Wednesday, May 8, 2024
Homeभविष्यवेधशिल्पाच्या यशाची गुरुकिल्ली अंगठ्यात

शिल्पाच्या यशाची गुरुकिल्ली अंगठ्यात

प्रफुुुल्ल कुलकर्णी – ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड,8888747274

शिल्पा शेट्टी शेट्टी यांचा जन्म 8 जून 1975 रोजी झाला. हिंदी रुपेरी पडद्यावरील अभिनेत्री, चित्रपट निर्माता, नर्तक, लेखक, व्यावसायिक-उद्योजिका आणि माजी मॉडेल अशा अनेक क्षेत्रात त्यांनी नाव कमावले. शिल्पा यांनी बाजीगर या सुपरहिट चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून त्यांना दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. त्यांच्या कारकीर्दीला धडकन (2000) या रोमँटिक चित्रपटाने विशेष ओळख दिली.

- Advertisement -

या चित्रपटातील अभिनयामुळे त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत नायिका म्हणून प्रस्थापित होण्यास मदत झाली. रिश्ते या चित्रपटातील भुमिकेमुळे त्यांचे कौतुक झाले. या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठीचे आणखी एक फिल्मफेअर पुरस्कारावर त्यांनी नाव कोरले. फिर मिलेंगे चित्रपटातील अभिनयही लक्षवेधी ठरला.

2006 मध्ये शिल्पा ‘झलक दिखला जा’ या नृत्य रिअ‍ॅलिटी शोमधे परीक्षक म्हणून दाखल झाल्या. हा त्यांना टिव्हीच्या दुनियेतील प्रवेश ठरला.

2007 च्या सुरुवातीस शिल्पा ब्रिटनमध्ये प्रसिद्ध रियालिटी शो ‘सेलिब्रिटी बिग ब्रदर’च्या पाचव्या हंगामात सहभागी झाल्या. यानंतर बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोच्या दुसर्‍या सीझनमध्ये यजमान म्हणून त्या दिसल्या. तेव्हापासून जरा नाच दिखा (2010), नच बलिये आणि सुपर डान्सर यासारख्या अनेक भारतीय नृत्य रियालिटी शोमध्ये परिक्षकाची भूमिका बजावली.

चित्रपटांमध्ये अभिनय करण्याव्यतिरिक्त विविध ब्रँड्स आणि उत्पादनांसाठीच्या जाहिरात करणारी सेलिब्रिटी अशीही त्यांनी ओळख निर्माण केली. महिलाविश्व आणि प्राणी हक्क या विषयांवर त्या अधिकारवाणीने व आस्थेने बोलतात. यासाठी चळवळी उभारतात.

सर्कसमध्ये वन्य प्राण्यांच्या वापराविरूद्ध मोहिमेचा भाग म्हणूनही त्यांनी सहभाग नोंदविला. देशातील फिटनेस आयकॉन म्हणूनहे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या योगा व्हिडीओला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. भारत सरकारने सुरू केलेल्या फिट इंडिया मूव्हमेंटसारख्या अनेक फिटनेस मोहिमांमध्ये त्या सहभागी आहेत .

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत स्वच्छता मोहिमेत काम केल्याबद्दल शेट्टी यांना चॅम्पियन्स ऑफ चेंज अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. व्यावसायिक राज कुंद्रा यांच्याशी त्यांचे लग्न झाले. त्यांना दोन मुले आहेत.

चंदेरी दुनियेतील एक हरहुन्नरी प्रसिद्ध तारका असूनही आयुष्यात वेळीच निर्णय घेण्याची त्यांची हातोटी लग्न, संसार आदी बाबीतही नजरेस पडली. त्या आज आपला व्यवसाय व संसारात रममाण आहेत.

दोन हाताचे कारकत्व

शिल्पा यांच्या सम्पूर्ण हाताचे निरीक्षण केले असता सर्व प्रथम हातावरील लांब सडक बोटे लक्ष वेधून घेतात. शिल्पा यांनी मूठ बंद केल्यास तळवा दिसणार नाही, इतके त्यांची बोटे लांब सडक आहेत. नुसतीच लांब सडक बोटे नाहीत तर या बोटांचे टोक हे शेवटाला गोलाकार आहेत. त्यांनी नखे टोकदार ठेवल्यामुळे त्यांची बोटे निमुळती वाटतात. लांब बोटे निर्णय क्षमतेत निश्चिती आणतात. साधक बाधक विचार करून अंतिम निर्णय करतात. मात्र नुसती बोटाची लांबी ने निर्णय क्षमता येते, हे म्हणणे धाडसाचे होईल. कारण निर्णय क्षमतेत बोटांच्या पेर्‍यांची लांबी व बोटातील गाठी ज्या बोटातील सांध्यात असतात त्याही विचारपूर्वक निर्णय क्षमतेत मोठ्या साहाय्य भूत असतात. उजव्या हातावरील पहिल्या आणि दुसर्‍या बोटांचे सांधे स्पष्टपणेे दिसून येतात. हाताच्या बोटांमध्ये सांधे किंवा गाठी दिसत असतील तर यांच्यात निर्णय क्षमता लाभलेली असते. त्यातच गुरु आणि शनी बोटामध्ये सांध्यात गाठी असल्याने निर्णय क्षमता पूर्ण विचाराअंती असते. त्यातच लांब सडक बोटामुळे ती अधिकच सहाय्य भूत ठरते.

