अपुर्णत्वाची जाणीव अध्यात्माची पहिली पायरी

jalgaon-digital
3 Min Read

तुम्ही आत्ता जे काही आहात त्याच्या पलिकडचं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आत्ता तुम्ही जसे आहात ते पुरेसं नाहीये हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. अपुर्णत्वाची भावना जोपर्यंत तीव्र होत नाही, तोपर्यंत तुम्ही इतर कोणत्याही मोठ्या गोष्टीचा शोध घेणार नाही; काहीही जीव ओतून तुम्ही शोधणारही नाही.

आजकाल पुष्कळ लोक असे शिकवताना आढळतात, 39;स्वतःला सतत असं सांगत रहा की;मी अदभूत आहे, मी महान आहे.तुमच्या मुलांना तुम्ही सांगत असता तू विलक्षण आहेस, आय लव्ह यु, डोंट वरी, सर्वकाही ठीक आहे, वगैरे. असा विचार केल्यावर तुम्हाला वाटतं तुम्ही जणू या जगाचे राजेच आहात. हा निव्वळ मूर्खपणा आहे. हे म्हणजे तुमच्या सीमित मर्यादांना गौरवण्यासारखं आहे.

सर्वप्रथम तुम्ही महान आहात, हे तुम्हाला इतर कुणा दुसर्‍याने सांगायची गरजच काय किंवा तुम्ही स्वतःने सुद्धा तुम्ही महान आहात हे तुम्हाला सांगण्याची गरज काय? कारण तुमच्यात एक प्रकारचं अपूर्णत्व आहे म्हणून. जर तुम्हाला आपण अपूर्ण आहोत असं वाटत असेल तर माझ्या मते ही खूप चांगली गोष्ट आहे. जेव्हा ही अपुर्णत्वाची भावना फार तीव्र होते केवळ तेव्हाच तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी भव्य-दिव्य घडावे याची ओढ निर्माण होते.

तुमच्या कमतरता तुम्ही जर गोड मधुर शब्दांमागे लपवत आहात तर तुम्ही कधीच काही करण्यासाठी पुढे सरसावणार नाही. जे काही, जसे आहे ते अद्भूत आहे अशीच तुम्ही स्वतःची समजूत काढत राहाल. याचा अर्थ असा नाहीये की जीवन जसे आहे तसे आपण त्याचा आनंद लुटत नाही आहोत, पण हे पुरेसं नाहीये आणि याची जाणीव झाली तरच तुम्ही शाश्वत असं काही शोधू लागाल. मग फक्त चहा आणि पोहे यावर तुमचं समाधान होणार नाही. पण बर्‍याच लोकांसाठी एवढंच पुरेसं असतं. आयुष्यात कित्येक लोकांना हीच एक सर्वोच्च प्राप्ती वाटते. चहा सोबत पोहे हा अगदी जबरदस्त, सुस्तावणारा बेत वाटतो. अनेक लोकांसाठी ही त्यांच्या आयुष्यात परम तृप्ती वाटते.

केवळ जेव्हा तुम्हाला असं वाटतं की निव्वळ खाणं, पिणं, झोपणं एवढंच पुरेसं नाही. तुम्ही करत असलेल्या यासारख्या छोट्या-छोट्या गोष्टी पुरेशा नाहीत. तेव्हाच तुमच्यात अधिक जाणून घेण्याची इच्छा प्रबळ होते आणि जेव्हा अशी इच्छा जागृत होते, तेव्हा जीवनाचे आणखी आयाम अनुभवण्याची उत्कटता वाढीस लागते. त्याशिवाय हे होणे शक्य नाही.

एक योगी, द्रष्टा, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरू हे भारतातील पहिल्या 50 अतिशय प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सद्गुरूंना भारत सरकारतर्फे 2017 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *