
आज सर्वत्र गुरूंबद्दल पुष्कळ चर्चा सुरू आहे. आज सर्व प्रकारचे गुरु उपलब्ध आहेत: कॉम्पुटर गुरु, मॅनेजमेंट गुरु. गुरु हा शब्द अनावश्यक ठिकाणी सगळीकडे अकारण वापरला जात असल्याने त्याचे महत्व हरवत चालले आहे. गु म्हणजे अंध:कार आणि रु म्हणजे दूर करणे. अंध:कार म्हणजे अज्ञान. आपल्या चुकीच्या ओळखी हा आपल्या अज्ञानाचा आधार असतो. तुम्ही अशा गोष्टींशी तुमची ओळख बांधली आहे ज्या तुम्ही नाही आहात. सामान्यतः याला मूर्खपणा असे म्हणतात.
उदाहरणार्थ, आपण जर एखाद्या मनोरुग्णालयात गेलात, तर तुम्हाला एखादी व्यक्ती बागेत उभी राहिलेली दिसेल, कारण तिचा असा विश्वास असतो, की ती एक झाडच आहे. प्रत्येक दिवशी संध्याकाळी देखभाल करणार्यांना त्या व्यक्तीला उचलून आत घेऊन जावे लागते, अन्यथा ती आत जाणारच नाही संपूर्ण दिवसभर बागेतच उभी राहील. पण सकाळी तुम्ही दार उघडताच ती व्यक्ती पुन्हा बागेत जाऊन एखाद्या झाडासारखा उभी राहील. यालाच वेडेपणा म्हणतात, नाही का?
वास्तविक आपण जे आहोत, त्यापेक्षा आपण वेगळेच कोणीतरी आहोत असा विश्वास ठेवणे म्हणजे वेडेपणा. याक्षणी तुमची देखील तीच समस्या झालेली आहे. तुम्ही म्हणजेच शरीर आहात असे तुम्हाला वाटते. ते सुद्धा तितकेच वाईट आहे. तुम्हाला वाटते तुमच्या कल्पना, तुमच्या भावना, तुमचे विचार म्हणजेच तुम्ही आहात. तुम्ही वाट्टेल त्या गोष्टींबरोबर आपली ओळख जोडून घेता. ते अज्ञान आहे. आणि हे अज्ञान जो दूर करतो त्याला गुरु असे म्हणतात. जेव्हा तुम्ही त्यांच्या सानिध्यात बसता, तेंव्हा काय बोलायचे किंवा काय विचार करायचा हे तुम्हाला माहिती नसते.
तुम्ही भारावून गेलेले असता. आपण अतिशय मूर्ख आहोत असे तुम्हाला वाटते. असं असेल तर ते चांगले आहे. याचा अर्थ गुरूचा परिणाम होत आहे. अचानक त्यांच्या उपस्थितीत तुम्हाला तुमच्या सर्व ओळखी मूर्खपणाच्या वाटू लागतात. ज्या गोष्टींचा तुम्हाला अतिशय अभिमान वाटत होता, आणि ज्यामुळे स्वतःला तुम्ही अतिशय महान समजत होता अशा सर्व गोष्टी, अचानक त्या सर्व गोष्टी तुम्हाला व्यर्थ वाटू लागतात. तसे होणे चांगले आहे.
जर तुम्हाला ते खूपच आवडायला लागले, तर ते तुमचे गुरु नाहीत, कारण तुम्हाला त्यांच्यासोबत सोयीस्कर वाटत असेल, तर तुम्ही त्यांच्यासोबत जवळीक साधाल. तुम्ही जर त्यांच्या सहवासात इतके भारावून जात असाल, की तुम्हाला त्यांच्यापासून दूर पळून जावेसे वाटत असेल, पण तुमच्यातील एक बाजू तुम्हाला सतत त्यांच्याजवळ खेचत असेल, तर मग नक्कीच तो तुमचा गुरु आहे. सतत तुम्हाला त्यांचे भय वाटत असते पण तरीही तुम्हाला त्यांच्या जवळ रहावेसे वाटते - असं असेल तर ते तुमचे गुरु आहेत.