नेतृत्व : एक बलिदान

सद्गुरुंचा संदेश
नेतृत्व : एक बलिदान
Antonio Olmos

नेतृत्व म्हणजे लोकांना तुम्हाला हवे तिथे घेऊन जाणे नव्हे; ही हुकूमशाही झाली, नेतृत्व नाही. लोकांना त्यांनी घालून घेतलेल्या मर्यादा ओलांडून पलीकडे जाऊ शकण्यासाठी आवश्यक असे वातावरण निर्माण करण्यास सक्षम असणे म्हणजे नेतृत्व.

नेतृत्व म्हणजे वर्चस्व गाजवणे नव्हे, तो एक प्रकारचा त्याग आहे. नेतृत्व म्हणजे कोणावर तरी राज्य करणे नाही; ते कोणाचे तरी जीवन घडविणे आहे. कोणत्याही नेत्याच्या मनात जर सर्वांना सामावून घेण्याची भावना नसेल, जर त्याच्याभोवती असलेल्या लोकांबद्दल त्याला ऐक्य आणि सर्वसमावेशकतेची अनुभूती नसेल, तर तो एक उत्तम नेता होऊ शकणार नाही. तो फक्त परिस्थितीत थोडेफार हेरफेर करून त्या सोयीस्कर किंवा किचकट बनवू शकेल.

म्हणून यासाठी एक धर्माधारित नसलेली आध्यात्मिक प्रक्रिया विलक्षण भूमिका निभावू शकते. आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे जीवनाच्या केवळ पृष्ठभागावर न राहता जीवनात खोलवर डोकावून पाहणे.

एका नेत्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे कारण नेत्यांना सतत आव्हानांचा सामना करावा लागतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक नेता त्याच्या शक्यतांच्या सर्वोच्च पातळीवर कार्यरत असणे. जर तुम्ही ताण, चिंता, किंवा राग अनुभवत असाल तर तुमचे शरीर, मन आणि भावना योग्यप्रकारे कार्यरत राहू शकणार नाहीत. तुम्ही जेव्हा आनंदी आणि समाधानी असता, तेव्हा प्रत्येक गोष्ट योग्यप्रकारे कार्यरत असते, हे एक अनुभवात्मक सत्य आहे.

आज हे वैद्यकीयदृष्ट्या सुद्धा सिद्ध झाले आहे आणि हे वास्तव असल्याने आपण आपल्या लोकांना एका उच्च पातळीचे नेतृत्व उपलब्ध करून देणे अतिशय महत्त्वाचे आहे, अशा व्यक्ती ज्यांच्यात उत्तम स्थैर्य, समतोल आणि स्पष्टता आहे, जेणेकरून त्या त्यांच्या क्षमतेच्या सर्वोच्च पातळीवर काम करू शकतील. मी जेव्हा नेतृत्व असे म्हणतो, तेव्हा हे फक्त पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाबद्दल नाही.

आपण ज्या काही नेतृत्वाच्या क्षेत्रात आहोत, मग ते आध्यात्मिक असो, राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक नेते असोत किंवा अगदी आपल्या कुटुंबात, प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या पातळीवर नेता असतोच; हा फक्त व्याप्तीचा प्रश्न आहे. आपण केवळ दोन लोकांना हाताळत त्यांचे नेतृत्व करत असाल किंवा शंभर कोटी लोकांचे, प्रत्येक व्यक्ती एक प्रकारचा नेताच आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com