धनसंग्रह करणे शक्य होईल

jalgaon-digital
4 Min Read

सौ. वंदना अनिल दिवाणे

डिसेंबर – 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी मंगळ,तृतीयात रवि-बुध- केतू, चतुर्थात शुक्र, पंचमात शनि-प्लुटो, षष्ठात गुरू-नेपच्यून, नवमात राहू, अष्टमात हर्षल, अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे टो, पा, पी, पु, पा, ठा, पे, पो अशी आहेत. राशीचे चिन्ह एका हातात धान्याची लोंबी व दुसर्‍या हातात अग्नी घेऊन नौकेत बसलेली स्त्री असे आहे. राशी स्वामी- बुध आहे. राशी तत्त्व पृथ्वी असल्याने सहनशील स्वभाव. द्विस्वभाव असल्याने निर्णय घेण्यास वेळ लागतो. दक्षिण दिशा फायद्याची आहे. लिंग स्त्री असल्याने स्वभाव सौम्य, लाजाळू व धीटही. पण उद्धटपणा कोठेही नाही. वात प्रकृती. राशीचा अंमल पोटावर असल्यााने पोटाच्या विकाराची काळजी घ्या. शुभ रंग हिरवा, शुभ रत्न पाचू, शुभ दिवस- बुधवार व रविवार. शुभ अंक- 5, शुभ तारखा- 5, 14,23. मित्र राशी- तुला. शत्रु राशी-कर्क. गणरायाची उपासना फायद्याची आहे.

पंचमात प्लुटो आहे. नाना साधनांनी सुखप्राप्ती करण्यासाठी धडपड करण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल. बुद्धीचे ज्ञानग्रहण सामर्थ्य चांगले राहील. सतत उत्साही असल्यामुळे कार्यक्षमता उत्तम राहील. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. शत्रुच्या कारवाया रोखण्यासाठी जागरूक रहा.

स्त्रियांसाठी -धार्मिकतेकडे कल राहील. बोलतांना कटू शब्द टाळले तर तणावरहीत वातावरण राहील. पतीराज शब्दाबाहेर जाणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना चांगले अभ्यासू मित्र मिळतील. विद्याभ्यात मन लागेल. उत्साह दांडगा राहील. क्लासेसमुळे बरीच धावपळ होईल.

शुभ तारखा – 1, 6, 8, 9, 11, 13, 15, 19, 20, 21, 24, 25, 27, 28

जानेवारी – 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयस्थानी मंगळ-केतू, चतुर्थात रवि-शुक्र, पंचमात बुध-शनी-प्लुटो, षष्ठात गुरू- नेपच्यून, अष्टमात हर्षल, नवमात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

षष्ठात गुरू आहे. सहावा गुरू चांगला नाही असे समजले जाते. कारण कामासक्तता वाढून मनुष्य बलहीन होतो. शत्रु जिंकण्याची शक्यता असते. वैद्यकीय व्यवसायाला हा गुरू फार पोषक आहे. सार्वजनिक प्रश्नांची चर्चा करणे आवडते. नोकर वर्गाला हा गुरू चांगला आहे. पदोन्नती किंवा इच्छीत स्थळी बदली होण्याची शक्यता आहे. शरीरस्थूल होऊ नये यासाठी नियमीत हलका व्यायाम करा. प्रकृती निरोगी राहील पण पचनाच्या तक्रारी चालू राहतील.

चतुर्थात शुक्र आहे. आनंदी वृत्ती राहील. आर्थिक आवक उत्तम राहील. न्यायीपणामुळे लोकप्रियतेत भर पडेल. आकर्षक व मधुर बोलण्याने घरात व घराबाहेर खेळीमेळीचे वातावरण राहील. पत्नीचा सल्ला लाभदायक असेल. मातेची सेवा कराल. वाहनसुख चांगले मिळेल.

स्त्रियांसाठी -चतुर्थात शुक्र आहे. आनंदी वृत्ती प्रदान करील. कुटूंबात हुकूमाची राणी व्हाल. हातात पैसा खेळत राहील. मनासारखी शॉपिग कराल. पतीराजांची मर्जी बहाल होईल.

विद्यार्थ्यांसाठी – पंचमात प्लुटो आहे. विद्यार्थ्यांचे ज्ञान ग्रहण सामर्थ्य चांगले राहील. उत्साह टिकून राहील. त्यामुळे अभ्यासात मनाला एकाग्र करणे शक्य होईल. प्रगतीकारक काळ आहे.

शुभ तारखा – 3, 4, 5, 8, 10, 11, 14, 18, 20, 22, 23, 26, 29

फेब्रुवारी – 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशी तृतीयस्थानी केतू, चतुर्थात मंगळ-शुक्र, पंचमात रवि-बुध-शनि-प्लूटो, षष्ठात गुरू-नेपच्यून, अष्टमात हर्षल, नवमात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

चतुर्थात मंगळ आहे. पत्नीचा शब्द टाळता येणार नाही. त्यामुळे मातृसुखात अडचणी येण्याची शक्यता आहे. वाहनापासून अपघात होऊ नये ही काळजी घ्या. घरी आग लागू शकते किंवा चोरी होऊ शकते या दुर्दैवी घटना घडू नये याची काळजी घ्या. इस्टेटीचे व्यवहार पुढे ढकलावेत. वृद्धांनी घरातील मंडळींशी जमवून घ्यावे. अन्यथा मनस्ताप सहन करावा लागेल. नोकरी, उद्योग, व्यवसायाच्या बाबतीत परिस्थिती उन्नतीकारक राहील. वाहन खरेदीसाठी चांगला काळ आहे. बंधू सुख उत्तम मिळेल.

पंचमात बुध आहे. परिस्थितीत बदल होईल. पुत्रसुख उत्तम मिळेल. उपासनेमध्ये मन लागेल. मानसिक शांती प्राप्त होईल. साहित्यसेवा करण्यात यश मिळेल. आर्थिक आवक वाढेल. धनसंग्रह करणे जमेल. आपल्या बुद्धीमत्तेने इतरांनी चकीत कराल.

स्त्रियांसाठी – पती पत्नीचे आपापसात प्रेम राहील. शत्रुसमान नातेवाईकांच्या गुप्त कारवाया उघड करण्यात यश येईल. काटकसर करा.

विद्यार्थ्यांसाठी – अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परीक्षेसाठी चांगलाच उपयोग होईल. खेळ आणि टी. व्ही.कडे दुर्लक्ष चांगले.

शुभ तारखा – 3, 5, 6, 7, 13, 14, 15, 17, 18, 20, 21, 22, 24

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *