
प्रकृतीचे दोन प्रकारचे गुणधर्म आहेत. एक भौतिक, आणि दूसरा भौतिकतेच्या पलीकडे असलेला. तुमच्यामधील भौतिकतेला दोनच गोष्टी माहिती आहेत - स्व-संरक्षण आणि प्रजनन. संपत्ती आणि लैंगिकता, किंवा स्व-संरक्षण आणि प्रजनन या दोनच गोष्टी प्रचंड प्रमाणात हिंसा आणि संघर्ष निर्माण करतात, आणि त्यामुळे प्रचंड मानवी ऊर्जा वाया जात आहे. आध्यात्मिक मार्ग नेहेमीच सर्वप्रथम याच दोन बाबी हाताळतात - जाणीवपूर्वक स्वेच्छेने दारिद्रयात जगणे आणि लैंगिकतेपासून दूर राहणे कारण या दोन गोष्टी जर तुम्ही बाजूला सारल्या, की तुमची भौतिक शरीरासोबत असणारी ओळख हळूहळू नाहीशी होऊ लागते. एकदा तसे घडले, की त्यांनतर मग तुम्ही केवळ एक सामान्य जीव असलेली व्यक्ती म्हणून उरणार नाही. म्हणजे याचा अर्था असा की तुम्ही या पशु-प्राण्यांच्या समुदायाचा एक भाग असणार नाही.
आपल्यातील पशु प्रवृत्तीपासून आपण मुक्त होणे हे आध्यात्मिकतेचे मूलभूत ध्येय आहे कारण तुमच्यात आणखी एक प्रकृती आहे जी सतत विस्तारण्यासाठी आतुर आहे. आयुष्यात तुम्ही कितीही साध्य केले असले तरी, तिला मात्र सतत आपला विस्तार वाढवण्याची ओढ लागलेली असते. तुम्ही कोणीही असा, तुम्ही सध्या जे आहात त्यापेक्षा थोडे अधिक जास्त व्हावे असे तुम्हाला सतत वाटत असते. जर ते आणखी थोडे प्राप्त केले, तर त्याहून आणखी थोडे जास्त व्हावेसे वाटते.
तुम्हाला सतत आणखी थोडे अधिक व्हावे, प्राप्त करावेसे वाटतच असते. निरंतरपणे तुम्ही आपला विस्तार करण्यासाठी धडपडत असता. केवढा विस्तार हवा? अनंत आणि अमर्याद विस्तार. पण भौतिकतेचे मूळ स्वरूपच सीमित मर्यादांची चौकटीत आहे. मर्यादांशिवाय भौतिकता अस्तित्वात असू शकणार नाही. म्हणून जेव्हा तुम्ही अमर्याद विस्तार शोधत असता, खरोखर तुमच्यात भौतिकतेच्या पल्याड जाण्याची प्रबळ इच्छा असते.
तुम्ही भौतिकतेच्या पलीकडे असणार्या त्या स्वरूपाविषयी सजग बनलात, तर तुम्ही आध्यात्मिक बनाल. तुम्ही इथे केवळ एक जीव बनून राहणार नाही. भौतिक विश्वाचे आणि प्राणी जगताच्या नियमांच्या अधिपत्यापासून मुक्त व्हाल. आध्यात्मिक प्रक्रियेचे हेच मुल तत्व आहे कारण जेव्हा हे परिमाण तुमच्यात उभरून येते तेव्हाच तुम्ही खर्या अर्थाने मुक्त होता. नाहीतर, सभ्यपणा आणि शिक्षणामुळे, तुम्ही फक्त ढोंग करता आणि तुमच्यामधील पशु वृत्ती थोपवून धरता. आज, जगातील महान शहरांमध्ये न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस किंवा लॉस एंजल्स - तुम्ही जर कायदा व्यवस्था आणि पोलिस तीन दिवसांसाठी बाजूला सारलेत, तर काय होते ते पहा.
सर्वकाही किती असभ्य आहे हे तुम्हाला दिसून येईल. लोक जंगली लोकांपेक्षा अधिक रानटी वागतील. गुहेत राहणार्या लोकांच्या काळात पोलिस नव्हते, पण तरीसुद्धा त्यांनी स्वतःला उत्तमरीत्या हाताळले. सभ्यता आणि संकृती ही केवळ तुम्ही स्वतःला नियंत्रणात ठेवण्यासाठी जखडून घेतलेली एक साखळी आहे. आणि मग कधीतरी एकदा तुम्ही तुमचे शिक्षण आणि सभ्यता विसरता आणि मग एकतर तुमच्या घरात, कार्यालयात किंवा रस्त्यावर कोठेतरी तुमच्यामधील पशु वृत्ती उफाळून बाहेर येते. मी म्हणजे फक्त एक जीव म्हणून वागाल, तर आपोआप तुमचे वर्तन सुद्धा तसेच असेल.
फक्त जेंव्हा तुमच्यामधील दुसरा पैलू सक्रिय आणि जागरूक बनतो आणि तुम्ही त्याबद्दल सजग असता जेंव्हा तुमच्यात जैविक प्रकृती आणि भौतिकतेच्या व्यतिरिक्त काहीतरी घडते. तेव्हा भौतिकता ही समस्या उरत नाही. ती नाहीशी होते असे नाही, ती निरर्थक बनते. ती अशी गोष्ट रहात नाही, जी इथून पुढे तुम्हाला आकर्षित करते किंवा तुमच्यासाठी अनिवार्य बनते. आणि मग ती काही तुम्हाला उद्युक्त करत नाही किंवा तिचे आकर्षणही तुम्हाला रहात नाही. आता तुमच्यात कोणतीच अनिवार्यता रहात नाही. आता जीवन म्हणजे जाणीवपूर्वक एक निवड बनते. आता तुम्ही शरीराच्या नियंत्रणाखाली रहात नाही, उलट तुम्ही शरीराला हवं तसं साकारू, हाताळू शकता.