आनंदाची भरती तुमच्या अंतरी

सद्गुरुंचा संदेश
आनंदाची भरती तुमच्या अंतरी

आज जर तुम्ही ब्लिस अर्थात परमानंद असं म्हणालात तर लोकांना वाटतं की तुम्ही एका विशिष्ठ मादक पदार्थ म्हणजे ड्रग्सबद्दल बोलताय. मादक पदार्थांची नावंसुद्धा अशीच ब्लिस म्हणून ठेवली आहेत. परमानंद हा खरा किंवा खोटा नसतो. जेव्हा तुम्ही खरोखर सत्याच्या सानिध्यात असता तेव्हा तुम्ही सहज, स्वाभाविकपणे परमानंदात असाल. तर तुम्ही परमानंदात आहात कि नाही ही जणू तुमची लिटमस टेस्ट आहे की तुम्ही सत्याच्या सानिध्यात आहात की नाही.

बहुतेक लोकांमध्ये सुख म्हणजेच परमानंद हा गैरसमज दृढ आहे. सुख तुम्ही कधीही फार काळ टिकवून ठेवू शकत नाही, तुम्हाला निरंतर तृप्त ठेवण्यास ते असमर्थ ठरते. सुख हे नेहेमी कुणी एक व्यक्ती किंवा एखाद्या गोष्टीवर अवलंबून असतं. परमानंद कशावरही विसंबून नसतो. तो तुमचा प्राकृतिक स्वभाव आहे. त्याला कोणत्याही बाह्य उत्तेजनांची गरज नसते. एकदा तुम्ही त्याच्या संपर्कात आलात की तुम्ही परमानंदाने ओतप्रोत होता. परमानंद ही काही तुम्ही बाहेरून मिळवण्याजोगी गोष्ट नाहीये, तो तुम्हाला तेव्हा गवसतो जेव्हा तुम्ही खोलवर तुमच्या आतच त्याचा ठाव घेता.

समजा तुम्ही तहानलेले आहात, तुम्ही तोंड उघडून पावसाचे थेंब तोंडात पडण्याची वाट पहात राहिलात तर काही थेंब तुमच्या तोंडात पडतीलही, पण तहान भागवण्याच्या या प्रकारच्या प्रयत्नांत केवळ निराशाच तुमच्या पदरी पडणार आणि तसाही पाऊस काही वर्षभर पडत नाही. म्हणून तहान भागवण्यासाठी तुम्ही स्वतःची विहीर खोदता जेणेकरून वर्षभर तुमच्याकडे पाणी उपलब्ध असेल.

ज्याला तुम्ही खरा आनंद म्हणता तो म्हणजे, तुम्ही तुमच्या आतच तुमची विहीर खणता आणि त्यातून वाहणारा आनंदाचा झरा तुमचं सबंध जीवन पोषित करतो. आता जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा पावसाच्या पाण्याचे थेंब तुमच्या तोंडात पडावेत म्हणून तुम्ही तोंड उघडून बसत नाही. आता निरंतर तुमच्याजवळ अखंड पाण्याचा पुरवठा आहे. हाच परमानंद आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com