हस्तसामुद्रिकशास्त्राप्रमाणे मानवाचे बोटे पहिल्या प्रथम संवेदना स्वीकारतात. बोटामधून संवेदना शरीरात प्रवेश करून त्यांचे मेंदूत ग्रहण होते. त्या वेळेस डोळे, नाक, कान ही इंद्रिये सहाय्यकाचे काम करतात. संवेदना मेंदूपर्यंत पोहोचताना त्यांचे विश्लेषणात सेकंदाच्या शंभराव्या भागाच्या आत पृथकरण करतात. या संवेदना प्राप्त झाल्यानंतर मानवाची प्रतिक्रिया होते किंवा तो संवेदनेनुसार प्रतिक्रिया देतो. या संवेदना ग्रहण करताना आपल्या बोटांच्या आकाराचे खूप महत्व आहे. टोकदार बोटे संवेदनांचे पृथ्थकरण न करताच मेंदूकडे प्रवाहित करतात. बोटात गाठी नसतील तर बोटातून प्रवेश केलेल्या संवेदनाविना अडथळा मेंदूकडे प्रवाहित होतात. म्हणजेच बोटातील गाठी या ग्रहण केलेल्या संवेदनांचे परत पृथ्थकरण करतात. त्यामुळे संवेदना ग्रहण झाल्यावर त्यावर विचार होऊनच निर्णय होतो. शिल्पा यांच्या हातावरील गुरु आणि शनीच्या बोटात गाठी आहेत. त्यामुुळे त्यांच्या आयुष्यातील निर्णय हे विचारपूर्वक झाल्याने त्या आज सर्व क्षेत्रात यशस्वी आहेत.

शिल्पा यांच्या बोटांवरील तीनही पेरांचा उल्लेख महत्वाचा आहे. हस्तसामुद्रिक शास्त्रात प्रत्येक पेराचे एक महत्त्व आहे. म्हणजेच प्रत्येक पेराच्या कमी जास्त लांबीच्या आकारानुसार त्या व्यक्तीतील मूळ प्रेरणा व हुशारी पाहता येते. यामध्ये पहिले पेर बौद्धिक विश्वाचे, दुसरे व्यवहारिकतेचे व तिसरे पेर जर मोठे असेल तर ज्या क्षेत्रात बुद्धीचा वापर कमी असेल अश्या क्षेत्रात हे लोक यशस्वी होतात. शिल्पा यांचे तिसरे पेर हे बाकीच्या पहिल्या दुसर्‍या पेरापेक्षा खूपच मोठे असल्याने त्यांचा परिश्रमाने, योगा, नृत्य व थोडाफार अभिनयाचा विकास झाला. यात कमी बुद्धी असली तरी शिल्पा यांनी परिश्रमपूर्वक त्यात उंची गाठली आहे. वाचकांना आजचे भविष्य जरा क्लिष्ट वाटेल परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि हस्तसामुद्रिकशास्त्रात फक्त हातावरील रेषाच पहिल्या जात नाही तर बोटांवरील छाप, बोटांचे व हातांचे आकार, नखे, हाताचा रंग, त्वचेचा पोत अंगठा व हातावरील मुख्य ग्रह इत्यादींचा अनेक बाबींचा समावेश असतो.

शिल्पा यांच्या हातावरील रेषांचा विचार करता सर्व प्रथम- हृदय रेषा ही पहिल्या बोटाकडे सरळ गेली आहे. अशा व्यक्ती भयंकर भावनाशील असतात व आपल्या मनासारखे झाल्याशिवाय त्या थांबत नाहीत. शिवाय सरळ आडवी गेलेली आडवी हृदय रेषा भावना बाजूला ठेऊन आपल्या हिताचा निर्णय घेण्यात सक्षम असतात. डाव्या हातावर हृदय रेषेचे दोन तुकडे आहेत. ही हृदय रेषासुद्धा आपल्या स्वार्थी भावना दर्शविते. मस्तक रेषा चंद्र ग्रहावर उतरल्याने कला विश्वात ती अत्यंत सहाय्यकारी आहे. कल्पना उच्च कोटीच्या आहेत. कलेचे अंग आहे. उजव्या हातावर आयुष्य रेषा दोन आहेत. एक छोटी व एक मोठी आहे. डाव्या हातावर पूर्ण लांबीची निर्दोष आयुष्य रेषा आहे. या निरोगी आयुष्य दाखवितात. भाग्य रेषा दोन आहेत. दोन्हींचा उगम चंद्र ग्रहावरून झाला आहे. चंद्र ग्रहावरून भाग्य रेषेेचा उगम झाल्यास या लोंकांचा भाग्योदय दुसर्‍यांच्या सहाय्याशिवाय होत नाही. आयुष्यात यश कीर्ती मिळविण्यासाठी दुसर्‍यांच्या मदतीची अत्यंत गरज असते. त्यांच्या मदतीच्या हाताशिवाय हे लोक मोठे होऊ शकत नाहीत. ही मदत मिळाल्याने त्या यशस्वी आहेत. शिल्पा यांचा अंगठा मोठा व मजबूत आहे. त्यामुळे त्यांना निर्णय क्षमता आहे. दुसर्‍याच्या अधिपत्त्याखाली त्या राहू शकत नाही. अंगठ्यावरील पहिले विचार शक्तीचे पेर मोठे व तेवढेच दुसरे कृती करण्याचे पेर मोठे असल्याने निर्णयाची अंमलबजावणी लगेच होते. आळशीपणा व कंटाळा नाही, हेच शिल्पा यांच्या यशाचे गुपित आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या