
सौ. वंदना अनिल दिवाणे
जानेवारी - 2023
महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ, षष्ठात केतू, अष्टमात रवि-बुध, नवमात शुक्र-शनी-प्लुटो, दशमात नेपच्यून, लाभात गुरू, व्ययात राहू-हर्षल अशी ग्रहस्थितीे आहे.
तुमची रास - राशीची आद्याक्षरे इ,उ,ए, ओ, वा,वी,वे, वो अशी आहेत. राशीचे चिन्ह बैल आहे. स्वामी -शुक्र, रास पृथ्वी तत्त्वाची असल्यामुळे सहनशक्ती चांगली आहे. राशी वरून स्थिर. काहीसा आळशी ऐषआरामाची आवड. दक्षिण दिशा फायद्याची आहे. लिंग स्त्री असल्याने स्वभाव काहीसा लाघवी. रजोगुणी. वर्ण- वैश्य. राशीचा अंमल मुखावर आहे. वाचा स्पष्ट , शुद्ध व प्रभावी अभ्यासाने वक्तृत्वकला साध्य होऊ शकेल. शुभ रत्न हिरा, रंग-हिरवा. देवता-श्रीलक्ष्मी व संतोषी माता. शुभ अंक-6, शुभ तारखा- 6/15/24. मित्र राशी- मकर, कुंभ. शत्रु राशी- धनु, मीन. चिकाटी व निश्चयी. कष्टाळू, तेजस्वी, बुद्धीमान.
भाग्यातील रविमुळे जनमानसात चांगली प्रतिमा तयार होईल. नावलौकीक वाढेल. घरच्यांना आनंद वाटण्याऐवजी उत्साह भंग करण्याचा प्रयत्न करतील. मातापित्याशी म्हणावे तसे पटणार नाही. वैचारिक मते पटणार नाहीत.
स्त्रियांसाठी - भाग्यात शुक्र आहे. महिलांच्या व्यक्तीमत्वात सौंदर्याच्यादृष्टीने वृद्धी होईल. पती-पुत्र सुख उत्तम लाभेल. मात्र कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांसाठी - शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.
शुभ तारखा - 1, 4, 5, 9, 11, 14, 15, 22, 24, 26, 27
फेब्रुवारी-2023
महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी- मंगळ, षष्ठात केतू, अष्टमात - बुध, नवमात रवि-प्लुटो, लाभात शुक्र-शनि, दशमात गुरू, व्ययात राहू-हषल अशी ग्रहस्थिती आहे.
दशमात शुक्र हा उत्तम शुभयोग आहे. सर्व प्रकारचे भाग्य चालत येईल. मातृ-पितृ सुख उत्तम राहील. उद्योग, व्यवसाय, नोकरी सर्वच बाबतीत प्रगती होईल. कमी श्रमात विपुल धनप्राप्ती होईल. बोनस म्हणून मोठेपणाही मिळेल. प्रकृती उत्तम राहील. विलासी साधनांची व सौंदर्याची आवड वाटेल. ग्रामीण भागातील शेतकर्यांना याची विशेष प्रचिती येईल. नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्यांना मोठ्या अधिकारांची नोकरी मिळेल.
दशमस्थानी शनी आहे. भाग्याचे दरवाजे उघडतील. आपल्या बुद्धीमत्तेने लोकांना चकित कराल. जनमानसात आदर वाढेल. आर्थिक आवक उत्तम राहील. धाडसाने कामे कराल.
नवमात प्लुटो आहे. परदेश गमनाच्या प्रयत्नात असाल तर आता यश मिळेल. हे विश्वची माझे घर अशी भावना राहील. आध्यात्मिक सामर्थ्य साधनेच्या सातत्यातून प्राप्त होईल. व्यवहार चातुर्यामुळे सांसारिक स्थिती उत्तम राहील.
स्त्रियांसाठी - दशमातील शुक्र महिलांना किचनमधील गॅस व मुलांच्या अभ्यासातून वेळ काढून अर्थार्जनासाठी व्यापार करण्याचा संदेश देत आहे. लेखिकांना महिलांसंबंधित लेख चांगले जमतील.
विद्यार्थ्यांसाठी - विद्यार्थीदशा हा खरा तर जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहीेंना सरकारी मदत मिळेल.
शुभ तारखा - 3, 4, 6, 7, 8, 10, 11, 14, 16, 17, 22, 24, 25, 28
मार्च - 2023
महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी मंगळ, षष्ठात केतू, नवमात प्लूटो दशमात रवि-बुध-शनी, लाभात गुरू-शुक्र-शनि, व्ययात राहू-हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.
एकादशस्थानी गुरू आहे. हा गुरू लाभदायक आहे. अनेक उत्त्तम मित्र मिळतील. मित्रांचा तुमच्यामुळे चांगला फायदा होईल. वाहनसुख चांगले राहील. वाहनखरेदीचा विचार असेल तर आता खरेदी करा. थोरांचा स्नेह संपादन कराल. संततीसुख चांगले मिळेल. पुत्र जन्माबरोबर भाग्योदय होईल. बुद्धी तीक्ष्ण राहील. करिअरमध्ये मोठा अधिकार प्राप्त होईल. खजिना मौल्यवान वस्तूंनी भरलेला असेल. पुढे घडणार्या घटना आधीच कळू शकतील.
षष्टात केतू आहे. नेत्रपीडा होण्याचा संभव आहे. या स्थानातील केतू शत्रूचा नाश करेल. बंधूशी चांगले जमेल. मातुल पक्षाकडून मानहानी होण्याची शक्यता आहे. उदार वृत्ती राहील. साधुजनांचा सहवास घडेल.
स्त्रियांसाठी - व्यक्तिमत्वात वृद्धी करण्यासाठी पार्लरला भेट द्यावीशी वाटेल. पतीराज खुष होतील. अलंकार खरेदीचा योग आहे.
विद्यार्थ्यांसाठी- तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.
शुभ तारखा - 1, 4, 5, 8, 9, 11, 16, 18, 22, 23, 27, 28, 29, 30, 31