जीवनाची कास धरा

सद्गुरुंचा संदेश
जीवनाची कास धरा

एक महत्वाची गोष्ट प्रत्येक माणसाने केली पाहिजे; ती म्हणजे त्यांनी त्यांची मानसिक आणि भावनिक जडणघडण त्यांच्या जीवनाच्या सर्वात मूलभूत गोष्टी भोवती - म्हणजेच त्यांच्या मृत्यू भोवती प्रस्थापित केले पाहिजे. असे जेव्हा तुम्ही करता तेव्हाच सहजपणे तुम्ही अध्यात्मिक प्रक्रियेसाठी पात्र होता, एक असा आयाम जो संसारिक गोष्टींच्या पलीकडे आहे.

तुमच्या तार्किक मनाचा हा गुणधर्म आहे की ते मृत्यूला तुमच्या विचारातून पूर्णपणे बाजूला काढून टाकते. त्यामुळेच बहुतांश लोकांची मानसिक जडणघडण अमर असण्याच्या मूर्ख कल्पने भोवती फिरत असते - जणू काही ते इथे कायमस्वरूपी असणार आहेत. कधीच त्यांच्या मनात विचार देखील नसतो की ही मर्यादित वेळ आहे आणि ते फक्त मागच्या पिढीकढून पुढच्या पिढीला सोपवणारे एक मशाल घेऊन जाणारे आहेत. आत्ता लोकांना अवघं आयुष्य लागतं हे समजायला की ते नश्वर आहेत; त्यांना एक हार्ट अटॅक किंवा कॅन्सर ची गाठ व्हावी लागते याचे स्मरण होण्यासाठी.

तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तुम्ही साजरा केला पाहिजे आणि त्याचा आनंद अनुभवला पाहिजे कारण जीवन तुमच्यासाठी एक क्षण सुद्धा थांबत नाही. म्हणून ही प्रक्रिया आनंदी आणि अदभूत बनवणे अत्यंत महत्वाचे आहे. जर तुम्ही अमर असता तर तुम्ही प्रत्येकी शंभर वर्षे उदासीनतेत, चिंतेत, वेडेपणात, दुःखात घालवून त्यांचा आनंद लुटला असता आणि पाचशेव्या वर्षी आनंदी होण्याची निवड केली असती. परंतु वस्तुस्थिती तशी नाहीये. तुम्ही मरणार आहात आणि वेळ निसटत चालली आहे. हा काही विकृत, निराशाजनक संदेश नाहीये, खरे पाहता तो जीवनाभिमुख आहे. तुम्ही खर्‍या अर्थाने जीवनाभिमुख तेव्हाच व्हाल जेव्हा तुम्हाला कळेल की आयुष्य म्हणजे अतिशय मर्यादित काळ आहे. दुःखी आणि उदासीन असणे हे मरणाभिमुख आहे, हो ना? या सगळ्या नकारात्मक गोष्टींसाठी तुमच्याजवळ वेळ आणि स्थान आहे कारण तुम्हाला वाटतं की तुम्ही अमर आहात. म्हणूनच जीवनात निराशा, उदासीनता, चिंता, राग यांसाठी वेळच कुठे आहे? जीवनात कुठल्याच दुःखासाठी वेळ नाहीये.

जर तुम्हाला असं वाटतं तुम्ही इथे कायमस्वरूपी राहणार आहात तर तुम्ही आयुष्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कराल; तुमच्या मानसिक मूर्खपणात अडकत, ज्यांचा वास्तविकतेशी काडीमात्र संबंध नाही. पण जर तुम्हाला कळलं की पुढील एक तासात तुम्ही मरणार तेव्हा तुम्ही जीवनाची प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहाल, काहीही तुमच्या नजरेतून सुटू देणार नाही. आयुष्याची मजा तुम्ही तेव्हाच लुटू शकाल आणि ते आनंदाने तेव्हाच जगू शकाल जेव्हा तुम्हाला याची जाणीव होईल की एक दिवस तुम्ही मरणार. जर सतत तुम्हाला याचे भान राहिले तर जीवनाची एकूण प्रक्रिया तुमच्या मूर्ख मानसिक चौकटीतून आणि संसारिक गोष्टींपासून अलग होईल आणि मग तुम्हाला सर्वकाही अनुभवावंस वाटेल. तुम्ही अत्यंत सतर्क व्हाल. तुमचं जीवन स्वाभाविकपणे भौतिकतेच्या पलीकडच्या गोष्टींचा ध्यास घेण्यास उत्सुक होईल. आणि मग एक आध्यात्मिक प्रक्रिया तुमच्या प्रगतीची नैसर्गिक प्रक्रिया होईल; कुणी तुम्हाला त्यात बळजबरीने ढकलण्याची गरज भासणार नाही.

(जागतिक पातळीवर नावाजलेले द्रष्टे योगी, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरु हे भारतातील पहिल्या 50 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सद्गुरूंना भारत सरकारने 2017 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविले आहे.)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com