स्पर्धात्मक जगात आनंदी राहू शकतो का?

सद्गुरुंचा संदेश
स्पर्धात्मक जगात आनंदी  राहू शकतो का?

प्रश्न : आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत आनंदी राहण्यावर आपण भर दिला आहे. सध्याच्या या स्पर्धात्मक युगात आपल्याला ही स्थिती प्राप्त करणे शक्य आहे का?

सद्गुरु : मनुष्य जे काही करतो ते केवळ त्याच्या आनंदाच्या शोधार्थ. मग तुम्ही ज्या कोणाशी स्पर्धा करता आणि ती करण्याची - तशी जर तुमची निवड असेल तर मग तुम्ही ती आनंदाने का करत नाही? जर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या मोठा भाग या स्पर्धेत घालवणार असाल, तर एकप्रकारे तुम्ही म्हणत आहात की आयुष्याचा बराच मोठा काळ तुम्ही आनंदी राहू शकत नाही? जेंव्हा स्पर्धा संपेल किंवा तुम्ही त्यामधून बाहेर पडाल, किंवा तुम्ही शर्यतीत सहभागी होण्यासाठी सक्षम राहणार नाही, बहुतेक तेव्हा तुम्ही आनंदी बनाल असा तुमचा विश्वास आहे. हा आयुष्य दुःखात घालवण्याचा युक्तिवाद आहे.

आनंद म्हणजे आपण काय करतो किंवा काय करत नाही याबद्दल नाही. आनंद म्हणजे तुम्ही स्वतः आतून कसे आहात याबद्दल आहे. तुमचे मन आणि भावना तुम्हाला हव्या तशा घडत राहिल्या, त्या जर तुमच्याकडून सूचना घेत असतील तर; तुम्ही स्वतःला निश्चितपणे आनंदी ठेवाल. तर प्रश्न आनंद किंवा दुखाःचा नाही; तर तुमचे मन तुमच्या नियंत्रणात आहे की नाही हाच मूळ मुद्दा आहे. ते जर तुमच्या नियंत्रणात असेल, तर निश्चितपणे तुम्ही स्वतःमधे आनंदी स्थिती निर्माण कराल. केवळ ते तुमच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने - ते योगायोगाने घडत असलेल्या बाह्य परिस्थितीतील घटनांनुसार प्रतिक्रिया देते - तसे असणे ही आनंदावस्था नाही.

तुम्ही फक्त एका मर्यादेपर्यंत बाह्य परिस्थितीवर नियंत्रण ठेऊ शकता. तुम्ही स्पर्धेत असाल किंवा नसाल, बाह्य परिस्थिती काही प्रमाणातच तुमच्या अपेक्षेनुसार घडतील, त्या कधीही तुमच्यासाठी 100% तुमच्याप्रमाणे घडणार नाहीत. तुमची आंतरिक स्थिती ही बाह्य परिस्थितीवर एक अनिवार्य प्रतिक्रिया म्हणून निर्माण होत असेल, तर आनंदी असणे नेहेमीच अपघातानेच घडेल. ज्याला तुम्ही बाह्य परिस्थिती असे म्हणता, त्यात लक्षावधी भिन्न भिन्न घटक असतात ज्यावर तुमचे कोणतेच नियंत्रण नसते. पण आतमधे मात्र फक्त एकच घटक असतो आणि तो म्हणजे तुम्ही. तुम्हाला जर तुमच्या इच्छेनुसार जगता आले, तर तुम्ही नक्कीच आनंदी राहण्याची निवड कराल. अडचण केवळ एवढीच आहे की तुमच्या आत - म्हणजे तुमचे मन, शरीर, ऊर्जा आणि भावना - या अपघाताने घडत आहेत, तुम्ही रहात असलेल्या परिस्थितीवर सतत अनिवार्यतेने प्रतिक्रिया म्हणून घडत आहे.

जसे आपल्या इच्छेनुसार बाह्य परिस्थिती निर्माण करण्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, तसेच आपली आंतरिक स्थिती आपल्या इच्छेनुसार घडवण्याचे सुद्धा एक संपूर्ण, सविस्तर विज्ञान आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे. आपण या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या आंतरिक कल्याणासाठी करून घेतला, तर योग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपली आंतरिक स्थिती आपल्या इच्छेनुसार निर्माण करणे, आनंदी असणे कधीच अशक्य होणार नाही; कारण तुम्हाला पर्याय उपलब्ध असतील तर तुमची बुद्धी नेहमी दुखाःऐवजी नक्कीच आनंदाची निवड करेल. म्हणून तुम्ही स्पर्धेत आहात का नाही हा प्रश्नच नाही. प्रश्न हा आहे की तुमचे शरीर, मन, भावना आणि ऊर्जा तुमच्याकडून सूचना घेत आहेत का त्या अनिवार्यपणे बाह्य परिस्थितीवर तुमच्या प्रतिक्रियेत मग्न आहेत?

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com