करीना...अभिनयाचा जन्मजात वारसा

करीना...अभिनयाचा जन्मजात वारसा

करीना कपूर खान यांचा जन्म 21 सप्टेंबर 1980 रोजी झाला. हिंदी चित्रपटसृष्टी गाजविणारी ही अभिनेत्री. सुप्रसिद्ध अभिनेते रणधीर कपूर आणि बबिता यांची कन्या. रूपेरी पडदा गाजविणारी अभिनेत्री करिश्मा कपूरची धाकटी बहीण. पडद्यावर अनेक छटांची पात्रे जीवंत करणारी अभिनेत्री म्हणूनही करीनाची ओळख. 6 फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार ही त्याचीच साक्ष. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्रींच्या यादीत समावेश होतो, तो यामुळेच!

चित्रपटाची कौटुंबिक पार्श्वभूमी असूनही, वडिलांनी करीनाला चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यास नकार दिला होता. यामुळे वडील रणधीर कपूर यांच्यासोबत अनेकदा बेबनावाचा सामना करावा लागला. करीना यांच्या बाजूने आई बाबिता उभ्या होत्या. अभिनयात करिअर करायचे या एकमेव कारणस्तव आई बबितासोबत वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. राकेश रोशन यांच्या कहो ना...प्यार है हा चित्रपट करीनाचा पहिला चित्रपट ठरला असता. मात्र तीने हा चित्रपट मध्येच सोडून दिला. हृतिक रोशन या चित्रपटाचा नायक होता. दिग्दर्शकाचा पुत्र म्हणून त्यालाच अधिक महत्त्व मिळेल, या कारणास्तव तीने चित्रपट सोडला. पुढे जे.पी. दत्ता यांच्या रेफ्युजी या चित्रपटातून अभिषेक बच्चनसोबत तीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. करीनाचे वर्णन नैसर्गिक कलाकार म्हणूनही केले जाते.

सहजतेने कठीण प्रसंग साकारण्याचे कौशल्य तिच्याकडे आहे, हे पहिल्या चित्रपटातून तीने सिद्ध केले. रेफ्युजी ह्या चित्रपटास बॉक्स ऑफिसवर मध्यम स्वरूपाचे यश मिळाले. मात्र करीनाने अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. त्यानंतर तीने आजपर्यंत मागे वळून पहिले नाही. अभिनेता शाहिद कपूरसोबतचे तीचे प्रेमप्रकरण खूप गाजले. पुढे हे प्रेमसंबंध संपुष्टात आले.

पुढे करीनाचे अभिनेता सैफ अली खानशी प्रेम जुळले. सैफशी लग्नानंतर भारतातील सेलेब्रिटी जोडी म्हणून या दोघांचे नाव आजही आघाडीवर आहे. अभिनयासोबतच तीने फॅशन डिझायनर म्हणूनही करिअर बनवले आहे. ग्लोब या कपड्याच्या निर्मिती कंपनीसोबत 5 वर्षे काम केल्यानंतर तीने महिलांसाठी कपड्यांची श्रुंखला सुरू केली. फॅशनेबल कपडे निर्मिती क्षेत्रात उतरणार्‍या त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री आहेत. करीनाने मुलांचे शिक्षण आणि महिलांच्या सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध सामाजिक कार्यात सहभागी आहेत.

डावा हात - डाव्या हातावरील रेषा विविध गुणांच्या व संचिताचा रेषा असतात. डाव्या हातावरील रेषांमध्ये बदल होत नाही. मात्र सक्रिय हात म्हणजे उजव्या हातावरील रेषांमध्ये व्यक्तीच्या कर्मानुसार चांगल्या वाईट कामानुसार, आजार, व्यसन, लबाडी, प्रयत्न, सत्कर्मानुसार सुक्ष्म शुभ अशुभ बदल होत असतात. करीना यांच्या डाव्या हाताचे संचित व भाग्य पाहताना त्यांना वाडवडिलांकडून आलेले अभिनयाचे गुण आढळतात. आजोबा पृथ्वीराज कपूर यांच्यापासून कपूर घराणे हे चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. त्यामुळे अंगभूत गुण व अभिनय कलेचा प्रभाव संचिताचा हातात पाहावयास मिळतो. या चंद्र ग्रहाने करीनाला अभिनयाचे गुण दिले आहेत. चंद्र ग्रहावरून मनगटापासून उगम पावलेली एक स्वतंत्र रेषा मस्तक रेषेत विलीन झालेली आहे.

हीच रेषा अभिनयाच्या कौशल्याची कारक आहे. खूप अभिनेत्री आल्या व गेल्या, मात्र करीनाने वीस वर्षांपासून चित्रपटसृष्टीत आपले स्थान अबाधित राखले. विविध आव्हानात्मक भूमिका वठविल्या. त्या गाजल्या व अभिनयाचे पुरस्कारही मिळाले. चंद्र ग्रह म्हणजे मनाचा कारक, कल्पना विस्तार व मानसिकता, आपल्या आवडते काम मिळाले की व्यक्ती तन मन एक करून ध्येयाने प्रेरित होत. विविध प्रकारच्या बहू आयामी भूमिकेत समरस होऊन अभिनय करण्याची ताकद चंद्र ग्रह देतो.

