Wednesday, April 24, 2024
Homeभविष्यवेधतंतोतंत ‘भविष्यवेध’

तंतोतंत ‘भविष्यवेध’

17 जानेवारी 2019…तब्बल 2 वर्षे 3 महिने आधीची तारीख. याच तारखेला ‘भविष्यवेध’मध्ये ‘राजयोग’ या सदरात ममता बॅनर्जी यांचे कुंडली भविष्य प्रकाशित झाले.

दावा होता, ‘2026 पर्यंत त्यांच्या राजकीय खुर्चीला कोणीही धक्का लावू शकत नाही.’ आज 6 मे 2021. चार दिवसांपूर्वी, 2 मे रोजी पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममतादीदींनी आपल्या पक्षाला, तृणमुल काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळवून दिले.

- Advertisement -

काल त्यांनी तिसर्‍यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. ‘टोकाचे प्रयत्न झाले तरी त्यांचे आसन कोणीही डळमळीत करू शकत नाही.’ असे ठाम भाकीत त्या भविष्यलेखात होते. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने त्यांना सत्तेतून घालविण्यासाठी टोकाचे प्रयत्न केले.

सर्व आयुधांचा यथेच्छ वापर केला. तरी त्यांना सत्तेतून खाली खेचण्यात अपयश आले. थोडक्यात दोन वर्षापूर्वी ‘भविष्यवेध’ने वर्तविलेले भविष्य तंतोतंत प्रत्यक्षात उतरले. अर्थात हे पहिल्यांदाच घडलेले नाही.

‘महाराष्ट्रात शरद पवार यांच्या शब्दाशिवाय सरकारच बनणार नाही’…‘भाजपाने कितीही झुलवले तरी सत्तेच्या चाव्या उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार’…आणि ‘देवेंद्र फडणवीस हे आगामी निवडणुकीनंतर मीच मुख्यमंत्री असे सांगत असले तरी तसे होणे नाही’ असा अंदाज ‘भविष्यवेध’ने 2018 मध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात वर्तविला होता. त्यावेळी देशातील आणि राज्यातील राजकीय स्थिती पूर्णत: वेगळी होती. मात्र तसे घडत गेले. गंमत म्हणजे ‘महाराष्ट्रात खिचडी सरकार होण्याची शक्यता अधिक आहे.’ असा अंदाजही 25 ऑक्टोबर 2018 च्या लेखात प्रसिद्ध झाला. पुढे काय घडले हे महाराष्ट्राने पाहिलेच. पश्चिम बंगालमधील ताज्या राजकारणाने ’भविष्यवेध’च्या अचूकतेवर पुन्हा शिक्कामोर्तब केले.

देशदूत-सार्वमत वृत्तपत्र समूहाकडून प्रकाशित होणार्‍या ‘भविष्यवेध’ या पत्रिकेचे 18 ऑक्टोबर 2018 रोजी रिलॉचिंग झाले. नव्या रूपात ही पत्रिका वाचकांच्या भेटीला आली. कुंडली, भविष्य, वास्तू, अध्यात्म, योग अशा विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी, हे या पत्रिकेचे वैशिष्ट्य! याच ‘भविष्यवेध’मध्ये देशातील राजकारणी, उद्योगपती, खेळाडू आणि चित्रपट कलावंत अशा ‘सेलिब्रिटीं’च्या भविष्याचा वेध ‘राजयोग’ या सदरातून सुरू झाला. ज्योतिषशास्त्राचे गाढे अभ्यासक, ज्योतिष महामहोपाध्यात डॉ.गोपालकृष्ण रत्नपारखी यांनी या सेलिब्रिटींच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून भविष्याची मांडणी केली. यात पहिले व्यक्तिमत्व होते शरद पवार!

18 ऑक्टोबर 2018 रोजी रिलाँच झालेल्या ‘भविष्यवेध’च्या पहिल्याच अंकात त्यांचे भविष्य ‘राजयोग’ या सदरात प्रकाशित झाले. देशात 17 वी लोकसभा निवडणूक एप्रिल-मे 2019 या काळात झाली.

