
प्रश्न - मी कित्येक वेळा काही गोष्टी निवडतो आणि पुन्हा रद्द करतो. उदाहरणार्थ, काही वेळेस मला असे वाटते, की मी संगीताचा अभ्यास करावा. काही वेळेस मला असे वाटते की मी शैक्षणिक क्षेत्रात जावे. माझ्यासाठी काय योग्य आहे हे कसे जाणून घ्यावे?
सद्गुरु- तुम्हाला जर एक महान संगीतकार व्हायचं असेल, आणि तुम्ही तसं बनू शकला नाहीत, तर तुम्हाला किमान एखाद्या संगीतकाराच्या घरी झाडूकाम करावंसं वाटेल, नाहीतर एखाद्या संगीत वाद्यांच्या दुकानात काम करावंसं वाटेल. कमीतकमी तुम्हाला संगीत वाद्यं तरी स्वच्छ करायला मिळतील. हे असंच असायला हवं, नाही का? तुम्ही जर संगीत आणि शिक्षणक्षेत्र या दोन्हीमधून एकाची निवड तुमच्या आंतरिक कारणांसाठी न करता, सामाजिक कारणांसाठी करीत असाल - यापैकी कोणती गोष्ट तुम्हाला अधिक यशस्वी बनवेल यादृष्टीने तुम्ही त्याकडे पाहत असाल - तर त्यामध्ये निवडीला काहीच वाव नाहीये.
तुम्हाला काय निवड करायची आहे, ह्याची जाण तुम्हाला जर नसेल, तर सध्या उपलब्ध असलेल्या गोष्टीत तुम्ही स्वतःला पूर्णपणे झोकून द्यायला हवं. तुम्ही संगीताचे दुकान झाडून काढण्यात तुमचे सर्वस्व पणाला लावलेत, तर तुमच्या आंतरिक उर्मीने तुम्हाला काय करायचं ते उमजेल. सध्या हाती असलेल्या कामात स्वतःला; कोणत्याही अडथळ्यावाचून 100% झोकून द्या. लोकं नेहेमीच असा विचार करतात, की मला कुठे अडचणी येऊ शकतील? तुम्हाला कुठे अडथळे यावेत हा प्रश्नच नाहीये, प्रश्न असा आहे की तुम्ही तुम्हाला कुठं रमवावं. कुठं हे जर तुम्हाला माहीत नसेल, तर सध्या जे हाती आहे त्यात संपूर्णपणे मन रमवा.
लोकं मनापासून खात सुद्धा नाहीत, श्वासही घेत नाहीत, उठतही नाहीत किंवा झोपतही नाहीत. त्यामुळे काय करावं याचं त्यांना भानच नसतं. ते जे काही करतात, ते अपुरेच वाटते - ही चुकीची गोष्ट वाटते. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत संपूर्ण सहभाग दाखवा. त्यानंतर जीवन निवड करेल, आणि ती निवड कधीही चुकीची असणार नाही.
एक योगी, द्रष्टा, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरू हे भारतातील पहिल्या 50 अतिशय प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सदगुरूंना भारत सरकारतर्फे 2017 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.