सांपत्तिक स्थिती उत्तम

त्रैमासिक भविष्य - वृश्चिक
सांपत्तिक स्थिती उत्तम

सौ. वंदना अनिल दिवाणे

डिसेंबर - 2022

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि, द्वितीयात बुध-शुक्र, तृतीयात शनी-प्लूटो, चतुर्थात नेपच्यून, पंचमात गुरू, षष्ठात राहू-हर्षल. सप्तमात मंगळ, व्ययात केतू अशी ग्रहस्थितीे आहे.

तुमची रास - राशीची आद्याक्षरे तो, ना, नी, नू, ने, या, यू अशी आहेत. राशीचे चिन्ह विंचू आहे. राशी स्वामी- मंगळ, उत्तर दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग स्त्री आहे. म्हणून स्वभाव सौम्य आहे. वर्ण- ब्राह्मण, कफ प्रवृत्ती, पाठीसंबंधी विकारांची संभावना. शुभ रत्न-पोवळे, शुभ रंग- लाल, शुभ वार-मंगळवार, देवता-शिव, हनुमान व भैरव. शुभ अंक- 9, शुभ तारखा- 9/18/27, मित्र राशी- कर्क, मीन. शत्रु राशी- मेष, सिंह, धनु. क्षमा करणार नाही. सूड घेण्याची वृत्ती. संधी मिळताच शत्रुवर वार कराल. प्रिय व्यक्तीच्या संरक्षणासाठी प्राण पणाला लावण्याची तयारी. रसायने, औषधे, व डॉक्टर्ससाठी रास. दृढप्रतिज्ञा, साहसी, कर्मठ, स्पष्टवादी.

तनुस्थानी रवि आहे. राजमान्यता मिळेल. पराक्रमाला जोर येईल. राजकारणात भाग घेणार्‍या कार्यकर्ता/उमेदवाराला याची विशेष प्रचिती येईल. कामाच्या गर्दीत भोजनाकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार नाही. त्यामुळे आहार कमी राहील. स्वभाव उदार राहील. बुद्धी तीव्र राहील.

स्त्रियांसाठी - द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतीराज खुश राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे फिरकणार नाही. शेजारीपाजारी हेवा करतील. सुशिक्षीत महिलांना विद्येच्या बळावर धनप्राप्ती होईल.

विद्यार्थ्यांसाठी - माता पिता, गुरूजन वर्ग, वृद्धांच्या बोलण्याला लेक्चरबाजी न समजता त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा. विशेषतः विद्येची आवड असणार्‍या मित्रांची निवड करावी म्हणजे अभ्यासात प्रगती होईल.

शुभ तारखा - 2, 4, 5, 8, 9, 10, 12, 14, 16, 17, 19, 24, 27, 30, 31

जानेवारी - 2023

महिन्याच्या सुरूवातीला राशीच्या द्वितीयस्थानी रवि-बुध, तृतीयात शुक्र- शनि-प्लूटो, चतुर्थात नेपच्यून, पंचमात गुरू, षष्ठात राहू-हर्शल, सप्तमात- मंगळ, व्ययात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

सप्तमात मंगळ आहे. कौटुंबिक सुखामध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. अविवाहीतांनी प्रेमविवाहाचया भानगडीत पडू नये. फसगत होण्याची शक्यता आहे. विवाहीतांनी घरातील कलह घरातच मिटवावे. व्यापार्‍यांनी सौदे पुढे ढकलावेत.

चतुर्थस्थानी शुक्र आहे. आनंदी वृत्ती राहील. आर्थिक आवक उत्तम राहील. न्यायीपणामुळे लोकप्रियतेत भर पडेल. आपल्या कार्यात प्राविण्य संपादन कराल. आकर्षक व मधुर बोलण्यामुळे घरात व बाहेर खेळीमेळीचे वातावरण राहील. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. मातेची सेवा कराल. वाहनसुख चांगले मिळेल. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार असल्यास हा महिना त्यासाठी फार चांगला आहे. राजकारणी लोकांना जनतेकडून सन्मान मिळेल.

तृतीयात शनी आहे. शत्रुपक्षामध्ये फाटाफूट पाडून त्यावर मात करण्यात यश मिळेल. अकल्पितपणे भाग्योदय होण्याचा योग आहे. सरकार दरबारी वजन वाढेल. पुत्र व गृह यांचे उत्तम सुख लाभेल. कामात एकाग्रता साध्य होईल. बौद्धिक कामात विशेष प्रगती होईल.

स्त्रियांसाठी -तृतीयात शुक्र आहे. नातेवाईक व शेजारी पाजार्‍यांशी संबंध चांगले राहतील. महिलांचा स्वभाव आनंदी व उल्हासी राहील. नीटनेटकेपणाने काम केल्याने मानसिक समाधान लाभेल. ललित कलांमध्ये प्रगती होईल.

विद्यार्थ्यांसाठी - तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना काव्य कल्पनात रस वाटेल. काहींना धाडसी खेळात भाग घेण्याची संधी मिळेल.

शुभ तारखा - 1, 4, 5, 9, 11, 12, 14, 15, 22, 28, 26, 27

फेब्रुवारी - 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशी धनस्थानी बुध, तृतीयात रवि-प्लूटो, चतुर्थात नेपच्यून-शुक्र-शनी, पंचमात गुरू, षष्ठात राहू-हर्षल, सप्तमात मंगळ, व्ययात केतू अशी ग्रहस्थिती आहे.

धनस्थानी बुध सांपत्तीक स्थिती प्राप्त करून देईल. कमीशन बेसीसवर चालणारे धंदे, सल्ला देणे, लेखन, प्रकाशन, यापासून उत्तम धनप्राप्ती होईल. धनसंग्रहास हा महिना चांगला आहे. बचत शक्य होईल. बचतीसाठी योग्य, सुरक्षित सरकारी बँका अथवा तत्सम वित्त संस्थामधूनच गुंतवणूक करणे शहाणपणाचे ठरेल. अभ्यास केल्यास वक्तृत्व कलेत उत्तम प्रगती होईल. व्यापारी वर्गाला हा महिना उलाढालीच्यादृष्टीने चांगला आहे.

पंचमस्थानातील गुरू हा स्वतंत्र भाग्ययोग आहे. वैभव प्राप्त होईल. विद्वत्तेचा नावलौकीक सर्वत्र होईल. सत्पुत्र सुख प्राप्त होईल. वाडवडिलांच्या पुण्याईने भाग्योदय होईल. संततीसुख चांगले राहील. लेखनाची आवड असल्यास उत्तम लेखन होईल. लोकशिक्षणात भाग घेण्याची संधी मिळेल. मोठ मोठ्या समारंभात सहभागी होण्याची संधी प्राप्त होईल. सट्ट्यासारख्या व्यवहार व व्यापारात भाग घ्यावासा वाटेल.

स्त्रियांसाठी - चतुर्थात शुक्र आहे. आनंदी वृत्ती प्रदान करील. कुटुंबात हुकूमाची राणी व्हाल. हातात पैसा खेळत राहील. मनासारखी शॉपिग कराल. पतीराजांची मर्जी बहाल होईल.

विद्यार्थ्यांसाठी- पंचमात गुरू आहे. विद्येतील प्रगतीसाठी तो अतिशय चांगला आहे. वाडवडिलांच्या पुण्याईने व आशिर्वादामुळे अभ्यासात मन एकाग्र होईल. टक्केवारी वाढविणे सोपे जाईल.

शुभ तारखा - 3, 4, 6, 7, 8, 10, 11, 14, 16, 17, 22, 24, 25, 28

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com