कपालभाति प्राणायम
भविष्यवेध

कपालभाति प्राणायम

करोना व्हायरसची लागण होऊ नये यासाठी सुरक्षिततेच्या सर्व नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. हा आजार आपल्या श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो. या आजाराविरोधात लढण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत असणं आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला कपालभाति प्राणायम बाबत माहिती देणार आहोत. यामुळे आपल्या फुफ्फुसांची क्षमता मजबूत होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

श्वसन यंत्रणा तसंच फुफ्फुसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित प्राणायम करण्याचा सल्ला दिला जातो. कपालभाति प्राणायमामुळे आपल्याला अनेक प्रकारे आरोग्यदायी लाभ मिळतात. वजन कमी होणे, तणाव मुक्ती इत्यादी आजारांमधून आपली सुटका होऊ शकते. सध्या जगभरात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. या आजारामुळे मृतांच्या संख्येमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. या आजाराविरोधात लढण्यासाठी आयुर्वेदासह योगासने, प्राणायमांचीही मदत घेतली जात आहे. कित्येक कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांकडून योगासने तसंच प्राणायमांचा सराव करून घेतला जात आहे. प्राणायमामुळे आपली श्वसन यंत्रणा आणि फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. योगधारणेमुळे आपल्याला भरपूर प्रमाणात शारीरिक तसंच मानसिक लाभ मिळतात. जाणून घेऊया प्राणायमाची सविस्तर माहिती

नियमित प्राणायम का करावे ?

प्राणघातक विषाणूंच्या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी, मनःशांती आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योगधारणेची भरपूर मदत मिळते. सध्या लोक मोठ्या प्रमाणात योगासने करण्यावर भर देत आहेत.

कोविड -2 व्हायरसपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर नियमित योग आणि ध्यानधारणा करावी. एका अभ्यासातील माहितीनुसार, दररोज योगासने आणि ध्यानधारणा केल्यास आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढते. ज्यामुळे कोव्हिड 19 सारख्या परिस्थितीत निर्माण होणारे आरोग्याशी संबंधित धोके कमी होण्यास मदत मिळू शकते.

योगतज्ज्ञांच्या माहितीनुसार, प्राणायमामुळे आपली फुफ्फुसे निरोगी राहतात. कोव्हिड 19 हा श्वसनाशी संबंधित आजार आहे. या आजाराविरोधात लढण्यासाठी आपली श्वसन यंत्रणा देखील मजबूत असणं आवश्यक आहे.

कसे करावे कपालभाति प्राणायम ?

- सर्वात आधी आरामदायी स्थितीमध्ये बसा. आपल्या पाठीचा कणा सरळ ठेवा आणि डोळे बंद करा. आपले हात गुडघ्यांवर ठेवा आणि कपालभाति प्राणायमासाठी तयार व्हा.

- श्वास पूर्णपणे बाहेर सोडा. नाकाद्वारे श्वास घ्या आणि जोराने बाहेरील बाजूस सोडा. आता आपली नाभी आतील बाजूस खेचा आणि आपल्या पोटाच्या मदतीनं फुफ्फुसांमधील हवा पूर्णपणे बाहेर काढा.

- नाभी आणि पोट सैल सोडल्यानंतर श्वासोच्छवास प्रक्रियेद्वारे हवा तुमच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचेल. एका राउंडमध्ये जवळपास 20 वेळा ही प्रक्रिया करावी. डोळे बंदच राहतील, याची काळजी घ्यावी. कपालभाति प्राणायमाचे तुम्ही दोन राउंड करू शकता.

कोणत्या वेळेस करावे कपालभाति प्राणायाम ?

- तुम्ही सुरुवातीला दोन मिनिटांसाठी कपालभाति प्राणायम करू शकता. सरावानुसार हळूहळू आपल्या वेळेमध्ये वाढ करावी.

कपालभाति प्राणायम सकाळी रिकाम्या पोटी करावे. पण सकाळी शक्य नसल्यास तुम्ही रात्री जेवल्यानंतर दोन तासांनंतरही याचा सराव करू शकता.

कपालभाती प्राणायम करण्याचे फायदे :

- फुफ्फुसांची क्षमता सुधारण्यास मदत मिळते.

- श्वसन यंत्रणेत अडथळा निर्माण करणारा कफ देखील कमी होतो.

- श्वसनाची प्रक्रिया सुरळीत सुरू राहते.

- यामुळे शरीरावरील सूज कमी होते.

वजन घटवण्यासाठी करा कपालभाति प्राणायम

- शरीरातील नाड्या शुद्ध होतात. वजन कमी होण्यास मदत मिळते. पोटातील अवयवांचे आरोग्य सुधारते. यामुळे पोट आणि ओटीपोटावरील चरबी देखील कमी होते. कपालभाति प्राणायमामुळे पचन प्रक्रिया देखील सुधारते.

- यामुळे रक्त प्रवाह सुरळीत सुरू राहतो. ज्यामुळे चेहर्‍यावर नैसर्गिक तेज येते. कपालभातिमुळे मेंदूचे कार्य सुधारते. मनाला तसंच शरीराला शांती मिळते. उच्च रक्तदाब, हृदय विकार, स्लिप डिस्क, कंबरदुखी, पोटाची शस्त्रक्रिया झाली असल्यास कपालभातिचा सराव करणं टाळावे.

- गर्भवती महिला तसंच मासिक पाळीदरम्यान कपालभातिचा अभ्यास करू नये.

श्वसन प्रणाली सुधारण्यासाठी

श्वसन प्रणाली सुधारण्यासाठी असलेल्या व्यायामांमुळे आपल्या संपूर्ण शरीराला भरपूर फायदे होतात. यामुळे दमा आणि क्रॉनिक ऑब्सट्रॅक्टिव पल्मोनरी डिसीझ यासारख्या फुफ्फुसांशी संबंधित असणार्‍या आजारांचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. प्राणायमाच्या अभ्यासामुळे श्वसन यंत्रणा आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होऊ शकते. यामुळे आपले संपूर्ण शरीर निरोगी राहते. जर दैनंदिन जीवनात योगधारणा आणि प्राणायमांचा अभ्यास केल्यास तुम्ही गंभीर आजारांना सहज दूर ठेऊ शकता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com