कर्दळीवन श्री. दत्तात्रयांचे जागृत तपस्थान

कर्दळीवन श्री. दत्तात्रयांचे जागृत तपस्थान

कर्दळीवन (Kardalivan) परिसरात प्रवेश केल्याबरोबरच तेथील दिव्यत्वाची अनुभूती तत्काळ येते. तेथे प्रवेश केल्याबरोबर आपले अष्टसात्त्विक-भाव जागृत होतात. शरीरातील सुप्त आध्यात्मिक शक्ती जागृत होतात. महाराष्ट्रभर कर्दळीवन (Kardalivan) म्हणून हे ओळखले जाते तर आंध्र-कर्नाटकात मकदलीवन किंवा मकाडलीवन असे म्हटले जाते. कर्दळीवन या नावाचा आणि कर्दळीच्या झाडाचा काहीही संबंध नाही.

कर्दळीवन (Kardalivan)परिक्रमा करण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे श्रीशैल्यम येथे जाऊन तेथून होडीने किंवा यांत्रिक बोटीने 24 कि.मी.चा प्रवास करून व्यंकटेश किनारी जाणे आणि तेथून कर्दळीवनात प्रवेश करणे. दुसरा मार्ग म्हणजे हैद्राबाद येथून श्रीशैल्यम येथे येत असताना श्रीशैल्यमच्या अलीकडे साधारण 10 ते 12 कि.मी.वर अक्कमहादेवी गुहेकडून जाता येते. कर्दळीवनात (Kardalivan) जाणार्‍या सर्व यात्रेकरूंना येथे सर्व प्रकारचे साहाय्य मिळते.

श्रीअक्कमहादेवी गुहेपासून पश्चिमेकडे कर्दळीवनातील (Kardalivan) श्रीदत्तप्रभू आणि श्रीस्वामी समर्थांच्या मूळ स्थानाकडे जायचा रस्ता आहे. हा कर्दळीवनातील दुसरा टप्पा 6 कि.मी. अंतराचा आहे. हा रस्ता बहुधा सरळसोट आहे. मध्ये थोडाफार चढ-उतार येतो. मात्र, या रस्त्यावर अतिशय घनदाट आणि निबिड अरण्य आहे. श्रीदत्तगुरूंच्या मनात असेल तरच भाविकाला ही दुर्लभ परिक्रमा घडते. या रस्त्याची सुरुवात होतानाच अक्कमहादेवीच्या गुहेजवळ पूर्वेकडे एक विस्तीर्ण पठार आहे. तेथे एक अत्यंत जुने वडाचे झाड आहे. कर्दळीवनाची भूमी ही खरोखरच ध्यान, धारणा, तपश्चर्या, साधना करण्यासाठीच आहे. या ठिकाणी आकर्षण-शक्ती फार जास्त प्रमाणात आहे. कर्दळीवन ही देवभूमी आहे. तिथे जाण्यासाठी तीव्र साधना आणि उच्च योग आपल्या भाग्यात असणे आवश्यक आहे.

कर्दळीवन परिक्रमेसंबंधी काही नियमावली आहेत

* कर्दळीवनामध्ये जाणकार व्यक्तीबरोबरच जावे.

* कर्दळीवनात गटानेच प्रवेश करावा.

* इथे जाताना गरजेपुरतेच सामान बरोबर घ्यावे. स्वतःचे अंथरूण-पांघरूण, पाण्याच्या बाटल्या आवश्यक आहे.

* खाद्यपदार्थ बरोबर घ्यावेत.

* डोंगर चढताना हातात काठी असावी. डोक्यावर टोपी वा पंचा असावा.

* स्वत:ला लागणारी औषधे, जवळ बाळगा.

* शक्यतो गटामध्येच राहावे.

* वाटेत दिसलेल्या प्राण्यांना मारू नये.

* रात्री प्रवास करताना बॅटरी जवळ ठेवा.

* प्लास्टिकच्या वस्तूवर बंदी असल्यामुळे प्लास्टिकच्या वस्तू वापरू नका.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com