पवार - ठाकरे मोदींना देणार टक्कर ?

लोकसभा 2024 : राजयोग
पवार - ठाकरे मोदींना देणार टक्कर ?

डॉ. गोपालकृष्ण रत्नपारखी,ज्योतिष महामहोपाध्याय 9860038072

2004 च्या लोकसभा निवडणुकीतील यश आणि पंतप्रधान पदाची संधी या विषयावर आपण ज्योतिषशास्त्रीय आधाराने मांडणी करत आहोत. आतापर्यंत आपण विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रबळ स्थितीचा अंदाज घेतला.

त्यासोबत सोनिया गांधी पक्षाला पुन्हा उभारी देतील, याचाही अंदाज घेतला. विरोधातील सर्व नेत्यांच्या कुंडलीचा अभ्यास केल्यावर मोदींना टक्कर देणारी ग्रहस्थिती कोणाची, असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचे उत्तर म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संयुक्त ग्रहस्थिती असे देता येईल.

2024 मध्ये हेच दोघे देशात मोदींच्या प्रभावाला टक्कर देताना दिसतील. आताच तसे म्हणणे धाडसाचे असले तरी त्यांच्या कुंडलीतील ग्रहस्थिती तसे स्पष्ट संकेत देत आहे.

2024 च्या निवडणुकीत विद्यमान सत्ताधार्‍यांचे सुकाणू नरेंद्र मोदी, अमित शहा आणि नितीन गडकरी या नेत्यांच्या हाती असेल तर विरोधकांकडून पवार-ठाकरे या जोडीच्या मदतीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सक्रीय असतील. विशेषत: सबुरीने घेतल्यास ममता बॅनर्जी लोकसभा 2024 निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी पार पाडताना दिसतील.

पंतप्रधान मोदी यांनी नीचस्थ चंद्राची महादशा 27 नोव्हेंबर 2021 रोजी संपणार असल्याने मानसिक त्रास व अडचणींना उतार असेल. वृश्चिकेच्या मंगळाची महादशा 27 नोव्हेंबर 2028 पर्यंत असल्याने यशाचे प्रमाण बर्‍यापैकी कायम राहण्याचे योग आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे यांची ग्रहस्थिती बर्‍यापैकी मोदींशी साम्य राखून आहे.

मात्र ग्रहस्थिती व व्यक्तिमत्त्व यांचा विचार करता ठाकरे यांना मदतीसाठी शरद पवारांच्या राजकीय आणि ग्रहस्थितीची गरज भासेल. ठाकरे यांच्या ग्रहस्थितीचा विचार करता 29 मार्च 2019 पासून यशाची कमान उंचावत आहे. मोदी यांच्याप्रमाणे डिसेंबर 2028 पर्यंत ही ग्रहस्थिती काही चढउतार वगळता उत्तमच राहणार आहे. या दोघांचे वैशिष्ट्य असे की दोघेही मुख्यमंत्री पदावर ध्यानीमनी नसताना, राजकीय परिस्थिती तयार झाल्याने पोहचले. हा योगायोग पंतप्रधानपदाच्या बाबतीतही घडण्याची शक्यता आहे. मात्र मोदींइतके सहज यश ठाकरेंना नक्कीच मिळणार नाही.

शरद पवारांनी विरोधकांची योग्य मोट बांधल्यास आणि विशेषत: त्यांना प्रकृतीने साथ दिल्यास भारताच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्राला 2024 नंतर एकाच वेळी दोन सर्वोच्च पदे लाभू शकतात. तसे संकेत आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करता 19 ऑगस्ट 2023 पर्यंतचा कालखंड अत्यंत खडतर राहील. 19 ऑगस्ट 2023 नंतर मात्र महाराष्ट्रासाठी समाधानकारक कालखंड राहिल. निवडणुकीतील यशाच्यादृष्टीने विचार करता पवार-ठाकरे यांना काही खबरदारी घ्यावी लागेल. तसेच काही उपाययोजनाही करणे लाभदायक राहील. महाराष्ट्र सरकार व मुख्यमंत्री ठाकरे यांच्या ग्रहस्थितीचा विचार करता 15 ऑगस्ट 2021 ते 11 ऑक्टोबर 2021 किंवा 3 मार्च 2022 ते 29 एप्रिल 2022 या काळात सत्तेच्या काही उलथापालथी संभवतात. याला सत्ताबदल म्हणा किंवा सत्ता उलथवणे, असा काही प्रकार घडला तर लोकसभा 2024 साठी विरोधकांचा मार्ग अधिक खडतर होतील. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकीचे योग संभवत नाहीत.

मुख्यमंत्री ठाकरे केंद्रातील सरकारच्या विरोधात उभे राहिल्यास त्यांची राजकीय ताकत निश्चितच वाढणार आहे. मात्र त्यांनीच केंद्रातील पक्षाशी युतीचा विचार केल्यास देशातील विरोधकांचे मनसुबे कोसळलेच म्हणून समजा!

मोदी यांच्या पंतप्रधानपदावर 2024 नंतरही गंडांतर येणे सहजसोपे नाही. काही अचानक बदल घडल्यास भाजपाकडून नितीन गडकरी यांच्या पत्रिकेत अचानक संधीचे योग आहेत. सोनिया गांधी यांच्या पत्रिकेत केवळ पक्षाला उभारी देण्याचे योग आहेत. पक्षाला उभारी किंवा देशातील पदाच्या बाबतीत दूषित पत्रिकेमुळे राहुल गांधीच्या अपयशाचा सिलसिला लवकर संपणारा नाही. उद्धव ठकरे यांच्या कुंडलीत लोकनायक म्हणून विराजमान होण्याचे योग आहेत. तर कुंडलीतील योगांनुसार अपयश मागे सोडून पुढे निघालेल्या पवारांना सर्वोच्च सन्मानाचे योग आहेत. हा सन्मान नेमका कोणत्या पदाचा असेल, हे तीन वर्षात स्पष्ट होईलच!

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com