचे स्वप्न पाहणार्‍या भारतातील सामान्य ग्रामीण शहरांमधील युवकांपैकी श्रेया एक होती.

मात्र स्वप्नांना मेहनतीची जोड देत तीने यशाचे अनेक इमले रचले. आज हिंदी, मराठीसह जवळपास भारतातील सर्वच भाषांमध्ये श्रेयाने गायकीची कमाल दाखविली आहे. आज देशातील सर्वात व्यस्त गायिकांपैकी ती एक आहे.

चित्रपटांसाठी पार्श्वगायन करायचे, हे स्वप्न तीने लहान वयातच पाहिले. केवळ स्वप्न पाहून ती थांबली नाही. वयाच्या चौथ्या वर्षी संगीत शिकण्यास सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी तीचे शास्त्रीय संगीतातील औपचारिक प्रशिक्षण सुरू झाले होते. लहान वयातच अनेक रिअलटी शोमधून श्रेयाने आपली छाप पाडली. खरेतर तेव्हाच तीने आपल्या आवाजाने अनेकांची मने जिंकली होती. सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आईलाही ती भावली. त्यावेळी तीने सारेगामापा ही स्पर्धा जिंकली होती.

भन्साळी प्रोडक्शनचा ‘देवदास’ हा मल्टीस्टारर चित्रपट याच काळत तयार होत होता. श्रेया या चित्रपटात गायनाची संधी मिळाली. स्वप्नांच्या दिशेने सुरू झालेला हा प्रवास तिच्यासाठी कौतुकाचे क्षण घेवून आला. या चित्रपटातील गीतांना प्रेक्षकांनी पसंती दिली आणि श्रेयाच्या निमित्ताने नवा एका नवा, ताजा आवाज चित्रपटसृष्टीला गवसला.

पहिल्याच प्रयत्नात श्रेयाने अनेक पुरस्कार पटकावले होते. हे यश एकप्रकारे स्वप्नवत होते. आज तिने मोठा पल्ला गाठला आहे. जगभरात तिचे कोट्यवधी चाहते आहेत. आजही तिचे गाणे हे श्रोत्यांसाठी मोठा आनंद असतो. जगभरात तिला मिळालेला सन्मान हा देखिल अनेकांना हेवा वाटावा असा आहे. अमेरिकेतील ओवाहो या राज्यात 26 जून 2010 हा दिवस ‘श्रेया घोषाल डे’ म्हणून घोषित केला.

प्रभावी सेलिब्रिटींच्या फोर्ब्स यादीत सलग पाच वर्षापासून तीने स्थान पटकावले आहे. इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्येही तिचा गौरव झाला. मदाम तुसाँ संग्रहालयात तीचा मेणाचा पुतळा उभारण्यात आलाय. असा सन्मान मिळविणारी ती पहिलीच भारतीय गायिका आहे. 5 फेब्रुवारी 2015 रोजी तीने बालपणीचा मित्र शिलादित्य मुखोपाध्यायशी लग्नगाठ बांधली. गाण्याशिवाय भटकंती म्हणजे प्रवास करणे, पुस्तके वाचणे आणि स्वयंपाक देखिल तिचे आवडीचे विषय आहेत.

मधुर आवाजाची देणगी

दैव जाणिले कोणी या म्हणीप्रमाणे एखाद्या व्यक्तीला दैवी देणगीचा लाभ नैसर्गिक असतो. या व्यक्ती अत्यंत भाग्यवान असतात. श्रेयाच्या हातावरील ग्रह, रेषा, चिन्हे तसे दर्शवितात.

दैवी देणगीसाठी कुठल्याही व्यक्तीच्या हातावरील कायम स्वरूपी असणारे बोटांचे छाप म्हणजे शंख, चक्र, शुक्ती हे अत्यंत महत्वाचे असतात. परंतु बोटांच्या छापांचे महत्व खूप मोठे असल्याने ते सहज उपलब्ध होत नाही. श्रेयाला भारतापेक्षा परदेशात अधिक बहुमान मिळाला. आंतरराष्ट्रीय ख्याती वाढली आहे. हातावरील रवी रेषा ही मरवी व बुध बोटांच्या पेर्‍यामधे गेल्याने ही कीर्ती लाभली.

