श्वासाचा बंध

श्वासाचा बंध

सद्गुरुंचा संदेश

श्वसन म्हणजे केवळ ऑक्सिजन आणि कार्बनडाय ऑक्साइडची देवाणघेवाण नव्हे. तुम्ही अनुभवत असणार्‍या विविधस्तरांवरील विचार आणि भावनांसाठी, तुमचा श्वास वेगवेगळ्या प्रकारचे स्वरूप धारण करतो.

तुम्ही जेंव्हा रागावलेले, शांत, आनंदी किंवा दु:खी असता, तुमच्या श्वसनात सूक्ष्म बदल होतात. ज्या प्रकारे तुम्ही श्वासोच्छवास करता त्याच प्रकारे तुम्ही विचार करत असता. आणि ज्या प्रकारे तुम्ही विचार करता, त्याच प्रकारे तुम्ही श्वासोच्छवास करता.

श्वसनाचा उपयोग शरीर आणि मनासोबत अनेक गोष्टी घडवून आणण्यासाठी एक साधन म्हणून करता येऊ शकतो. प्राणायाम हे एक शास्त्र आहे, ज्याद्वारे जाणीवपूर्वक एका विशिष्ट प्रकारे श्वसन करून, तुमची विचार करण्याची, जाणून, समजून घेण्याची आणि जीवन अनुभवण्याची पद्धत बदलवून टाकता येते.

मी जर तुम्हाला तुमच्या श्वासावर लक्ष द्यायला सांगितले, हल्ली हा सर्वसामान्य सराव अनेक लोक करतात, तुम्हाला वाटते की तुम्ही श्वासाकडे लक्ष देत आहात, पण खरं पाहता फक्त श्वसनातील हवेच्या हालचालींमुळे निर्माण झालेल्या संवेदनाच तुमच्या लक्षात येतात. हे असे आहे, की जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या हाताला स्पर्श केला, तर तुम्हाला असे वाटते की तुम्हाला त्या व्यक्तीचा स्पर्श जाणवला, पण प्रत्यक्षात तुम्हाला फक्त तुमच्या शरीरात निर्माण झालेल्या संवेदना जाणवतात; दुसर्‍या व्यक्तीला कसे वाटते हे सुद्धा तुम्ही जाणू शकत नाही.

श्वसन म्हणजे दैवी हात असल्यासारखे आहे. तुम्हाला त्याची जाणीव होत नाही. त्या हवेमुळे उदभवणार्‍या संवेदना नाहीत. हा श्वास जो तुम्ही अनुभवू शकत नाही त्याला कूर्म नाडी असे म्हणतात.

ही एक अशी तार आहे जी तुम्हाला तुमच्या शरीराला सोबत बांधून ठेवते - एक अखंडित सूत्र जे निरंतर चालूच असतं. मी जर तुमचा श्वास काढून घेतला, तर तुम्ही आणि तुमचे शरीर विभक्त होऊन गळून पडाल कारण तुम्ही आणि तुमचे शरीर हे कूर्म नाडीने एकत्र बांधून ठेवले आहे. ही एक मोठी फसवणूक आहे. खरंतर तिथे दोघं आहेत, पण ते एकच असल्याचे भासवतात. हे एखाद्या लग्नासारखे आहे - ते दोन असतात, पण ते जेंव्हा समाजासमोर येतात तेंव्हा ते एकच असल्यासारखे भासवतात. या ठिकाणी दोघेजण आहेत, शरीर आणि तुम्ही, दोन अतिशय भिन्न स्वरूपे, पण ते एकच आहेत असे भासवतात.

जर तुम्ही श्वासासोबत प्रवास केला, तुमच्या स्वतःमध्ये अत्यंत खोलवर, श्वासाच्या सर्वात खोल गाभ्यापर्यंत, तो तुम्हाला अशा बिंदुपर्यंत घेऊन जाईल जेथे तुम्ही प्रत्यक्ष शरीराशी बांधले गेले आहात. तुम्ही कसे आणि कुठे बांधले गेले आहात हे एकदा तुमच्या लक्षात आले, तर तुम्ही ते बंधन तुमच्या इच्छेनुसार सोडवू शकता.

जाणीवपूर्वक, तुम्ही जितक्या सहजतेने कपडे काढून टाकता, तितक्याच सहजतेने हे शरीर सुद्धा विलग करू शकता. तुमचे शरीर कोठे बांधून ठेवले आहे हे जर तुम्हाला माहिती असेल, तर तुम्ही अतिशय स्पष्टपणे ते एका अंतरावर धरून ठेऊ शकता. जेंव्हा तुम्हाला त्याचा त्याग करायचा असेल, तेंव्हा तुम्ही जागरूकपणे ते सोडून देऊ शकता. तेव्हा जीवन अतिशय वेगळे बनते.

जेंव्हा एखादी व्यक्ती स्वेच्छेने स्वतःच्या शरीराचा संपूर्णपणे त्याग करते, तेंव्हा आपण त्याला महासमाधी असे संबोधतो. सामान्यतः यालाच मुक्ती असे, किंवा परम मुक्ती असे संबोधले जाते. ही समत्वाची एक विलक्षण जाणीव आहे जेथे शरीरात काय आहे आणि शरीराबाहेर काय आहे यात काहीही फरक उरत नाही. आणि सर्व खेळ संपुष्टात येतो.

(जागतिक पातळीवर नावाजलेले द्रष्टे योगी, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरु हे भारतातील पहिल्या 50 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सद्गुरूंना भारत सरकारने 2017 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविले आहे.)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com