श्रद्ध बना, श्रद्धाळू नव्हे !

सद्गुरुंचा संदेश
श्रद्ध बना, श्रद्धाळू नव्हे !

श्रद्धा तुम्ही अंगी बाणवू शकत नाही. अकारण ती तुमच्या जीवनात अवतरु शकते किंवा अवतरू शकणारही नाही. मग याचा अर्थ 39;मला फक्त गप्प बसून वाट पहात बसायचं आणि एके दिवशी ती माझ्यावर प्रसन्न होईल 39; असा होतो का? नाही, एवढेच आहे की जर तुम्हाला या अस्तित्वातील जगण्याच्या मूलभूत गोष्टी समजल्या तर तुम्ही पहाल की, काहीही घडून येण्यासाठी तुम्ही योग्य प्रकारची परिस्थिती निर्माण करणे आवश्यक आहे.

तर श्रद्धेसाठी आवश्यक अशी स्थिती कोणती? येशू म्हणाला, ‘चला माझ्यामागे या.’ त्याने असे म्हटल्यावर; त्या काळातील सुशिक्षित आणि सामर्थ्यवान माणसं त्याच्यामागे गेले नाहीत. केवळ अगदी साधे मच्छीमार आणि शेतकरीच त्याच्या मागे गेले कारण विचारी मनं कोणाचेही अनुसरण करू शकत नाहीत.

फक्त साधी आणि भोळी-भाबडी माणसच त्याच्यामागे जाऊ शकली. श्रद्धा ही फक्त भोळ्या-भाबड्या लोकांसाठी आहे. आधुनिक शिक्षण ज्या क्षणी तुमच्या डोक्यात शिरतं; त्याक्षणी मग तुमच्याकडे एक विचारवंत मन, एक प्रश्नार्थक मन, एक संशयी मन असणारच. या प्रकारच्या मनाने, तुम्ही श्रद्धेच्या मार्गावर वाटचाल करू शकत नाही.

तर मग याचा अर्थ; श्रद्धा तुमच्यासाठी अशक्य आहे असा होतो का? नाही, परंतु तुमच्याकडे जे नाही त्या गोष्टीपासून सुरुवात करू नका. तुमच्याकडे आत्ता जे काही आहे त्यापासून सुरुवात करा. तुमच्यात जे काही प्रबळ आहे, म्हणजे जर तुम्ही एक विचारशील व्यक्ती असाल तर ते वापरा; जर भौतिकदृष्ट्या तुम्ही प्रबळ असाल तर ते वापरा; जर तुमच्यातील उर्जेच्या दृष्टीने तुम्ही अधिक प्रबळ आहात किंवा तुमच्यात भरपूर भावना असतील, तर त्या वापरा. पण या चारही गोष्टी बाणणे आणि त्यांचा वापर करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, जर अनुभवाच्या तुम्ही एका विशिष्ट पातळीवर आलात तर भक्ती तुमचा एक स्वाभाविक अंग बनते. जर तुम्ही भक्त होण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही ढोंगी व्हाल; या प्रकारची भक्ती ही केवळ फसवणूक आहे.

श्रद्धा ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या आत आहे. हा तुमचा गुण आहे. ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही स्वतःच ती बनता, ती काही विश्वास ठेवण्याजोगी गोष्ट नाही. श्रद्धा म्हणजे अस्तित्वातच पुन्हा खोलवर उडी घेणे. म्हणजे, एक व्यक्ती म्हणून तुम्ही विखरून, गळून पडता, अस्तित्वाचीच तुम्ही साधी, छोटीशी एक लाट बनता. तुमचं अस्तित्व इथे अगदी अल्पकालीन, पुसटसं आहे याची तुम्हाला जाणीव होते आणि ते तुमच्या अनुभवातही येतं. ही काही वैचारिक समज नाही, हा तर तुमचा जिवंत अनुभव आहे की तुम्ही या पृथ्वीतून आलेला पृथ्वीचाच एक छोटासा अंग आहात असं पाहता. जेंव्हा तुम्ही हा एक जिवंत अनुभव म्हणून जगता तेंव्हा तुम्ही श्रद्धा बनता. तोपर्यंत श्रद्धेबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाही.

लोक ज्या श्रद्धाळूपणाबद्दल बोलतात ती फक्त निष्ठा आहे. तुम्हाला धरुन ठेवण्याचा हा एक कट आहे. श्रद्धा ही काही तुम्हाला पकडून ठेवण्याची योजना नाही, श्रद्धा तुम्हाला मुक्त करण्याचा मार्ग आहे. श्रद्धा ही काही या गटात किंवा त्या गटात सामील असण्याबद्दल नाही. श्रद्धा केवळ या अस्तित्वाचाच एक भाग बनण्यासाठी आहे. ती काही तुम्ही करण्याजोगी गोष्ट नाही, ती तुमच्या असण्याची रीत आहे, अर्थात तुमचं अवघं अस्तित्वच श्रध्देनं भरून जातं.

(जागतिक पातळीवर नावाजलेले द्रष्टे योगी, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरु हे भारतातील पहिल्या 50 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सद्गुरूंना भारत सरकारने 2017 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविले आहे.)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com