अवधान गुरुकिल्ली अस्तित्वाला जाणण्याची

सद्गुरुंचा संदेश
अवधान गुरुकिल्ली अस्तित्वाला जाणण्याची

जेव्हा तुम्ही खरोखर तुमच्या जीवनाकडे लक्षपूर्वक पाहाल, तेव्हाच ते; कुठे सुरू होते आणि कुठे संपते, हे तुम्हाला माहित नाही याची तुम्हाला प्रचीती येईल. पण ज्याप्रकारे तुम्ही सध्या वावरत आहात, असं वाटतं जणू तुम्ही जे काही करत आहात तेच सर्वेसर्वा आहे आणि तोच जीवनाचा एकूण सार आणि शेवट आहे. ज्या क्षणी तुम्ही थोडं लक्ष देऊन पाहाल, त्या क्षणी तुम्हाला कळेल हे असे नाहीये. जर तुम्ही हे एकाग्र लक्ष शिखरावर नेले, जर तुम्ही अत्यंत सजग, सचेत होऊन लक्ष द्यायला शिकलात तर तुमच्यातील कोणत्या पैलूंकडे तुम्ही लक्ष देऊ शकता आणि कुणाकडे लक्ष पुरवू नये यासाठी आम्ही तुम्हाला सराव, साधने शिकवू शकतो. जर तुम्ही खूपच सजग, सचेत झालात तर आपण त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा ते पाहू शकतो.

आध्यात्मिक विचार तुमच्या डोक्यात शिरला हे पाहिलं पाउल तुम्हाला शक्य झालं ते केवळ तुम्ही अवधानाची एक विशिष्ट पातळी गाठलीत म्हणून. जर तुम्ही सृष्टीतील प्रत्येक गोष्टीकडे अधिक लक्ष दिले, आणि याहून महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही तुमची लक्ष एकाग्र करण्याची क्षमता वाढवली तर ते अनेक विलक्षण मार्गानी वापरले जाऊ शकते. पण असे घडून येण्यासाठी, तुम्हाला प्रचंड प्रमाणात लक्ष पुरवावे लागेल. पण तुम्ही कोणत्याही गोष्टीकडे प्रचंड लक्ष पुरवू शकत नाही कारण तुमच्याकडे जेवढे आहे तेवढेच तुम्ही देऊ शकता. पण तुमच्याकडे जे आहे, ते सुद्धा तुम्ही जपून ठेवू पाहता - ते ठीक नाही.

तुमच्या मानसिक अवधानाच्या बाबतीतसुद्धा, वेगवेगळ्या क्षणी तुम्ही अवधानाच्या वेगवेगळ्या पातळीवर असता. जेव्हा तुम्ही काम करत असता, तेव्हा एका वेगळ्या स्तरावर तुमचे लक्ष असते; जर तुम्ही ध्यान करत असाल तेव्हा तुम्ही एका वेगळ्या पातळीवर असता; जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ खात असता तेव्हा तुम्ही एका वेगळ्याच पातळीवर असता. तुमचे लक्ष देण्याचे स्तर हे वेगवेगळ्या समयी भिन्न भिन्न असतात, आणि आयुष्यात जेव्हा कधी, जे काही सर्वोच पातळीचे अवधान तुम्ही अनुभवलं आहे, पण ते संपूर्ण, समग्र नव्हते. त्यात अजूनही पुष्कळ काही आहे परंतु अद्याप ते सुप्तावस्थेत आहे.

काही वर्षांपूर्वी मी कर्नाटकातील सुब्रम्हण्या आणि मंगळुरू दरम्यानच्या रेल्वे रुळावरून लोकांच्या एका छोट्या समूहाला घेऊन ट्रेकिंग केलं. या मार्गावर 300 हून अधिक पूल आणि 100 बोगदे आहेत. इथे ट्रेकिंग करताना, बहुतेकदा तुम्ही पुलावर किंवा बोगद्यात असता आणि तिथला तो एक अद्भुत पर्वत आहे. काही बोगदे एक किलोमीटर लांबीचे आहेत. दिवसा उजेडीही जर तुम्ही आत गेलात तर काळोखी अंधार असतो. तुम्ही तुमच्या समोर स्वतःचा हात देखील पाहू शकत नाही. चांदण्याच्या प्रकाशातही तुम्हाला थोडं फार दिसतं. परंतु बोगद्यात दृष्टी नसते; तिथे कुट्ट काळोख असतो.

मी त्यांना बॅटरी शिवाय त्या बोगद्यात फिरण्यास भाग पाडले. तेथे खंदक असण्याची शक्यता होती, रिकामी जागा असू शकली असती, काहीही असू शकले असते आणि वटवाघुळं सर्वत्र उडत होती. सुरुवातीला लोक घाबरले पण काही वेळानंतर हळूहळू त्यांनी चालायला सुरुवात केली आणि संपूर्ण अनुभवाचा आनंद घेतला. जर तुम्ही अशा ठिकाणी असाल तर तुमचे अवधान खरोखरच अधिक तीव्र होते. तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला तुमचे लक्ष असेच ठेवू शकलात तर तुम्ही प्रकाशमान होऊन जाल.

(जागतिक पातळीवर नावाजलेले द्रष्टे योगी, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरु हे भारतातील पहिल्या 50 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सद्गुरूंना भारत सरकारने 2017 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविले आहे.)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com