Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधसद्‌गुरूंचा संदेश : शून्य एक अनंत शक्यता

सद्‌गुरूंचा संदेश : शून्य एक अनंत शक्यता

सद्गुरू – आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे नेहेमीच एकतर शून्य बनणे किंवा अनंत होणे. तुम्हाला जसे सोयीस्कर वाटते त्या मार्गाने तुम्ही वाटचाल करा, पण हे दोन वेगळे मार्ग नाहीत. जे काही आहे ते नेहेमीच मर्यादित आहे. पण जे नाही ते मात्र अनंत आहे. तर मग जे नाही आणि अनंत ह्या दोन्ही गोष्टी समान कशा असू शकतात? जर तुम्हाला खरोखर एक सर्वात मोठी संख्या हवी असेल तर तुम्ही 1, 2, 3, 4, 5 यांची बेरीज करता की 0, 0, 0, 0, 0 लावता? शून्य म्हणजे काहीही नाही, पण जे नाही तेच एखाद्या संख्येला अनंत बनवीतं. गणित शास्त्रात सर्वात अविश्वसनीय गोष्ट म्हणजे शून्य, आणि हे काही अपघातानं घडलेलं नाही. हे एका निश्चित अशा साक्षात्कारातून जाणलं गेलं आहे. जेव्हा लोकांनी आपल्या अंतरंगात डोकावून पाहिलं आणि अनंताच्या पोकळीत उडी घेतली, तेव्हा शुन्याचा अविष्कार झाला. म्हणून शून्याचा शोध पूर्वेकडील देशात लावला गेला हे काही अपघाती घडलेलं नाही, कारण हे त्यांच्या संपूर्ण जीवनाच्या प्रयत्नांचं सार आहे.

योग विज्ञान हे तंत्रज्ञान आहे आपणाला शून्य करण्याचे कारण शून्य ही काही साधी गोष्ट नाही. शून्य हे अनंत आहे. सर्वांचा मुळारंभ शून्य आहे. ही एक संख्यारहित अवस्था आहे. एक संख्यारहित अवस्था ही मौनाची अवस्था आहे. मौन हरवलं गेलं कारण संख्या उपस्थित झाल्या. शरीर एकच आहे, पण त्यातून दोन हात बाहेर आले आहेत. पृथ्वी एक आहे पण तिच्यातून पुष्कळ लोक बाहेर आलेले आहेत. अस्तित्व एकच आहे पण त्यातून अगणित विश्वं उत्पन्न झाली आहेत. जगातील सर्व आध्यात्मिक संस्कृती अनंत होण्याची इच्छा बाळगून आहेत, कारण त्यांनी पाहिलं की निसर्गाचा सुद्धा हाच हेतू आहे. जेव्हा ते सृष्टीचा हेतू आणि निसर्गाचा हेतू यांच्या संपर्कात आले, त्यांना कळलं की अनंत ही फक्त एक कल्पना आहे. वास्तविक गोष्ट आहे ती म्हणजे शून्य. म्हणून त्यांनी पोकळीबद्दल बोलायला सुरुवात केली – शून्य, निर्वाण, निर्विकल्प वगैरे

- Advertisement -

मनाचा स्वभाव नेहेमीच साठवणे. जेव्हा ते स्थूल अवस्थेत असतं, त्याला वस्तू साठवायच्या असतात. जेव्हा ते थोडं विकसित होतं, त्याला ज्ञान साठवायचं असतं. जेव्हा भावना प्रबळ होतात, त्याला लोकांना संग्रहित करायचं असतं, पण त्याचा मुलभूत स्वभाव म्हणजे साठवणे. जेव्हा एखादी व्यक्ती ती आध्यात्मिक मार्गावर असल्याचा विचार करू लागते, तेव्हा तिचे मन आध्यात्मिक ज्ञान गोळा करू लागतं. पण अन्न असो, वस्तू असोत, लोकं किंवा ज्ञान – तुम्ही काय साठवता याला महत्व नाही, जिथं साठवण्याची गरज आहे, याचा अर्थ तिथं अपूर्णता आहे. अपूर्णत्वचा हा भाव तुमच्यात शिरला आहे कारण जे जे तुम्ही नाही अशा मर्यादित गोष्टींशी तुम्ही तुमची ओळख बांधली. जर तुम्ही पुरेशी जागरूकता बाणलीत आणि सर्वात महत्वाचं, जर सतत साधना करत राहिलात, हळूहळू तुमचं पात्र पूर्णपणे रिक्त होतं. जागरूकता पात्र रिकामं करतं. साधना पात्र स्वच्छ करतं. जेव्हा जागरूकता आणि साधना पुरेशी दीर्घकाल चालू ठेवली जाते, तेव्हा तुम्ही पूर्णपणे रिक्त होता. केवळ जेव्हा ही रिक्तता उभरून येते, तेव्हा कृपा तुमच्यावर प्रसन्न होते, आणि मग तुमचे परम स्वरूप फार दूर नाही. ते इथेच अनुभवण्यासाठी आहे. त्याचा साक्षात्कार होतो. ते काही उद्या किंवा पुनर्जन्मात नाही. ते एक जितं जागतं वास्तव बनतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या