नवरात्री नवविधा भक्ती अंबेची

नवरात्री नवविधा भक्ती  अंबेची

वर्षभरात नवरात्री तर तीन वेळा साजरी करण्यता येते. पण शारदीय नवरात्रीला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरंतर आषाढ महिन्यापासून ते कार्तिक महिन्यापर्यंत चार महिने अर्थात चतुर्मासात आपल्याकडे अनेक व्रत आणि सण साजरे होत असतात. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीदरम्यान आपल्याकडे शारदीय नवरात्रौत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी नवरात्रौत्सव सुरू होत आहे. घटस्थापना आहे 7 ऑक्टोबर, 2021 रोजी आणि दसरा अर्थात विजयादशमी आहे 15 ऑक्टोबर, 2021 रोजी. नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येते. तर काही जण नवरात्रोत्सवात नऊ दिवस उपवास करतात. हे नऊ दिवस अत्यंत

शुभ मानले जातात. त्याशिवाय या नऊ दिवसात नऊ रंगाचे कपडेही परिधान करण्यात येतात. नवरात्रीच्या शुभेच्छा ही देण्यात येतात. या दिवसांचे नक्की महत्त्व काय आणि नवरात्र कधीपासून साजरे करण्यात येऊ लागले, याचा नक्की पौराणिक संदर्भ काय या सर्वांची इत्यंभूत नवरात्रीची माहिती खास तुमच्यासाठी.

नवरात्रीचे महत्त्व -

आपल्याकडे वर्षभरात चार नवरात्री साजर्‍या करण्यात येतात. यापैकी दोन गुप्त नवरात्र असून चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. देवीचे नामस्मरण करणे, उपासना करणे आणि जप करणे या सर्व पुण्यवान गोष्टींसाठी हे नऊ दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक मानण्यात आले आहेत. असुरी शक्तीचा नाश करून चांगल्या शक्ती आणि लाभदायक गोष्टींसाठी का चांगला कालवधी मानण्यात येतो. अनादी काळापासून हा उत्सव साजरा करण्यता येतो. सुरुवातीला पावसाळ्यात पेरण्यात आलेले पीक हे पहिल्यांदा घरात येण्याचा हा काळ होता. त्यामुळे शेतकरी या उत्सव अत्यंत प्रेमाने साजरा करत होते. पण नंतर या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आणि हा उत्सव उपासनेचा एक उत्सव झाला. दरम्यान या काळात महाराष्ट्रातील शक्तिपीठांनाही महत्त्व प्राप्त झाले. या काळात या देवींचे दर्शन घेण्यसाठीही मोठ्या संख्येने भक्त जातात. देवी दुर्गेला समर्पित करण्यात आलेला हा उत्सव आहे. संस्कृत मध्ये नऊ रात्री असा याचा अर्थ होतो. नऊ दिवस क्रमाने 9 वेगवेगळ्या देवींची पूजाअर्चा करण्यात येते. तर दहाव्या दिवशी रावणदहन अर्थात विजयादशमी म्हणून हा सण साजरा करण्यात येतो. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानण्यात आल्याने या दिवसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

नवरात्रीची माहिती -

शारदीय नवरात्रौत्सवामध्ये नऊ दिवस वेगवेगळ्या नऊ देवींच्या रूपांची पूजाअर्चना करण्यात येते. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी, दुसरा दिवस असतो तो ब्रम्हचारिणी देवीचा, तिसरा दिवस चंद्रघटा देवीचा मानण्यात येतो तर चौथा दिवस कुष्मांडा देवीची पूजा करण्यात येते. पाचवा दिवस स्कंदमाता देवी, सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा, सातवा दिवस हा कालरात्री देवीसाठी, आठव्या दिवशी महागौरी देवी आणि नववा दिवस हा सिद्धिदात्री देवीच्या पूजनाचा दिवस मानला जातो. पहिल्या दिवशी घटस्थापना करून विधीनुसार पूजा करण्यत येते. मात्र ही नवरात्र कशी सुरू झाली हे आपण आधी जाणून घेऊया.

