आर्थिक आवक वाढेल

त्रैमासिक भविष्य - कन्या
आर्थिक आवक वाढेल

सौ. वंदना अनिल दिवाणे

जून - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी धन स्थानी केतू, पंचमात प्लूटो,षष्ठात-शनी, सप्तमात मंगळ-गुरू-नेपच्यून, अष्टमात शुक्र-राहू-हर्षल, नवमात रवि- बुध अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे टो, पा, पी, पु, ठा, पे, पो अशी आहेत. राशीचे चिन्ह एका हातात धान्याची लोंबी व दुसर्‍या हाता अग्नी घेऊन नौकेत बसलेली स्त्री आहे. राशी स्वामी बुध, राशी तत्त्व पृथ्वी असल्याने स्वभाव सहनशील. द्विस्वभाव राशी असल्याने निर्णय घेण्यास वेळ लागतो. त्वरीत निर्णय घेतला तरी कृतीत आणण्यास वेळ लागतो. दक्षिण दिशा फायद्याची आहे. लिंग स्त्री असल्याने स्वभाव सौम्य, लाजाळू व थोडा धीटही. पण उद्धटपणा नाही. वातप्रकृती, राशीचा अंमल पोटावर असल्याने विशेष काळजी घ्यावी लागेल. शुभ रंग-हिरवा, शुभ रत्न-पाचू, शुभ दिन- बुधवार व रविवार,शुभ अंक-5, शुभ तारखा-5/14/23. मित्रराशी - तुला, शत्रुराशी-कर्क, गणरायाची उपासना फायद्याची आहे.

अष्टमात शुक्र आहे. पत्नीच्या नातेवाईकांकडून आर्थिक सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. धनप्राप्तीच्या बाबतीत 2 गोष्टी लक्षात ठेवा.धनप्राप्ती शक्यतो स्वकष्टावर करा, कमी श्रमात अधिक धनप्राप्तीच्या आशेने त्यासाठी अवैध मार्गाचा अवलंब करू नयेे. भ्रष्टाचार सुरूवातीला गोड वाटला तरी परिणाम शेवटी विषासारखा भयंकर असतो.

स्त्रियांसाठी - अष्टमात शुक्र आहे. महिलांना ‘ग‘ ची बाधा संभवते. त्यातून कटू भाषण व कटकटी होऊ नये यासाठी जागरूक रहा. पतीराज खुष रहातील. कौटुंबिक खर्चाला पैसा कमी पडणार नाही.

विद्यार्थ्यांसाठी - शाळा नुकत्याच सुरू झालेल्या असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेला वेळ परत येत नाही.

शुभ तारखा - 1, 2, 4, 6, 8, 11, 13, 15, 16, 19, 21, 22, 24, 30

जुलै - 2022

महिन्याच्या सुरूवातीला राशीच्या द्वितीयात केतू, पंचमात प्लूटो, षष्ठात -शनि, सप्तमात गुरू-नेपच्यून, अष्टमात मंगळ-नवमात - शुक्र, दशमात रवि-बुध अशी ग्रहस्थिती आहे.

सप्तमात गुरु आहे. विवाहोत्सुक तरूण तरूणींना चांगला जोडीदार मिळेल. थोर लोकांची संगत प्राप्त होईल. उत्तम स्थळी प्रवास घडेल. स्वजातीच्या उन्नतीसाठी कार्य कराल. लबाडांनीही वश कराल. नवविवाहीतांचा भाग्योदय होईल. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. पित्यापेक्षा मोठी योग्यता प्राप्त करण्याचा योग आहे. स्वतःच्या सामर्थ्याबद्दल गर्व वाटेल. गर्वाविषयी संयम ठेवा. गर्वाचे घर खाली ही म्हण लक्षात ठेवा. विद्वान लोकात मान मिळेल.

दशमात बुध आहे. विद्याव्यासंगात वृद्धी होईल. नावलौकीक वाढेल. राजकारण्यांची लोकप्रियता वाढेल. अनेक प्रकारच्या धंद्यात यश मिळेल. वक्तृत्त्वाला बहर येईल. सज्जनांची संगत प्राप्त होईल. या सर्वांचा परिणाम म्हणून आर्थिक आवक वाढेल. तीही सन्मार्गाने असल्याने तणावरहित स्थिती राहील.

धनस्थानी केतू आहे. कर्जापासून दूर रहा. कर्ज घ्यावे लागल्यास हप्ते वेळेवर भरा.

स्त्रियांसाठी - भाग्यात शुक्र आहे. महिलांच्या व्यक्तीमत्वाच्या दृष्टीने वृद्धी होईल. पती पुत्र सुख उत्तम राहील. मात्र कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांसाठी - तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा - 1, 2, 7, 8, 15, 18, 20, 21, 24, 29

ऑगस्ट - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशी धनस्थानी केतू, पंचमात शनि- प्लटो, सप्तमात गुरू-नेपच्यून, अष्टमात राहू-हर्षल, नवमात मंगळ, लाभात रवि-शुक्र , व्ययात बुध अशी ग्रहस्थिती आहे.

एकादशातील रविमुळे आर्थिक आवक वाढेल. केलेल्या श्रमाचा मोबदला आता चांगल्या प्रकार मिळू शकेल. पराक्रमाला जोर येईल. शत्रुवर विजय मिळेल. संयम चांगला असल्याने चरित्र शुद्ध राहील. मित्र चांगले व मोठ्या कुळातील मिळतील. हाताखालच्या मित्राकडून काम करून घ्याल.

नवमात मंगळ आहे. स्वभाव काहीसा लहरी व उतावीळ राहील. पत्नीच्या नातेवाईकांकडून मदतीसाठी विचारणा होईल.

सप्तमात नेपच्यून आहे. भागीदारीचे व्यवहार टाळावे फसवणुकीची शक्यता आहे. हीच गोष्ट विवाहाच्या बाबतीत समजावाी. विवाह ठरवितांना नीट चौकशी करा.

पंचमात प्लुटो आहे. नाना साधनांनी सुखप्राप्तीसाठी सुखप्राप्ती करण्याची धडपड करण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल. बुद्धीचे ज्ञानग्रहण सामर्थ्य चांगले राहील.सतत उत्साह असल्यामुळे कार्यक्षमता उत्तम राहील.

स्त्रियांसाठी - महिलांचा स्वभाव प्रेमळ राहील. कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवण्याची वृत्ती राहील. हे मात्र धोक्याचे राहील. सोने म्हणून पितळ हाती लागण्याचा संभव आहे.

विद्यार्थ्यांसाठी-विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.

शुभ तारखा - 2, 3, 4, 9, 10, 13, 15, 16, 17, 20, 22, 28, 29, 30, 31

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com