मस्तक रेषा सुद्धा चंद्र ग्रहावर खाली उतरलेली. त्यामुळे अभिनय करताना विविध भावना विश्वात रमून जिवंत अभिनय साकारण्याची ताकद प्रदान झाली आहे. शुक्र ग्रहापेक्षा चंद्र ग्रह मनगटाकडे खाली जास्त उतरला आहे. तो आत्यंतिक हुशारी प्रदान करतो. एखादी कृती किंवा गोष्ट त्वरित आत्मसात करण्यात या खाली सरकलेल्या चंद्र ग्रहांमुळे लाभते. हृदय रेषेचा उगम गुरु ग्रहावरून होत असल्याने करीना मनाची दिलदार व मनमोकळ्या स्वभावाची आहे. आयुष्य रेषा ठणठणीत असल्याने निरोगी व उत्साही आहे. हाताची बोटे लांबीला छोटी आहेत. त्या प्रमाणात तळहात मोठा आहे.

त्यामुळे निर्णय क्षमता जलद आहे. मागचा पुढचा विचार न करता निर्णय घेण्याची प्रवृत्ती आहे. करंगळी स्वतंत्र असल्याने स्वतःचे काही मते आहेत. त्यावर ठाम आहे. बुधाचे बोट म्हणजेच करंगळी व बुध ग्रह शुभ आहेत. त्यामुळे अंगी व्यावसायिकता आहे. सर्व बोटे व त्यांची पेरे सामुद्रिक शास्त्रानुसार प्रमाणात आहेत. फक्त रवीचे बोट म्हणजे तिसरे बोट लांबीला मोठे आहे. त्यामुळे कायम प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची मानसिकता आहे. बुध रेषेचा उगम आयुष्य रेषेतून होत आहे. ही रेषा थेट बुध ग्रहावर पोहोचल्याने कोणाकडून कसे काम करून घ्यायचे व स्वतःला कायम आघाडीवर ठेवण्यासाठीच्या सर्व युक्त्या उपजत आहेत. अंगठा फारसा मजबूत व प्रभावी नाही. त्यामुळे निर्णयक्षमतेत त्या कमी पडतात. कायम कोणाच्या तरी अधिपत्याखाली राहण्याची प्रवृत्ती आहे.

उजवा हात- हाताचा फोटो करंगळीच्या बाजूने असल्याने चंद्र, वरचा मंगळ व बुध ग्रह यांची हातावरील शुभता पाहताक्षणी लक्षात येणारी आहे. तीनही ग्रह स्वच्छ व प्रमाणशीर उभार घेतलेले आहेत. त्यामुळे बुध, मंगळ व चंद्र ग्रहांची कृपा आहे. हातावरीर विवाह रेषा उत्तम आहे. त्यामुळे वैवाहिक सुख भरपूर आहे. रवी व भाग्य रेषा सरळ बारीक व चमकदार आहेत. त्यामुळे भाग्यशाली आहेत. करीना यांच्या जीवनात ऐश्वर्य, समृद्धी, मानसन्मान व प्रसिद्धी आहे. हातावरील अंगठ्याचे पहिले पेर उत्तम आहे. मात्र दुसरे आखूड आहे. पहिल्या पेर्‍यामुळे कल्पनाशक्ती व कल्पना विलास प्रचंड आहे.

दुसरे पेर आखूड असल्याने सर्व निर्णयात घाई होते मन स्थिर राहत नाही. त्यामुळे घाईने व चुकीचे निर्णय घेतले जातात. हाताचा पंजा उभट व नाजूक आहे. तसेच सर्व बोटे नाजूक असून त्या बोटांच्या पेर्‍यांमध्ये सांधे नाहीत. त्यामुळे हे लोक दुसर्‍याच्या विचारांच्या अधिपत्याखाली असतात. स्वतःची निर्णय क्षमता कमी असते निर्णय घेतला तरी तो घाईने घेतला जातो. त्यावर विचार मंथन नसते.

हात मजबूत असता व अंगठा मोठा असता निर्णय क्षमता स्वयंभू असते. कुठलेही आयुष्यातील निर्णय स्वतःचे असतात व ते विचारपूर्वक घेतले जातात. करीना यांच्यात प्रतिभा असल्याने त्या यशाच्या शिखरावर आहेत. जवळजवळ दुप्पट वयाच्या माणसाशी लग्न बंधनात जाताना त्यांनी कुठलाही विचार न करता लग्नाचा निर्णय घेतला. कदाचित त्या प्रेमभावनेत अडकून विवाहाला तयार झाल्या. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून करीना आजही प्रेक्षकांची लाडकी आहे, यात कोणतीही शंका नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com