त्रैमासिक भविष्य -कन्या Quarterly Future - Virgo

सांपत्तिक लाभ होतील
त्रैमासिक भविष्य -कन्या Quarterly Future - Virgo

सौ. वंदना अनिल दिवाणे

जून - 2021

आठवड्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयेत केतू, पंचमात शनी-प्लूटो, षष्ठात गुरु-नेपच्यून, नवमात रवि-बुध-राहू, दशमात शुक्र, लाभात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे.

राशीची अध्याक्षरे टो, पा,पी, पू अशी आहेत. राशीचे चिन्ह एका हातात धान्याची लोंबी व दुसर्‍या हातात अग्नी घेऊन नौकेत बसलेली स्त्री असे आहे. राशी स्वामी-बुध, राशीतत्त्व-पृथ्वी असल्याने स्वभाव सहनशील. द्विस्वभाव राशी असल्याने निर्णय घेण्यास वेळ लागतो. त्वरित निर्णय घेतला तरी कृतीत उशीर लागतो. दक्षिण दिशा फायद्याची आहे. लिंग स्त्री असल्याने स्वभाव सौम्य लाजाळू आणि धीटही

परंतु उद्धटपणा नाही. वात प्रकृती. राशीचा अंमल पोटावर असल्याने पोटाच्या विकाराची विशेष काळजी घ्यावी. शुभ रंग हिरवा, शुभरत्न पाचू , शुभ दिन बुधवार व रविवार, शुभ अंक 5 ,शुभ तारीख 5/ 14/23 मित्रराशी-तुला, शत्रू राशी-कर्क. गणरायाची उपासना तुमच्यासाठी फायद्याची आहे.दशमात शुक्र हा उत्तम शुभयोग आहे. सर्व प्रकारचे भाग्य तुमच्याकडे चालत येईल. मातृ-पितृसुख उत्तम राहील. उद्योग व्यवसाय नोकरी सर्वच बाबतीत प्रगती होईल. कमी श्रमात विपुल धनप्राप्ती होईल. बरोबर बोनस म्हणून मोठेपणाही मिळेल. प्रकृती उत्तम राहील. विलासी साधनांची व सौंदर्याची आवड वाटेल.

स्त्रियांसाठी - धार्मिक वृत्तीमुळे महिलांचे मानसिक स्वास्थ उत्तम राहील. परदेशगमन करणार्‍या महिलांचा भाग्योदय होईल. कला क्षेत्रात विशेषतः लेखनात चांगले यश मिळेल. पुत्रसुख उत्तम मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांनी स्वास्थाची काळजी घ्यावी. शैक्षणिक प्रगती होईल. पालकांकडून शिक्षणासाठी पैसे उपलब्ध होतील. वाचनाबरोबर लिहीण्याचा सराव करावा.

शुभ तारखा -2, 3, 6, 12, 13, 15, 16, 17, 19, 20, 25, 28, 29

जुलै - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीची तृतीयात केतू, पंचमात शनी- प्लूटो, षष्ठात गुरू-नेपच्यून, अष्टमात हर्षल-बुध-राहू, दशमात रवी, लाभात मंगळ-शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.

एकादशात मंगळ आहे. सांपत्तिक लाभ होतील. त्यासाठी मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल. मात्र मित्राची पारख आवश्यक आहे. सामाजिक कार्याची फार आवड वाटेल. वाईट संगती ठेवल्यास भांडणाचे प्रसंग येतील. स्थावर इस्टेट संबंधी लाभ होण्याचा संभव आहे.

दशमस्थानातील रवीमुळे खात्रीने महत्त्व प्राप्त होईल. विशेषतः राजकारणी लोकांना यांची जास्त प्रचिती येईल. निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्ता अथवा पुढारी यांना प्रचारकार्य करण्यात चांगले यश मिळेल. पितृसुख उत्तम मिळेल.

पंचमात प्लूटो आहे. नाना साधनांची सुखप्राप्ती करण्यासाठी धडपड करण्याची इच्छा निर्माण होईल. बुद्धीचे ज्ञानग्रहण सामर्थ्य चांगले राहील. सतत उत्साह असल्यामुळे कार्यक्षमता उत्तम राहील. हातात घेतलेल्या कामात विजय मिळेल. मात्र शत्रूच्या कारवाया रोखण्यासाठी जागृत राहणे आवश्यक आहे. रात्र वैर्‍याची आहे. विद्याव्यासंग वाढेल.

स्त्रियांसाठी - पती पत्नीमध्ये आपसात प्रेम उत्तम राहील. शत्रुसमान नातेवाईकांच्या गुप्त कारवाया उघडकीस आणण्यात यश मिळेल. डामडौल दाखविण्यासाठी वायफळ खच करू नका.

विद्यार्थ्यांसाठी -विद्यार्थ्यांना चांगले अभ्यासू मित्र मिळतील. विद्याभ्यात मन लागेल. उत्साह दांडगा राहील. क्लासेसमुळे बरीच धावपळ होईल.

शुभ तारखा - 1, 2, 3, 11, 12, 16, 18, 21, 25, 27, 28, 29

ऑगस्ट - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयस्थानी केतू, पंचमात शनी-प्लूटो, षष्ठात गुरू-नेपच्यून , अष्टमात हर्षल, नवमात राहू , लाभात रवि-बुध , व्ययात मंगळ शुक्र अशी ग्रहस्थिती आहे

एकादशात बुध आहे. राजकृपेने चांगले लाभ होतील. इष्ट हेतू साध्य होतील. शत्रुना गोड बोलून वश कराल. संगीताची आवड वाटेल .सभा संमेलनात तेजस्वीपणा दाखवाल. मानसिक उन्नतीला एकादशातील बुध फार चांगला समजला जातो. त्यातून अध्यात्मिक उन्नती साध्य करू शकाल. शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक व प्राध्यापक यांचा विद्वत्तेचा गौरव होईल. ज्योतिषशास्त्रात आवडत असल्यास त्यात प्रगती होईल.

षष्ठात गुरू आहे. सहावा गुरू चांगला नाही असे समजले जाते कारण कामासक्तता वाढून मनुष्य बलहीन होतो. शत्रु जिंकण्याची शक्यता असते. मात्र वैद्यकीय धंद्याला हा ग्रह फार पोषक आहे. सार्वजनिक प्रश्नांची चर्चा करणे आवडेल. नोकरवर्गाला हा गुरु विशेष चांगला आहे. नोकरीमध्ये पदोन्नती होण्याची व इच्छित स्थळी बदली होण्याची शक्यता आहे. शरीर स्थूल होण्याची शक्यता आहे, त्यासाठी नियमित हलका व्यायाम विशेषतः चालण्याचा व्यायाम करा. प्रकृती निरोगी राहील मात्र पचनाच्या किरकोळ तक्रारी चालू राहतील.

स्त्रियांसाठी -द्वादशात शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला. म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्‍या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्‍या महिलांसाठी त्रासदायक आहे.

विद्यार्थ्यांसाठी -पंचमात प्लुटो आहे. विद्यार्थ्यांचे ज्ञानग्रहण सामर्थ्य चांगले राहील. उत्साह टिकून राहील. त्यामुळे अभ्यासात मनाला एकाग्र करणे शक्य होईल. प्रगतीकारक काळ आहे.

शुभ तारखा - 4, 5, 9, 10, 11, 13, 14, 15,19, 20, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 30, 31

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com