तत्पूर्वी 6 महिन्यांआधीचा हा काळ. देशभर भाजपचा डंका होता. राज्यात तर विरोधकांची सळो की पळो अशी स्थिती होती. सत्तेशिवाय ज्यांना जमत नाही, अशा सर्वांना भाजपमध्ये डेरेदाखल होण्याची घाई होती. पुढे तर भाजपत प्रवेश करणार्‍यांची रिघच लागली. 2019 मध्ये लोकसभा निवडणुका सुरू झाल्यावर आणि संपल्पावर तर राज्यात विरोधी पक्षच शिल्लक राहणार नाही, अशाही राजकीय गंमती सुरू झाल्या होत्या.

अपघाताने राजकीय लाटेत उगवलेल्या काहीं नेत्यांनी तर शरद पवार संपले अशी हाकाटी देेणे सुरू केले होते. ही उजळणी यासाठी की, याही स्थितीत महाराष्ट्राच्या राजकारणात ‘हम करे सो..वोही मुख्यमंत्री’ असे भविष्य शरद पवार यांच्याबाबत ‘भविष्यवेध’ने वर्तविले.

लेखाची सुरूवातच मुळी ‘राज्यातील राजसत्तेच्या चाव्या हाती राहतील असे स्टार पवारांच्या जन्मकुंडलीत दडले आहेत’ या वाक्याने झाली होती. देशातील महान राजकीय नेत्यांपैकी एक अटलबिहारी वाजपेयी आणि शरद पवार यांच्या जन्मकुंडलीत एक साम्य, त्यांच्याबाबत गैरसमज पसरविणारे ग्रह अशा सर्व बाबींची मांडणी या भविष्यलेखात होती.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शरद पवारच ठरविणार, हे भविष्य पुढे 2019च्या शेवटी खरे ठरले. ‘काही जवळचे नेते इतर पक्षात पळाले तरी त्यांना पायकूट कसा घालायचा याची कला पवारांकडे आहे.’ हा अंदाजही वर्तविला होता.

भाजपत जावूनही पराभूत झालेले नेते आणि भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही पुन्हा परतलेले अजित पवार, या उदाहरणांनी हे भविष्यही खरे ठरले.

भविष्यवेधच्या दुसर्‍या अंकात, 25 ऑक्टोबर 2018 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘राजयोग’ प्रकाशित झाला. राज्यातील ताकदीचे नेते म्हणून फडणवीस यांचा उल्लेख केला जात असे. केंद्रातून समर्थन आणि राज्याच्या सत्ता ताब्यात अशी स्थिती असल्याने फडणवीस यांची घोडदौड वेगात होती.

मात्र त्यांच्या कुंडलीचा अभ्यास करताना त्यांना राज्याचा मुख्यमंत्री होण्याचे योग नाहीत, असे ग्रहांचा अभ्यास दर्शवित होता. मागील निवडणुकीइतका, म्हणजे 2014 च्या विधानसभा निवडणुकीएवढा 2019चा राजकीय प्रवास सोपा नसेल.

2019 नंतर त्यांना यशासाठी झगडावे लागणार आणि 2026 पर्यंत ही स्थिती अशी राहणार, असे भविष्य वर्तविले. महाराष्ट्रात खिचडी सरकार येणार आणि फडणवीस केंद्रात जाणार, हा अंदाजही त्यांच्याच लेखात मांडलेला. राज्यात खिचडी सरकारच तर आले आहे. आता फडणवीस केंद्रात जाणार का, हे पहायचे.

विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ‘राजयोग’ 8 नोव्हेंबर 2018 रोजी प्रकाशित झाला. ते मुख्यमंत्रीपदापर्यंत जाणार, असे संकेत या लेखातून दिले होते. ‘भाजपने कितीही झुलवले तरी सत्तेच्या चाव्या उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार’ असा ठाम दावा केला होता, तो तंतोतंत खरा ठरला.

