Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधस्वस्थ, सर्वसंपन्न जीवनाचा मूलमंत्र

स्वस्थ, सर्वसंपन्न जीवनाचा मूलमंत्र

केवळ रोग, आजाररहित असणे म्हणजे आरोग्य नव्हे. जेव्हा तुमचे शरीर, तुमचे मन, तुमच्या भावना आणि तुमची ऊर्जा यांत उत्तम समन्वय असतो आणि जेव्हा तुम्ही आतून परिपूर्णता अनुभवता तेव्हाच तुम्हाला खरोखर आरोग्यदायी वाटते. आज जगात पुष्कळ लोक वैद्यकीयदृष्ट्या जरी त्यांना रोगमुक्त घोषित केले असले तरी वास्तविकपणे सहसा ते आरोग्यवान नसतात. त्यांना औषधांची गरज नसेलही पण त्यांची संपूर्ण शरीर प्रणाली परिपूर्णता अनुभवत नाही. त्यांच्यात शांती, समाधान आणि आनंदाचा अभाव असतो.

तुम्हाला वाटते की नैराश्येची एक ठराविक सीमा पार केल्यानंतरच तुम्ही स्वतःला आजारी समजत असाल, पण मी म्हणतो जर तुम्ही आनंदाने प्रफुल्लित नसाल तर एकप्रकारे तुम्ही आजारीच आहात. म्हणजे तुमच्यात आंतरिक समन्वय आणि समतोल याचा अभाव आहे.

- Advertisement -

असं घडण्यामागचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही कधी याकडे लक्षच दिलं नाही. सर्वकाही बाहेरून दुरुस्त करण्याची मनोवृत्ती अगोदर तुम्ही सोडून दिली पाहिजे. कुठलाही डॉक्टर किंवा औषध तुम्हाला आरोग्य देऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी थोडीफार मदत करू शकतात, पण आरोग्य हे आतून घडतं आणि घडायला हवं. आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक पातळीशी निगडित नाही. आज आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणते की मानव म्हणजे शरीर आणि मन यांचे समान संमिश्रण आहे. जे काही मनात घडतं त्याचे परिणाम शरिरावर दिसून येतात. जे काही शरीरात घडतं त्याचे परिणाम मनावर दिसून येतात. म्हणून आपली जीवन जगण्याची पद्धत, आपली मनोवृत्ती, आपल्या भावना, आपली मुलभूत मानसिकस्थिती, दैनंदिन कार्य सक्रियता, मनाची सूत्रबध्दता, एकूण या सर्वगोष्टी उत्तम आरोग्याशी संबंधित आहेत.

आरोग्य जर आपल्या आतून निर्माण व्हायचं असेल तर आपल्याला नक्कीच आपल्या आत थोडं आंतरिक इंजिनीयरिंग करावं लागेल लागेल. आपण अशा प्रकारची वातावरण निर्मिती केली पाहिजे जेणेकरून आपले शरीर, मन, भावना आणि जीवन ऊर्जा यांच्यात नैसर्गिक तारतम्य आणि सुसूत्रता असेल.

आपल्या आंतरिक कल्याणासाठी लोकांनी एका सोप्या साधनेसाठी, रोज सकाळी वीस-पंचवीस मिनिटं दिलीत तर त्यायोगे ते त्यांचं शरीर आणि मनाचं अशाप्रकारे इंजिनीयरिंग करू शकतात की स्वाभाविकपणे ते आरोग्य आणि सर्वसंपन्नता अनुभवू शकतील. प्रत्येक माणूस आरोग्यदायी आणि सर्वसंपन्न जीवन जगण्यास समर्थ आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या