वैभव प्राप्त होईल

त्रैमासिक भविष्य - तूळ
वैभव प्राप्त होईल

सौ. वंदना अनिल दिवाणे

डिसेंबर - 2021

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ,द्वितीयात रवि-बुध- केतू, तृतीयात शुक्र, चतुर्थात शनि-प्लुटो, पंचमात गुरू-नेपच्यून, सप्तमात हर्षल, अष्टमात राहू , अशी ग्रहस्थिती आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे रा, री, रे, रू, ता,ती,तू, ते अशी आहेत. राशीचे चिन्ह तराजू आहे. राशी स्वामी शुक्र, तत्त्च - वायू, चर रास असल्याने स्वभाव चंचल. पश्चिम दिशा फायद्याची आहे. लिंग- पुरूष, त्यामुळे काही स्त्रियांची वागणूक पुरूषी थाटाची. रजोगुणी. स्वभाव- क्रूर, त्रिदोष प्रकृती. राशीचा अंमल पायावर. शुभ रत्न- हिरा, शुभ रंग- सफेद, शुभ दिवस- शुक्रवार, देवता- लक्ष्मी व संतोषी. शुभ अंक-6, शुभ तारखा- 6/15/24. मित्र राशी- मिथून, मकर, कुंभ, धनु, कर्क. शत्रु राशी-सिंह. संशोधन कार्याची आवड असेल. आत्मविश्वास दांडगा. वाणी आकर्षक व प्रभावी, नकारात्मक गुणईर्षा व अतिधूर्तता. विनोदी वृत्ती.

द्वितीयातील रवीमुळे वडीलमंडळीकडून आर्थिक सहकार्याची शक्यता आहे. खर्चिक स्वभावाला लगाम लावा. अन्यथा कर्जाचा विचार करावा लागेल. पूर्वार्ध चांगला आहे. कर्ज घेतलेले असल्यास वेळेवर हप्ते भरा.

स्त्रियांसाठी - चतुर्थस्थानी असलेला शनी महिलांसाठी चांगला नाही. स्वयंरोजगारातून आर्थिक उत्पन्नात वाढ करावी म्हणजे खर्चास कठीण जाणार नाही. वाढत्या भावामुळे घरातील खर्चाचे बजेट सांभाळणे सोपे जाईल.

विद्यार्थ्यांसाठी - पंचमात गुरू आहे. विद्येची प्रगतीसाठी तो अतिशय उपयुक्त आहे. वाडवडिलांची पुण्याई व आशिर्वादामुळे अभ्यासात मन एकाग्र होईल. टक्केवारीत वाढ होईल.

शुभ तारखा - 1, 6, 8, 9, 11, 13, 15, 19, 20, 21, 24, 25, 27, 28

जानेवारी - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या धनस्थानी मंगळ-केतू, तृतीयात रवि-शुक्र, चतुर्थात बुध-शनी-प्लुटो, पंचमात गुरू- नेपच्यून, सप्तमात हर्षल, अष्टमात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीय स्थानात मंगळ आहे. प्रसिद्धीच्या झोतात याल. पराक्रमाला जोर येईल. सज्जनतेकडे कल राहील. वृत्ती चांगली असल्यामुळे शत्रुंचा पराभव होईल. दैवी कृपेचाही भाग असेलच. भावंडांसाठी खर्च करावा लागेल.

चतुर्थात बुध आहे. एकाच उद्योगधंद्यात सारखे काम करीत राहण्याचा कदाचित कंटाळा येईल. तसे करणे फायद्याचे ठरणार नाही. धरसोड वृत्तीमुळे पैसा, प्रयत्न वेळ वाया जातो. व पदरात काहीच पडत नाही. मातृसुखात अडचणी येतील. निराश होण्याचे काही कारण नाही. काळ थांबून रहात नाही.

स्त्रियांसाठी -तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगली राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल. गायनवादनादी ललीत कलांमध्ये प्रगती होईल.

विद्यार्थ्यांसाठी - पंचमातील नेपच्यून विद्यार्थ्यांना अंतस्फूर्ती प्रदान करेल. पाठांतरासाठी त्याचा चांगला उपयोग होईल. सतत वाचन केल्यास कोणताही विषय अवघड नाही. याची प्रचिती येईल.

शुभ तारखा - 3, 4, 5, 8, 10, 11, 14, 18, 20, 22, 23, 26, 29

फेब्रुवारी - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशी द्वितीयस्थानी केतू, तृतीयात मंगळ-शुक्र, चतुर्थात रवि-बुध-शनि-प्लूटो, पंचमात गुरू-नेपच्यून, सप्तमात हर्षल, अष्टमात राहू अशी ग्रहस्थिती आहे.

पंचमस्थानातील गुरू हा स्वतंत्र भाग्ययोग आहे. वैभव प्राप्त होईल. विद्वत्तेचा लौकीक सर्वत्र पसरेल. सत्पुत्र व सुख प्रदान होईल. सदगुरू कृपेने व वाडवडिलांच्या पुण्याईने भाग्योदय होईल. संततीसुख चांगले राहील. लेखनाची आवड असल्यास प्रतिभेचा परिसस्पर्श असलेले लेखन होईल. लोक शिक्षणात भाग घेण्याची संधी मिळेल. सट्ट्यासारख्या व्यवहार व व्यापारात भाग घ्यावासा वाटेल.

सप्तमात हर्षल आहे. विवाहोत्सुकांना चमत्कारिक अनुभव देईल. विवाह उशीरा होण्याची शक्यता आहे. विवाह संबंध ठरला आहे असे वाटेल व ऐनवेळी विवाह दुसर्‍या स्थळी व्हावा असाही काही विवाहोत्सुकांना अनुभव येईल. विरोधकांवर नैतिक विजय मिळवाल. पण आर्थिक लाभ मात्र काहीच होणार नाही. नव्या ओळखीतून फायदा होईल.

स्त्रियांसाठी - हातात पैसा खेळता राहील. पतीराजही खुश राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. शेजारपाजारच्या सखी तुमचा हेवा करतील. सुशिक्षीत महिलांना विद्येच्या बळावर धनप्राप्ती होईल.

विद्यार्थ्यांसाठी - तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा - 3, 5, 6, 7, 13, 14, 15, 17, 18, 20, 21, 22, 24

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com