श्रेयाच्या हातावरील रवी रेषा अत्यंत शुभदायी व प्रभावी असल्याने कलेचे गुण प्राप्त झाले आहेत. रवी रेषा अत्यंत प्रभावी असता कला अवगत असते, त्या कलेतून अर्थार्जन होते. हातावर छोटीशी जरी रवी रेषा रवी ग्रहावर म्हणजे करंगळीच्या शेजारच्या बोटाच्या खालील रवी ग्रहावर असता अशा लोकात कलेचे गुण असतात. त्यांना गाणे कळते. त्यातल्या चुका ते काढू शकतात. तसेच कलेचे अंग असल्याने कलेची जाण इतरांपेक्षा खूप जास्त असते.

रवी रेषा प्रभावी असता या लोकांचे व्यक्तीमत्व चार चौघात उठून दिसणारे असते. या व्यक्ती स्मार्ट असतात. यांचे चालणे देखिल रुबाबदार असते. त्यांचे खांदे कधीच पडलेले नसतात.

रवी प्रभावी लोकांना संसार सुखात नेहमीच कमतरता येते. संसारात ते सुखी नसतात. जोडीदाराचे पटत नाही. कारण यांना समाजात मिसळायला, मैत्री करायला, देशो विदेशी फिरायला, भटकंती करायला खूप आवडते. त्यातच हे लोक आकर्षक व्यक्तीमत्त्वाचे असल्याने यांच्या प्रेमात पडणार्‍यांची संख्या मोठी असते. त्यामुळे जोडीदार यांच्यावर कायम खट्टू असतो. आपल्या म्हणण्याप्रमाणे वागावे, अशी अपेक्षा ते करतात. त्यातून दूरावा संभवतो. त्याचे परिणाम वैवाहिक सौख्यावर होतात.

तीचे पहिले म्हणजे गुरु ग्रहाचे बोट लांबीला खूप मोठे आहे. या गुरु ग्रहाच्या लांब बोटाचा प्रभाव किंवा लाभ मिळाला आहे. गुरु बोट लांब असता त्या व्यक्तीमध्ये उपजत प्राविण्य असते. नेतृत्व करायला आवडते. ते स्वतःच्या मताशी ठाम असतात. कर्तबगार व धर्माचरण करणार्‍या व न्यायी असतात. श्रेया यांची मस्तक रेषा मोठी व या रेषेला चंद्र ग्रहावर शेवटी दोन फाटे आहेत. तसेच चंद्र ग्रहाचा उभार मनगटाच्या खाली सरकल्यामुळे चंद्र ग्रह प्रभावी होऊन त्याचे शुभ गुण प्राप्त झाले आहेत. यामुळेे श्रेया यांना आत्यंतिक हुशारी बहाल झाली आहे. त्या कोणत्याही दोन वेगळ्या क्षेत्रात असामान्य कामगिरी बजावू शकतात. श्रेयाच्या भाग्य रेषे बद्दल बोलायचे काम नाही, कारण प्रसिद्धी मागे आर्थिक लाभ हे येणारच आहेत. हृदय रेषा जराशी जाडसर आहे.त्यामुळे दुसर्‍यावर विश्वास टाकताना संभ्रम निर्माण होतो.

हाताचा पंजा मजबूत आहे. तो पुरुष्याच्या हात प्रमाणे मजबूत आहे. मात्र करंगळीचे बोट सामान्य आहे. त्यामुळे ओघवते बोलणे व वक्तृत्वाला मर्यादा आलेल्या आहेत.

श्रेयाच्या हातावरील रेषा तर वैशिष्ठयपूर्ण आहेच परंतु दैवी आवाजाच्या देणगीची सुध्दा खातरजमा रवी रेषा व गुरु ग्रहांनी कृपा केल्यामुळे घडून आलेली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com