तुमच्या ‘स्व’चा अंत

सद्गुरुंचा संदेश
तुमच्या ‘स्व’चा अंत

दुर्दैवाने लोक आपल्या मर्यादा जणू मौल्यवान ठेवा म्हणून जपतात. तुम्ही तुमची बंधनं जणू तुमचा अलंकार म्हणून मिरवता. जर एखादी गोष्ट आभूषण म्हणून तुम्ही अनुभवायला लागलात की मग ते तुमच्यापासून दूर करणं फार कठीण होऊन जातं. पण जर तुम्ही त्यांना वस्तुतः बेड्या, बंधनं आहेत असं पाहिलं तर तुम्हालाच त्या मोडून टाकण्याची इच्छा जागृत होईल.

समजा जर मी तुम्हाला लोखंडी साखळ्यांनी बांधलं तर तुम्हाला लगेच कळेल की तुम्ही बंधनात आहात. आणि ज्याक्षणी तुम्हाला कळेल की तुम्ही बेड्यांत अडकला आहात; त्याचक्षणी त्यातून मुक्त होण्याची तळमळ निर्माण होईल. पण समजा मी तुम्हाला सोन्याच्या साखळीने बांधलं तर तुम्हाला वाटेल की हा तर दागिना आहे.

दोन्ही साखळ्या तुम्हाला तितक्याच ताकदीने बांधून ठेवतात, पण हे लक्षात येण्यासाठी तुम्ही संपूर्ण आयुष्य घालवता. अलंकार, आभूषण म्हणून जे काही तुम्ही परिधान करता, त्या तुम्हाला जखडून ठेवणार्‍या असल्यातरीही तुम्हाला स्वतःहून त्या दूर करणं शक्य नाही. तुम्ही त्या दूर करू शकत नाही असं नाही, तुम्ही करू शकता पण सहसा तुम्ही ते करत नाही. दुसर्‍याने तुम्हाला मदत करावी लागते. आणि तोच तुमचा गुरु आहे.

गुरु हा काही कुणी तुमचे सांत्वन करणारा नाहीये. स्वखुशीने तुम्ही तुमच्या स्व चा अंत करण्यासाठी जो तुमचे मार्गदर्शन करतो तो गुरु. तुमचे व्यक्तित्व आणि तुमचे मर्यादित अस्तित्व सतत पायदळी तुडवतो तो गुरु. त्यांच्या सानिध्यात नेहमी तुम्हाला अवघडल्यासारखं वाटतं, पण तरीही तुम्हाला त्यांच्या सहवासात रहावेसे वाटते, असं असेल तर ते तुमचे गुरु आहेत. सामान्यतः जेव्हा तुम्हाला अस्वस्थ, अवघडल्यासारखे वाटते तेव्हा तिथून पळून जावेसे वाटते. तुमच्या गुरुंच्या उपस्थितीत तुम्हाला अस्वस्थ वाटतं पण तरीही तुम्हाला त्यांच्यासोबत राहावंस वाटतं.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com