Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधआर्थिक आवक विपुल प्रमाणात

आर्थिक आवक विपुल प्रमाणात

सौ. वंदना अनिल दिवाणे

जानेवारी – 2023

- Advertisement -

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी नेपच्यून, द्वितीयात गुरू, तृतीयात राहू-हर्षल. चतुर्थात मंगळ, पंचमात केतू , लाभात रवि-बुध, व्ययात शुक्र-शनी-प्लुटो अशी ग्रहस्थितीे आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे गू,गो,गे, सा, सी, सू, से, सो, दा अशी आहेत.राशीचे चिन्ह हातात घट घेतलेला पुरूष असे आहे. राशी स्वामी शनि, तत्व -वायू,राशी स्वामी स्थिर असल्याने जीवनात कोणत्याही प्रकारचा बदल होणे आवडत नाही. रागाचा पारा जेवढ्या वर चढतो तेवढ्या वेगाने खाली येतो. पश्चिम दिशा फायद्याची आहे. राशीचे लिंग पुरूष, तमोगुणी स्वभाव, काहीसा क्रूर, त्रिदोष प्रकृती. राशीचा अंमल पायाच्या पोटर्‍यांवर आहे. पायाला इजा होणार नाही याची काळजी घ्या. शुभ रत्न – नीलम, शुभ रंग-आकाशी, निळा, काळा. देवता-शनी, हनुमान. शुभ अंक-8, शुभ तारखा- 8/13/26.

तृतीयातील हर्षल लेखक वर्गासाठी चांगला आहे. लेखनात सूर लागेल. नावलौकीक वाढेल. ग्रंथ प्रकाशनाच्या दृष्टीने हा महिना चांगला आहे. विचीत्र स्वभावाच्या लोकांपासून दुर रहावे अन्यथा नुकसान होईल.

व्ययातील प्लुटोने खर्चाचे प्रमाण काहीसे वाढविले तरी अध्यात्मात उत्तम प्रगती होऊन मानसिक शांतता मिळेल.

स्त्रियांसाठी – द्वादशात शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला. म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्‍या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्‍या महिलांसाठी त्रासदायक आहे.

विद्यार्थ्यांसाठी –विद्यार्थीदशा हा खरा तर जन्मभर चालविण्याचा वसा आहे. शरीरप्रकृती चांगली राहील. अभ्यासासाठी उत्साह टिकून राहील. काहीेंना सरकारी मदत मिळेल.

शुभ तारखा –1, 4, 5, 9, 11, 14, 15, 22, 24, 26, 27

फेब्रुवारी-2023

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी शुक्र- शनि-प्लूटो, द्वितीयात गुरू, तृतीयात राहू-हर्शल, चतुर्थात- मंगळ, नवमात केतू , लाभात -बुध, व्ययात रवि-प्लुटो अशी ग्रहस्थिती आहे.

तृतीयात राहू आहे. भांबावून टाकणार्‍या समस्यांची उत्तरे सापडतील. पराक्रमाला जोर येईल. शत्रुंची वाढती संख्या यशाचा बायप्रॉडक्ट आहे. ते सर्व नष्ट होईल. काही त्यांच्या कर्माने तर काही तुमच्या चातुर्य व पराक्रमाने. शास्त्रसंशोधनात तत्संबंधित लोकांना यश मिळेल. सौख्य उपभोगायला मिळेल. मोठमोठ्या उलाढालीमुळे व्यापार्‍यांच्या नफ्यात वाढ होईल. नोकरवर्गाला पदोन्नतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. भयमुक्त वातावरण तयार होईल. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना कृषी व गोधनापासून लाभ होईल. राहूसमोर असणारा केतू भाग्यस्थानी विराजमान आहे. राहू केतू अस्तित्वात नसताना न दिसणार्‍या हवेप्रमाणे मानवी जीवनावर चांगले वाईट परिणाम होतात. भाग्यातील केतू तळागाळातील लोकांच्या सहकार्याने जीवनाच्या नावेची प्रगतिपथाकडे गतीत वृद्धी करील. मात्र त्यासाठी वैध धनप्राप्तीचे पथ्य पाळावे लागेल.

धनस्थानी असलेला नेपच्यून धनप्राप्तीसाठी नवनवीन कल्पनांचे भांडार तुमच्यापुढे उघडे कराल. जनांचे लक्षही जाणार नाही अशा कल्पना सुचतील. त्या कृतीत आणल्याने उद्योगधंदे, ललितकला, कथालेखन, यापासून द्रव्यलाभ होतील.

स्त्रियांसाठी – लग्नी शुक्र आहे. सौंदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्‍या अर्थाने उपभोग घ्याल.

विद्यार्थ्यांसाठी – शरीरप्रकृती चांगली राहील त्यामुळे अभ्यासात उत्साह टिकून राहील. काहींना सरकारी मदत मिळेल. अभ्यास मंडळात सामील असलेले मित्र अभ्यासू व हुशार असतील.

शुभ तारखा – 3, 4, 6, 7, 8, 10, 11, 14, 16, 17, 22, 24, 25, 28

मार्च – 2023

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि-प्लुटो, द्वितीयात नेपच्यून-शुक्र-गुरू , तृतीयात राहू-हर्षल, चतुर्थात मंगळ, नवमात केतू, दशमात रवि, व्ययात प्लुटो अशी ग्रहस्थिती आहे.

द्वितीयातील गुरूमुळे विद्वत्तेत विशेष नावलौकीक होईल. अभ्यास केल्यास वक्तृत्वात यश मिळेल. केवळ शब्दाने हुकूमत गाजवता येईल. राजकारणी लोकांना याचा फायदा होईल. आर्थिक आवक विपुल प्रमाणात होईल. सुग्रास भोजन प्राप्त होईल. द्वितीयात गुरू असणे हा भाग्यवृद्धीचा योग आहे. नेहमी आनंदी वृत्ती राहील. कौटुंबिक सुख उत्तम राहील. स्वप्रयत्नाने धनप्राप्ती होईल.

तनुस्थानी असलेल्या शनीचा जिरेकादश योग होत आहे. तीक्ष्ण बुद्धीमुळे अभ्यासूवृत्ती राहील. उद्योगशीलतेत वृद्धी होईल. हिशेबीपणामुळे धनसंग्रह करणे जमेलच शिवाय बचत करणेही सोपे जाईल. प्रामणिकपणामुळे नोकरीत उन्नती होईल. भाविकपणामुळे जनमानसात चांगली छबी निर्माण होईल. स्वमत हट्टाचा जास्त आग्रह करू नये. स्वप्नांद्वारे पुढील घडणार्‍या घटनांची आगाऊ सूचना मिळेल.

स्त्रियांसाठी -द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल.

विद्यार्थ्यांसाठी-विज्ञान व कला शाखा दोन्हीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. प्रवास करणे टाळावे. मित्रमंडळी सिमीत ठेवा. तूर्त खेळाकडे दुर्लक्ष करणे चांगले. प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभ तारखा – 1, 4, 5, 8, 9, 11, 16, 17, 22, 23, 27, 28, 29, 30, 31

- Advertisment -

ताज्या बातम्या