आज मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या सत्तेच्या चाव्यात त्यांच्या हाती आहेत आणि यासाठी मदतीला आले शरद पवार. त्यांच्या जीवनात अचानक गूढ व लाभाचे योग आहेत. ‘बाळासाहेबांप्रमाणेच त्यांची संघटनेवर कमांड राहणार आहे.

राजकारणात पुढील कालखंडात यश त्यांच्या दाराशी येणार आहे. 15 डिसेंबर 2028 पर्यंत त्यांना कोणीही अडवू शकत नाही.’ असे भविष्य या लेखात वर्तविण्यात आले आहे. राज्यातील विरोधकांकडून वारंवार ठाकरे सरकार पडणार म्हणून राजकीय भविष्य वर्तविले जाते, त्या पार्श्वभुमिवर हा दावाही जोखता येईल.

वक्री असलेल्या बुधामुळे स्वत:ची मते स्पष्टपणे मांडण्याचा स्वभाव आहे. तरी सर्वांना बरोबर घेवून जाण्याची कला त्यांच्या अंगी आहे, असा उल्लेख त्यांच्याबाबत भविष्यलेखात केला आहे.

आता पश्चिम बंगाल आणि ममतादीदी, ज्यामुळे आपण या नेत्यांच्या भविष्यांना उजळण दिली. 17 जानेवारी 2019 रोजी त्यांचे भविष्य ‘राजयोग’ या सदरात प्रसिद्ध झाले. ‘ममतादीदींच्या पराभवासाठी भाजपने कंबर कसली आहे. मात्र कुंडलीतील ग्रह ममतादीदींच्या बाजूने झुकलेले दिसतात. 2026 पर्यंत त्यांचे आसन टोकाचे प्रयत्न करूनही कोणीही डळमळीत करू शकत नाही, असे योग आहेत.’

असे राजकीय भविष्य त्यांच्याबाबत वर्तविले होते. दोन महिने देशात पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांशिवाय अन्य काहीही महत्त्वाचे नाही, असा माहोल उभा करण्यात आला होता. केंद्रातील सत्ताधारी पक्षापासून टिव्ही मिडियापर्यंत सर्वत्र याच विषयाची चर्चा होती.

करोनाच्या विळख्यातील माणसांचे जीवही या राजकीय महत्वाकांक्षेपुढे कचपट ठरविल्यासारखी स्थिती होती. एकीकडे देशात करोनाची लाट उसळत असताना तिकडे पश्चिम बंगालमध्ये राजकीय प्रचारसभांच्या लाटा उसळत होत्या. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने ममतादीदी आणि तृणमुल काँग्रेसला सत्तेतून घालविण्यासाठी घेतलेली ‘मेहनत’ आणि केलेले ‘प्रचंड प्रयत्न’ सध्या देशातील चर्चेचा विषय आहे.

मात्र या स्थितीतही ममतादीदींच्या नेतृत्वात तृणमुल काँग्रेसने मोठ्या बहुमतासह यश मिळविले. 17 ऑगस्ट 2026 या तारखेपर्यंत ममतादीदींचे आसन डळमळीत होण्याचे योग नाहीत, असे त्यांचे ग्रह आहेत. त्यामुळे त्यांच्या पुढील विधानसभा निवडणुकीत यशासाठी पुन्हा प्रयत्न करता येतील.

राजकीय यश-अपयशात अर्थातच अनेक घटक कारणीभूत असतात. कार्यकर्त्यांचे जाळे, मतदारांवरील प्रभाव, नेत्यांचे कतृत्व आणि पक्षाची संपन्नताही… हे घटक दुर्लक्षून चालणार नाही. मात्र ‘राजकीय योग’ याची मोठ्या प्रमाणावर नेहमीच चर्चा असते. तोच प्रयत्न ‘भविष्यवेध’ने ‘राजयोग’च्या माध्यमातून कुंडली अभ्यासाने केला. त्यातून काही भाकिते वर्तविली, ती तंतोतंत जुळली. देश आणि राज्य गाजविणार्‍या अनेक नेत्यांच्या भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न ‘राजयोग’च्या माध्यमातून झाला. त्याबद्दल पुन्हा कधी…!

- Advertisment -

ताज्या बातम्या