नवरात्रीची पौराणिक कथा

नवरात्र नक्की कसे साजरे करण्यात येऊ लागले याच्या दोन पौराणिक कथा अगदी पूर्वपरंपरागत सांगण्यात येतात. त्यातील पहिल्या पौराणिक कथेप्रमाणे महिषासुर नावाचा एक दैत्य ब्रम्हदेवाचा भक्त होता. त्याने ब्रम्हदेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून वरदान मागून घेतले. पृथ्वीवर राहणारा कोणताही मानव अथवा देव अथवा दानव यापैकी कोणीही आपल्याला मारू शकणार नाही असे वरदान त्याला ब्रम्हदेवाने दिले. पण हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुर माजला आणि त्याने पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळावर हाहाःकार माजवायला सुरूवात केली. त्याची दहशत सगळीकडे पसरू लागली. त्याचा वध करण्यासाठी ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांनी दुर्गेला साकडे घातले. नऊ दिवस दुर्गा देवीने महिषासुराशी लढून त्याचा दहाव्या दिवशी वध केला. म्हणूनच तिला महिषासुर मर्दिनी असेही म्हणतात. यानंतरच वाईट कृत्यावर चांगल्याचा विजय म्हणून विजयादशमी साजरी करण्यात येते. नऊ दिवस देवीने दिलेला लढा आणि वाईट गोष्टींंशी लढा देण्यासाठीच नवरात्रौत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली असे पुराणात सांगितले जाते.

तर दुसर्‍या पौराणिक कथेनुसार, श्रीराम यांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी आणि आपल्याला रावणावर विजय मिळवता यावा यासाठी भगवती देवीची आराधना केली होती. नऊ दिवस देवीची पूजा, आराधना आणि नामस्मरण करून देवीला प्रसन्न करून घेतले होतो. त्यानंतर देवीने लंकाविजयचा आशीर्वाद दिला असे सांगण्यात येते. तर दहाव्या दिवशी रामाने रावणाचा वध करून लंकेवर विजय प्राप्त केला. नवरात्र माहिती मराठीत जाणून घेणेही गरजेचे आहे.

नवरात्रौत्सवातील पूजा विधी

आपल्या कुळाचाराप्रमाणे घरात घटस्थापना करण्यात येते. पहिल्या तीन दिवसात दुर्गेची पूजा करण्यात येते. ऊर्जा आणि शक्तीची देवता म्हणून दुर्गेची पूजा या दिवसांमध्ये करण्यात येते. फळं, फुलं, आरती आणि भजन स्वरूपात ही पूजा करण्यात येते. नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करण्यात येते. तर देवीला वेगवेगळ्या नऊ रंगांचे वस्त्र नऊ दिवस परिधान करण्यात येते.

यामध्ये कुमारिका पूजन, पार्वती पूजन, सरस्वती पूजन आणि काली पूजनही करण्यात येते. पहिल्याच दिवशी एका टोपलीत माती घेऊन त्यात नऊ प्रकारचे धान्य पुरण्यात येते. दहा दिवस घटाच्या बाजूला हे ठेवण्यात येते. टोपलीच्या मधोमध मातीचा घट ठेवण्यात येतो आणि त्याचीही पूजा करण्यात येते. प्रत्येक दिवशी या घटावर एक माळ चढविण्यात येते. पूजेमध्ये पाच प्रकारची फळे असतात आणि ही माळ रोज नऊ दिवस वेगवेगळी चढवली जाते. तर सकाळी संध्याकाळी धूप - दीप - आरती आणि देवीला नेवैद्य दाखवून देवीची पूजा करण्यात येते. हा दिवस सतत या घटाजवळ दिवा तेवत ठेवला जातो. कुमारिकांमध्ये दुर्गेचे रूप असते असे मानण्यात येते. नऊ कुमारिकांचे त्यांचे पाय धुऊन आणि त्यांच्या आवडीचे जेवण देऊन पूजन करण्यात येते. तर त्यांना भेटवस्तूही दिल्या जातात.

अनेक ठिकाणी अष्टमीच्या दिवशी होमहवन करून सर्व गोष्टी पवित्र करण्यासाठी पूजा करण्यात येते. तर नऊ दिवस भोंडला खेळून देवीचा जागरही केला जातो.

Related Stories

No stories found.